– मनोहर काशिनाथ पेडणेकर, मधलामाज – पेडणे.
शैक्षणिक वर्ष, अध्ययन, अध्यापन वर्ष जून ते एप्रिल या कालावधीतील शैक्षणिक संचयाची साधना. नवीन आकलन, नवीन अभ्यासक्रम, नवचैतन्याची उपासनात्मक तळमळ आणि परिश्रमातील यशापयश याची चाचणी शैक्षणिक सुविधांतून ‘गुणवत्ता दर्पण’ दाखविते. ‘अत्यंत उत्सुकता आणि काही अंशी अपरिचितची प्रचीती’ या भावनिक शिदोरीवर प्रथम प्रवेश विद्या उपासना मंदिरात अध्ययन सेवाव्रतीचा होत असतो. त्या वेळचा उत्साह, थोडी भीती, थोडी नाखुषी, नवलाई या विचारांनी बालवय, बालमन पूर्वयुवकवय मोहरून जाईल की, शहारून जाईल याचा अनुभव ‘व्यक्ति तितक्या प्रकृती’ या नुसार त्यांना आला नसल्यास नवलच!
जून महिना, शैक्षणिक उपासनेतील अध्ययन-अध्यापन सेवारंभ. कुतूहूल, नावीन्य आणि संकल्प यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण, जिज्ञासा, ध्येय आणि कर्तव्यातून आशीर्वाद यातील पालकत्व, अनुभव, अध्यापन आवड आणि आस्थापूर्वक मार्गदर्शन ही शिक्षकांची सेवावृत्ती. या त्रिवेणी सूत्रांचा उगम आणि संगम शैक्षणिक महाप्रांगणात होत असतो. अर्थात् त्याचे श्रेय योग्य उपासनाकर्त्यांना असते. शैक्षणिक सुविधांचा प्रभाव विद्यार्जनात खूपच आशावादी, वास्तववादी आणि प्रयत्नवादी ठरत असतो. वर्गातील उपस्थिती आणि त्यातून प्रवाहित होत असलेले अध्ययन आणि अध्यापन याच्या पाठबळावर, पायाभरणीवर शैक्षणिक मूल्यमापनाची कसोटी विविध स्तरांवरच्या परीक्षांतून परावर्तीत होत असते.
पहिली सहामाही
जून ते ऑक्टोबर हा कालावधी पहिल्या सहामाहीचा असतो. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी कौशल्यांची नोंद घेणारे उपक्रमात्मक शिक्षणाचा परिपाठ शैक्षणिक प्रांगणात घेतला जातो. विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष कल अभ्यासक्रमाच्या प्रगतीकडे असतो आणि तो असणे स्वाभाविकच असते. प्रथम लक्ष प्रगती पुस्तकावर आणि इतर स्पर्धा/ उपक्रम, यशाचे कौतुक याकडे लक्ष त्याच्या पाठोपाठ. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने पालक जसे नियोजन करतो त्याचप्रमाणे शिक्षकसुद्धा अभ्यास नियोजन करण्यास आपल्या ‘शैक्षणिक उपासकांना’ मार्गदर्शक असतात. पहिल्या सत्राची तयारी आणि त्यानंतरचा ‘रिझल्ट’ कौटुंबिक स्तराला सुखावह ठरतो/ वेदनायुक्त ठरतो. (प्रयत्नपूर्वक, परिश्रम, आळस, दुर्लक्ष यावर अवलंबून) गणेश चतुर्थीची आनंदमयी उत्साहवर्धक सुट्टी, त्यानंतर सहामाही परीक्षा, या परीक्षेचे भान विशेष ठेवावे लागते. कारण अभ्यासक्रम मोठा असतो. गुणांक जास्त आणि वेळ जादा. त्यामुळे अभ्यासाची सचोटी आणि परीक्षेची कसोटी यातून यशापयशाचे प्रमाणपत्र मिळत असते.
या सहामाहीत राष्ट्रीय सणांचे उत्साही आयोजन शैक्षणिक प्रांगणात केले जाते. त्यात क्रांतीदिन, टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, गांधी जयंती, तसेच शारदोत्सव या उत्सवांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांना चालना दिली जाते, प्रेरणा दिली जाते, उत्साहित आणि उल्हासित केले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, संकल्पित कौशल्यांना मार्गस्थ करणारे ‘अभिनव प्रयोग’ विद्यामंंदिरात केले जातात. आणि ‘दिवाळी सुट्टीचे नियोजन’ करण्यास प्रेरणा दिली जाते.
दुसरी सहामाही
दीपावलीच्या सुट्टीचा आनंद आपआपल्या परीने सजवित आणि ‘आणखी थोडे दिवस सुट्टी मिळाली असती तर…’ या स्वच्छंदी वागणुकीच्या स्वभावामुळे म्हणा, दुसर्या सहामाहीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी शालेय प्रांगणात प्रवेश करतात. पहिल्या सहामाहीचे प्रगती पुस्तक पालकांच्या हाती पडते आणि ‘हेची फल काय मम तपाला’ या वेदनेने घायाळ झालेले आणि ‘केले कष्टाचे चीज’ या आनंद लहरींचा आस्वाद घेणारे पालकप्रभुत्व यांचा प्रत्यंतर त्यांना येत असतो. ’आता आळस नको, दुर्लक्ष नको, अनियमितपणा उपयोगाचा नाही’ असा निश्चय विद्यार्थी करतो. पालक त्यांना त्या दृष्टीने ‘संगोपनाची जीवनसत्वे’ देतात. आणि शिक्षकही आपले उत्तरदायित्व निभावित असतात. हे सगळे स्वाभाविकच असते.
दुसरी सत्रमध्य परीक्षा, त्याच्यापूर्वी गोवा मुक्तीदिन सोहळा, शालेय नियोजनाप्रमाणे सहल, स्नेहसंमेलन, क्रीडामहोत्सव, इतर वर्गवार स्पर्धांचे आयोजन, प्रजासत्ताकदिन सोहळा, तसेच इतर कार्यक्रम/ उपक्रम, कार्यशाळेचे आयोजन, तालुका-राज्यस्पर्धात सहभाग, वगैरेंचे आयोजन.
विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे, वेगवेगळ्या प्रसंगी होत असतात. ज्यामध्ये पालक-शिक्षक संघटनेच्या बैठका, शिक्षणाधिकार्यांचे मार्गदर्शन यातून शालेय प्रांगण विद्यार्थीमय, चैतन्यमय दिसत असते. ‘हा माझा वर्ग, ही माझी शाळा, हे माझे मित्र-मैत्रिणी, हे माझे गुरूजन, हा माझा शालेय परीसर’ ही भावना आपुलकी आणि नाते दृढ करते.
मार्च महिना. दुसर्या सहामाही परीक्षेची नियोजनात्मक तयारी. ‘यश मिळू दे’ या भावनेने परिपक्व झालेले विद्यार्थीमन. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याचा प्रत्यय येतो. त्यावेळी एप्रिल महिना असतो. याच महिन्यात शालांत परीक्षेचे सार्वजनिक स्वरूप. या परीक्षेचा निकाल मे-जूनमध्ये. तोपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी.
‘सुट्टी लागली, सरली शाळा, कोठ पहाटे उठतो खुळा? अभ्यासाला बसा घडोघडी मारू बेडूक उडी, गड्यांनो घालूया लंगडी’ या कवयत्री शांता शेळकेंच्या कवितेचा प्रत्यय दाखविणारी उन्हाळी सुट्टी असते. म्हणावेसे वाटते..
शैक्षणिक वर्ष संपता संपता….
अध्ययन जमेतून, शैक्षणिक संचयनी जमा झाली कां?
शैक्षणिक वर्ष संपता संपता…
अध्ययनातून शैक्षणिक साधनेची उपयुक्त उपासना झाली का?
शैक्षणिक वर्ष संपता संपता…
मातृपितृ संगोपनाला शैक्षणिक भूषणाची साज झाली कां?
विचार करूया, मंथन करूया, चिंतन करूया,
शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर….