Home Featured शोकांतिका

शोकांतिका

0

धारगळ येथे एका अल्पवयीन मुलावरील ॲसिड हल्ल्याने अनेक प्रश्नांची भेंडोळी उभी केली आहेत. ह्या ॲसिडफेक प्रकरणाला प्रेमप्रकरणात मुलीने केलेल्या आत्महत्येच्या दुःखाची किनार आहे. परंतु म्हणून मुलीच्या पित्याने कायदा हाती घ्यावा का आणि आपल्या दिवंगत मुलीच्या प्रियकराला जन्माची अद्दल घडवण्यासाठी ॲसिडफेकीसारखा अघोरी प्रकार करावा का हाही प्रश्न आहे. मुळामध्ये जेव्हा संशयिताच्या मुलीचे निधन झाले, तेव्हा त्याने दोडामार्ग पोलिसांत तक्रार नोंदवली होती, परंतु त्यावेळी दोडामार्ग पोलिसांकडून योग्य दिशेने तपास झालेला दिसत नाही. वैद्यकीय अहवालामध्ये सदर मुलीचा मृत्यू काविळीने झाल्याचे स्पष्ट केल्याने दोडामार्ग पोलिसांनी त्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्षही दिले नाही. वैद्यकीय अहवालाप्रमाणे खरोखरच सदर मुलीचा मृत्यू हा काविळीने झाला होता का की, वैद्यकीय अहवालात विषबाधेने मृत्यू झाल्याचे दडवण्यात आले होते असाही प्रश्न उपस्थित होतो. मुलीच्या पित्याने ज्याच्यावर आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला होता, त्याला बोलावून घेऊन दोडामार्ग पोलिसांनी किमान शहानिशा तरी करायला हवी होती, परंतु तेही घडले नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या मुलीच्या पित्याने स्वतःच कायदा हाती घेतला. कारण काहीही जरी असले, तरी एवढे हिंसक कृत्य करण्यास त्याने प्रवृत्त होणे मुळीच समर्थनीय नाही. मुळात उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ही मुले शिकत होती. ह्या वयात कसले आले आहे प्रेम? एकमेकांबद्दलचे आकर्षण आणि प्रेमाच्या फिल्मी कल्पना याने निर्माण होणाऱ्या अशा प्रेमप्रकरणांचे पर्यवसान भीषण घटनांमध्ये होऊ शकते. त्यामुळे शिक्षकवर्गाचेही अशा गोष्टींवर लक्ष हवे. एकतर्फी प्रेमातून जीवघेण्या हल्ल्यांच्या असंख्य घटना आजवर देशात घडलेल्या आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ही शिक्षणासाठी आहेत, ती हे भलते थेर करण्यासाठी नाहीत ह्याची जाणीव ह्या कोवळ्या मुलांना करून देणे ही शिक्षकांचीही जबाबदारी ठरते. स्वतः असे विषय त्यांनी हाताळायला हवेत असेही नाही. शाळांमधून समुपदेशक नेमलेले आहेत. अशा समुपदेशकांच्या कानी हे विषय घालून त्या मुलांना व्यवस्थित समजावण्याचे काम समुपदेशकांचे आहे. ते किती तत्परतेने केले जाते हाही प्रश्नच आहे. मुलीच्या मृत्यूने बिथरलेल्या पित्याने तिच्या मृत्यूस जबाबदार धरून तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलावर ॲसिड फेकले. ॲसिडफेकीच्या अनेक घटना ह्यापूर्वी राज्यात घडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गिरी येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईसमक्ष ॲसिड फेकले गेले होते. बस्तोड्यातच आणखी एकावर ॲसिड हल्ला झाला होता. एकदा तर एकाची स्कूटर ॲसिड ओतून जाळली गेली होती. ॲसिड फेकले गेल्याने विद्रुप झालेल्या मुलीच्या जीवनावरील ‘छपाक’ हा चित्रपटही मध्यंतरी येऊन गेला. ॲसिडसारखा ज्वालाग्राही रासायनिक पदार्थ एवढ्या सहजतेने कसा काय उपलब्ध होऊ शकतो असा प्रश्नही तेव्हा विचारण्यात आला. ॲसिड सहजतेने उपलब्ध होऊ नये ह्यावर तेव्हा खूप तावातावाने चर्चा झाली. खरे म्हणजे ॲसिडच्या खुलेआम विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने 2013 साली दिलेल्या आदेशात बंदी घातली आहे. कायद्याने ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध आहेत. विक्रेत्याने ॲसिड विक्री करताना आपल्या खरेदीदाराची संपूर्ण माहिती, ॲसिड खरेदीमागचे कारण आदी नोंदवण्याची कायद्याने सक्ती आहे. परंतु तिचे पालन होत नाही. प्रस्तुत प्रकरणात संशयिताने आपल्या कामाच्या ठिकाणाहून ॲसिड मिळवले होते असे सांगितले जात आहे. तेथील सुरक्षारक्षक झोपा काढत होते काय? ॲसिड फेकला गेलेला मुलगा अल्पवयीन आहे. कायद्याने सज्ञान नसलेल्या अशा मुलांच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला तर त्याचे नाव छापू नये, त्याची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती दिली जाऊ नये असे दंडक आहेत. ज्युविनाईल जस्टीस ॲक्ट म्हणजेच बाल न्याय अधिनियमानुसार अल्पवयीनाचे नाव उघड करणे हा गुन्हा आहे आणि त्याला तुरुंगवासाची देखील शिक्षा आहे. असे असताना समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांतूनदेखील अल्पवयीनाचे नाव बिनदिक्कत उघड केले गेले हाही बेजबादारपणा आहे, जो अलीकडे सर्रास पाहायला मिळतो. जे घडले ते दुर्दैवी आहे. परंतु अशा घटना घडू नयेत म्हणून समाज काय करणार ह्याचा विचारही व्हायला हवा. ही एक घटना घडली म्हणजे राज्यात गुन्हेगारी वाढलीय असा होत नाही, त्यामुळे ह्या घटनेचे राजकारण करण्याचा वृथा प्रयत्न कोणी करू नये. शालेय, महाविद्यालयीन शिक्षकवर्ग असो, पोलीस असोत, पालक असोत, विद्यार्थी असोत ह्या सर्वांसाठी ह्या घटनेने काही ना काही धडा दिलेला आहे. गरज आहे तो प्रत्येकाने समजून घेण्याची. तरच अशा शोकांतिका भविष्यात टळू शकतील.