शेळ-मेळावली प्रकरणातील १६ जणांना अटकपूर्व जामीन

0
206

येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शेळ मेळावली येथील हिंसाचार प्रकरणी १६ जणांना अटकपूर्व सशर्त जामीन काल मंजूर केला आहे.
अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्यामध्ये कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, रणजित राणे, दशरथ मांद्रेकर, रोशन देसाई, रिव्हॉल्युशनरी गोवाचे मनोज परब, रोहन कळंगुटकर व इतर संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने शेळ मेळावली येथील ६ जानेवारीच्या हिंसाचारप्रकरणी २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विश्‍वेश परोब, कल्पेश गावकर आणि शैलैंद्र वेलिंगकर या तिघांना अटक केली होती. त्या तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्यांनी दोन महिने शेळ मेळावली गावात प्रवेश करू नये. तसेच गुन्हा अन्वेषण विभागात १८ ते २२ जानेवारी दरम्यान पाच दिवस सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, कॉँग्रेसचे जनार्दन भंडारी यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे.