- संजीव कुंकळ्ळकर
शेतकऱ्यासाठी पावसाळ्याची सुरुवातच मुळी कार्यप्रवणतेची सुरुवात असते. अनेक आघाड्यांवर तो आपल्या कुटुंबासह न थकता, न डगमगता, न कोसळता लढत असतो. कारण त्याला पक्के ठाऊक आहे की पावसाळ्याची सुरुवात हेच त्याच्या सुबत्तेचे, समृद्धीचे व सुखाच्या सुरुवातीचे साधन आहे.
या वर्षी गोव्यात, नाही भारतातच मॉन्सून लवकर आला. त्याआधी भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळाची व अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीला इंग्रजीत ‘डिप्रेशन’ असे नाव आहे. सामान्यांच्या भाषेत ‘डिप्रेशन’ म्हणजे नैराश्य. मे महिन्याच्या मध्यातच तयार झालेले हे ‘डिप्रेशन’ शेतकऱ्याच्या नैराश्याचे मोठे कारण ठरले आहे. उशिराने तयार होणारे आंबे, कोकम, आंबापोळी, फणसपोळी आणि अशा उत्पन्नांची या अवकाळीने वाट लावलीच, पण पाऊसपूर्व तयारीच्या कामांचाही खोळंबा झाला. नियोजन चुकले.
ग्रीष्म तापू लागताच शेतकऱ्याला पाण्याच्या कमतरतेचे, उष्णतेच्या रखरखाटाचे व्यवस्थापन सांभाळतानाच दस्तक देणाऱ्या मौसमी पावसाचे वेध लागतात. मॉन्सून या नावाने सुपरिचित असलेल्या आणि भारतीय उपखंडात बरसणाऱ्या या मौसमी पावसावर संपूर्ण देशाच्या शेतीची मदार असते. मॉन्सून प्रमाणबद्ध, अधिक की कमतरतेचा झाला यावर भारताच्या जवळ-जवळ पन्नास टक्के लोकसंख्येचे अर्थकारण व अन्न सुरक्षा प्रभावित होते. थोडक्यात, केवळ पावसाळी किंवा खरीपच नव्हे तर उन्हाळी व हिवाळी किंवा रब्बी पिकांचेही यशापयश या मौसमी पावसात झालेल्या जलसाठ्यावर अवलंबून असते.
नवनवीन तंत्रज्ञान, धरणे, पाटबंधारे, लवकर किंवा उशिरा तयार होणारी अन्नधान्ये, फळे, भाजी, फुले, गवत अशा सर्वप्रकारच्या गरजांवर माणसे आणि त्यांची जनावरे, पक्षी, जलचर यांचे अवलंबित्व फारसे कमी झालेले नाही. पाण्याची साठवण, त्याचा योग्य क्षमतेने किंवा पुरेपूर वापर, पाण्याचे पुनर्भरण अशा अनेक उपाययोजना राबवूनसुद्धा पावसाच्या लहरीपणावर मात करण्यात अजून तरी फारच थोडे यश आलेले आहे. नैऋत्य मॉन्सून हाच भारतीय उपखंडासाठी प्रमुख व खरा पाण्याचा स्रोत आहे. सध्या सक्रिय असलेल्या मॉन्सूनचे यासाठीच हार्दिक स्वागत.
एप्रिल-मेमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात. या सरी कुणाला हव्याहव्याशा असतात, तर कुणासाठी नुकसानीच्या ठरतात. अर्थात या मॉन्सूनपूर्व सरी जर वादळीवाऱ्याशिवाय आल्या तर विशेष नुकसानीच्या ठरत नाहीत, किंबहुना पाण्याच्या कमतरतेने आणि उष्णतेने त्रासलेल्या माणसांना, पशुपक्षी व पिकावळींना तसेच जंगली झाडे-झुडपे यांना सुखद अनुभव देतात.
पावसाची दस्तक ही शेतकरी कुटुंबांसाठी कार्यप्रवण करणारी घटना असते. उन्हाळी पीक ताब्यात घेणे, त्याची साठवण किंवा विक्री करणे, पावसाळ्याच्या दिवसांकरिता गरजेच्या वस्तूंची बेगमी करणे, घर शाकारणे, जनावरांच्या गोठ्यांची डागडुजी किंवा दुरुस्ती करणे, पावसाळी काळासाठी गवत, लाकूडफाटा, अन्नधान्ये यांसारख्या निविष्ठांची साठवणूक करणे, तसेच पावसापूर्वी अमसुले, आंबा-फणसाची साठे अशा रोख उत्पन्नांचा पूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न, अशा अनेक आघाड्यांवर शेतकरी कुुटुंबे एकाच वेळी कार्यरत असतात. नेमक्या त्याच वेळी पावसात येऊ घातलेल्या पिकांसाठी तयारी करण्याचा मोठा व्याप शेतकऱ्यांच्या माथ्यावर असतो. शाळा-कॉलेज यांना तर याचसाठी उन्हाळी सुट्टी असते असा माझा लहानपणी रास्त समज होता.
साधारणतः शेतकरी तीच तीच पिके घेत असतो. याचे कारण विशिष्ट पिकांबद्दल असलेले परंपरेने आलेले ज्ञान, जे पेरणीपासून विक्रीपर्यंत असावे लागते. तसेच जमिनीकडून पिकाला मिळणारा प्रतिसाद, लागवड केलेल्या पिकांसाठी लागणारा अनुभव, मजूरवर्ग व इतर निविष्ठा व विक्रीची खात्री अशी अनेक कारणे पीक निवडीसाठी कारणीभूत ठरतात. पण कुठलेही पीक घ्यायचे असेल तर त्यासाठी योजनाबद्ध काम करावे लागते. नियोजन, निविष्ठांची जमवाजमव, काम करण्यासाठी कुशल व अकुशल कामगार, नेहमीची तसेच बाहेरून भाडेपट्टीवर घ्यायची यंत्रे, अवजारे, खते, कीटकनाशके, रोगराई प्रतिबंधन, पाळीव-रानटी जनावरांचा उपद्रव, वेळोवेळीची कामे, निगा या नेहमीच्या नियोजनबद्ध कामांबरोबरच ऐनवेळी उपस्थित होणारी कामे व अडचणी यांचाही विचार आणि तयारी ठेवावी लागते. शिवाय अनपेक्षित रोगाचा प्रादुर्भाव, अशा रोगांना ओळखणे व उपाययोजना करणे, ऐनवेळी पावसाने दडी मारणे किंवा अतिवृष्टी अशा संकटांनाही शेतकरी तोंड देतो. आजकाल नव्याने सतावणारे पर्यावरण बदलांचे भूत शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.
शेती हा नेहमीच कौटुंबिक व्यवसाय आहे. घरातले सर्व सदस्य आपापल्या कुवतीनुसार या घराच्या व्यवसायाला हातभार लावत असतात. एकत्र मोठी कुटुंबे शेती करत असत तेव्हा शेती नुकसानीत जात नसे. कारण पैसे मोजून मजूर/कामगार मिळवणे ही सर्वात खर्चीक बाब नसायची. विभक्त कुटुंबे आणि मजुरीवर आणलेले कामगार हे शेती न परवडण्याचे एक मोठे कारण आहे. कुटुंबाबरोबरच आजूबाजूचे शेतकरी एकमेकांना मदत करायचे. एकमेकांना सर्व कामात मदत करणे ही एक सामाजिक जबाबदारी असायची. आज ‘आपल्यापुरता आपण’ हे तत्त्व सर्वमान्य झाल्याने खेडेगावातील सामाजिक वीण विस्कटत आहे. कुटुंबे तर लहान झालीच, शिवाय कुटुंबातील सदस्यांचे शिक्षण, नोकरी, खेळ, मनोरंजन या कारणांमुळे शेतीसाठी दिला जाणारा वेळ व या कौटुंबिक व्यवसायाला दिले जाणारे महत्त्व व प्राथमिकता यांना दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. घरच्या सदस्यांच्या कार्यशक्तीला जोड म्हणून मजूर वापरण्यास सुरुवात झाली आणि शेतीचे व्यवसाय म्हणून असलेले आर्थिक महत्त्व बिघडत गेले. शेतकामासाठी योग्य मजूर न मिळणे हे शेती व्यवसायासमोरचे सर्वात मोठे नजीकच्या काळातील आव्हान असेल.
मौसमी पाऊस आणि गोव्यातील शेती यावर विचार करताना भातशेतीवर सर्वात अधिक विचार व्हायला हवा. एक तर भात हे गोव्यातील जनतेचे मुख्य अन्न आहे आणि गोव्यात घेतले जाणारे ते महत्त्वाचे पीक आहे. गोव्याच्या स्वतःच्या भाताच्या जाती आहेत आणि त्या गोव्यातील पर्यावरणाशी सुसंगत आहेत. भरड (भोरोड) पद्धतीने केली जाणारी शेती फक्त पावसाळ्यात व पावसाच्या पाण्यावरच केली जाते. वर्षभर पाणी उपलब्ध नसलेल्या डोंगराळ किंवा सपाट भागात छोटे-मोठे सपाटीकरण केलेल्या जमिनीवर हे भात लावले जाते.
खाजन शेती ही खाऱ्या पाण्याचा कमी-अधिक प्रभाव असलेल्या जमिनीवर केली जाणारी शेती आहे. खाजन जमीन क्षारयुक्त असल्याने भाताची प्रचलित बियाणी व पद्धती येथे वापरता येत नाहीत. पारंपरिक खाजन जमिनीसाठीची बियाणीच व हल्ली विकसित केलेल्या काही नवीन जातीच खाजन शेतीसाठी वापरल्या जातात. पाण्याची क्षारपातळी आणि नदी-खाडी यांचे पाणी शेतात घुसू नये म्हणून खाजन शेतकऱ्यांना दक्ष राहावे लागते. खाजन शेतीत क्षारपाण्याचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असल्याने, ती व्यक्तिगत पातळीवर न करता शेतकऱ्यांचा मोठा समूह एकत्र येऊन खाजन जमिनीवर पीक घेतले जाते. खाजन जमिनीवर शेती करणे अधिक आव्हानात्मक असल्याने बरीच खाजने ओस पडत आहेत. तिसऱ्या भातलागवडीच्या पद्धतीमध्ये खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके घेतली जातात. पाण्याचा वर्षभर पुरवठा असलेल्या ठिकाणी व सपाट जमिनीवर ही शेती केली जाते.
भातशेतीचे व्यवस्थापन काटेकोरपणे करावे लागते. बांध बांधणी, नांगरणी, अंकुरण, रोपांची लावणी, पाण्याची पातळी, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन अशी सर्व कामे ठरलेल्या वेळीच काटेकोरपणे करावी लागतात. ही समयसारणी न पाळल्यास उत्पन्नात फरक दिसून येतो. गोव्यात भातशेतीच्या उत्पादनात सातत्याने होणारी घट चिंताजनक आहे.
बागायती शेती म्हटले की कुळागराची आठवण येते. पण कुळागरांबरोबरच काजू, आंबे व नारळीची शेती गोव्यात महत्त्वाची आहे. काजू, आंब्याची कलमे सुरुवातीच्या पावसात लावली तर झाडे स्थिरावण्यास व सुरुवातीची वाढ अपेक्षित होण्यास मदत होते. नारळही पावसाळ्याच्या सुरुवातीस लावणे योग्य ठरते. या बागायती झाडांसाठी उन्हाळ्यातच खड्डे खणणे व शेणखतयुक्त मातीने ते भरून घेणे अशी पद्धत आहे. असे केल्याने लवकर लागवड करणे शक्य होते.
कुळागरे ही बहुपीक शेतीपद्धती असल्याने, तसेच कुळागरातील लागवडी या जास्त पाणी वापरणाऱ्या असल्याने कुळागरातील नवीन लागवडी वर्षभर चालू असतात. निदान सुरुवातीच्या पावसातच हे बंधन नसते. सुरण, अळू यांची लागवड मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आटोपली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीस करण्याचे कुळागरातील मुख्य काम म्हणजे साठणाऱ्या कामाचा निचरा करणे. कुळागरातील मुख्य पीक म्हणजे सुपारी आणि मिरी. या दोन्ही पिकांना बुरशीजन्य रोग होतात व लागलेली फळे गळून पडतात. पावसाळ्यातील दमट हवामान बुरशीच्या वाढीला अत्यंत पोषक असते. हा बुरशीजन्य कोलेरोग बळावण्याच्या आधीच उपाययोजना करावी लागते. पावसाच्या दिवसांत उघडीप साधून सुपारीच्या झाडांवर चढून घडांवर नेमकी फवारणी करणे हे कौशल्याचे काम आहे. ही फवारणी पावसाळ्याच्या काळात साधारणतः तीन वेळा करायची असते. पाऊस नसताना फवारणी करणारा कुशल कामगार पावसाळ्यात शोधणे हे अजून एक कौशल्याचे काम. हे सगळे जमून आले तर जिंकला, नसल्यास औषध वाया जाते, कामगार फुकट जातो आणि फवारलेले औषध धुऊन गेल्याने बुरशीप्रतिबंध होत नाही. हे नुकसान असह्य असते. गेल्या मोसमात अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला असे नुकसान आलेले आहे. श्रम आणि पैसा मातीमोल झाला. आधीच कुशल कामगारांची वानवा, पाऊस व औषध फवारणीचे वेळापत्रक हे साधणे कुळागर शेतकऱ्यांसाठी मानसिक तापच असतो. या फवारणीच्या यशावर कुळागराच्या मुख्य उत्पन्नाचे गणित आधारलेले असते असे ढोबळपणे म्हणता येईल. चांगली लांब पल्ल्याची फवारणी यंत्रे, औषधांचा प्रभाव व परिणाम वाढवणाऱ्या औषधांबरोबर वापरायची मिश्रणे यांनी हे काम काहीसे सोपे झाले असले तरी पावसाचा अचूक अंदाज शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या अंदाजामध्ये उत्तरोत्तर अचूकता वाढताना दिसते. मात्र हा हवामानाचा अंदाज नेहमीच मोघमात लिहिलेला असतो, तो अधिकाधिक अचूकतेने आणि कमीत कमी तालुका पातळीपर्यंतच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. काही बिगर सरकारी संस्थांचा हवामानाचा अंदाज भारतीय मौसम विज्ञान विभागाच्या तुलनेने अधिक अचूक वाटतो व ते गावपातळीपर्यंत अंदाज सांगतात. अचूकता, बिकटता आणि विश्वासार्हता साधता आली तर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. कुळागरातली पुढची कामे पावसाचा जोर उतरल्यावर हातात घेतली जातात. याच्यात मुख्यतः कुळागरात जमा झालेला सेंद्रीय कचरा, शेणखत, इतर सेंद्रीय किंवा जंगली झाडांच्या टीप्त्या पानांचे व काटक्यांचे खत (सावळ), याशिवाय कुळागरातील संपूर्ण माती खणून (खंडी) ती सैल करणे व जमिनीची पाणी मुरवण्याची शक्ती वाढवणे अशी कामे घेतली जातात. हल्ली खंडी टाळली जाते व माती सैल करणे व पाण्याची जिरायत वाढवणे ही कामे गांडुळांवर सोपवली पाहिजेत असा रास्त विचार मांडला जातो. यात मशागतीचा मोठा खर्च वाचेल. कंदवर्गीय पिकांसाठी सेंद्रीय खते अधूनमधून देऊन सुरण व अळू यांचे चांगले उत्पन्न अनेक शेतकरी घेतात. मोठ्या प्रयत्नाशिवाय चांगले उत्पन्न दिवाळीच्या सुमारास निघते.
फळभाज्या आणि पालेभाज्या हा पावसाळी हंगामातला मोठा उद्योग आहे. काकडी, दोडकी, कारली, पडवळ, टरबूज, भेंडी, वाल अशा अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. उतरत्या पावसात मुळा व लालभाजी पिकवली जाते. काकडी-दोडकी यांच्या लागवडीसाठी रुजवण भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात केली जाते. मुळात वेलवर्गीय फळभाज्या डोंगराळ भागात गावाबाहेर घेतल्या जातात. पीक लवकर आणि धार्मिक उत्सवाच्या वेळी मिळण्याच्या या प्रयत्नात शेतकऱ्यांचे कष्ट कामी येतात. काढणीच्या हिशेबाने लावणी साधताना शेतकऱ्याचे प्रबंधनकौशल्यही कसोटीला लागते. मात्र भर उन्हाळ्यात डोंगरावर पेरणी, डोंगरावर पाणी वाहून नेणे, निविष्ठांची जुळवाजुळव हे साधताना शेतकरी कुटुंब पहाट ते संध्याकाळी उशिरापर्यंत मळ्यातच राबत असते, अगदी भर पावसात. इतके श्रम केल्यानंतर आलेल्या पिकाने शेतकऱ्यांपेक्षा दलाल, व्यापारी आणि विक्रेते यांचेच पोट अधिक भरते. अशात निसर्गाने दगा देणे, अति रासायनिक खतांमुळे नापिकी, कीट प्रबंधन फसणे असे झाले तर शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट होते. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा कोप सोसला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, धोकादायक कीटकनाशकांऐवजी फेरामोन सापळे वापरणे यासाठी मळेकर शेतकऱ्याचे प्रशिक्षण झाल्यास फळभाज्या, पालेभाज्या व फुलांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याचे उत्पन्न सुधारेल असे वाटते.
शेतकरी अनेक आघाड्यांवर एकाच वेळी काम करतो. योजना, नियोजन, अंमलबजावणी, निविष्ठांची जमवाजमव, कामगार, उत्पादन आणि विपणन सगळे काही एकट्याने. मात्र शेतमालाला लाभकारी मूल्य देणाचे (एमएसपी) गणित मांडताना शेतकऱ्याचा सरकार दरबारी दर्जा केवळ अकुशल कामगाराचा!
थोडक्यात शेतकऱ्यासाठी पावसाळ्याची सुरुवातच मुळी कार्यप्रवणतेची सुरुवात असते. अनेक आघाड्यांवर तो आपल्या कुटुंबासह न थकता, न डगमगता, न कोसळता लढत असतो. कारण त्याला पक्के ठाऊक आहे की पावसाळ्याची सुरुवात हेच त्याच्या सुबत्तेचे, समृद्धीचे व सुखाच्या सुरुवातीचे साधन आहे.