शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
29

जम्मू आणि काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात प्रतिकार दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे किमान तीन दहशतवादी मारले गेले आहेत. काश्मीर भागातल्या पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मारले गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव मुख्तार शाह असे आहे.
शोधमोहिमेचे सलग २७ दिवस
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून गेल्या सलग २७ दिवसांपासून पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट-मेंधर भागातील जंगलात ही कारवाई सुरू आहे. शनिवार दि. ६ नोव्हेंबरपासून सैन्याने राजौरी परिसराकडे मोहीम वळवली असून या ठिकाणी दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता आहे.
दहशतवादविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुघल रोडच्या राजौरी-ठाणमंडी भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सैन्याने दहशतवाद्यांची घेराबंदी करत राजौरीच्या थानामंडी भागातील खबलान जंगलात आपली शोधमोहीम सुरू केली आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबरपासून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात दहशतवादी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर १० ऑक्टोबरपासून या भागात सैन्य मोहीम सुरू झाली आहे.