Home Featured खरा धोका

खरा धोका

0

इस्रायल – इराण संघर्षाची तीव्रता पाहून अवघे जग आज चिंतित आहे. कच्च्या तेलापासून हवाई प्रवासापर्यंत सर्वत्र दरवाढीचे संकेत आहेत हे तर झालेच, परंतु चिंता करण्याजोगी त्याहून खूप मोठी अशी एक बाब समोर आली आहे ती आहे ह्या संघर्षाचे एकूण स्वरूप व कार्यवाहीची अंगिकारली गेलेली पद्धत. इस्रायलने 13 जूनच्या पहाटे इराणच्या लष्करी आणि आण्विक तळांवर हल्ले चढवले, परंतु हे शक्य झाले ते मोसादने इराणची हवाई संरक्षण प्रणाली आधीच निकामी केल्याने. मोसादने हे कसे घडवून आणले त्यासंबंधी थोडीफार माहिती आता उघड झाली आहे, त्यानुसार मोसादने आधीच इराणमध्ये आपले असंख्य द्रोन घुसवले होते आणि त्यांच्या मदतीने व गुप्तचर माहितीच्या आधारे त्यांनी आधी इराणची हवाई संरक्षण प्रणाली आतल्या आत नेस्तनाबूत केली, ज्यामुळे इस्रायलला प्रत्यक्षात आपली तब्बल दोनशे लढाऊ विमाने इराणमध्ये पाठवून एकाचवेळी जवळजवळ शंभर ठिकाणांना लक्ष्य करणे शक्य केले. काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियामधील हवाई तळांवर जे द्रोन हल्ले चढवले होते, त्याचेच हे पुढचे रूप म्हणावे लागेल. युक्रेनने आधीच रशियाच्या प्रदेशात लष्करी तळांजवळ ट्रकांमधून लाकडी पेट्यांत आपले द्रोन पोहोचवले होते. प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी दूरनियंत्रित पद्धतीने त्या लाकडी पेट्या उघडल्या गेल्या, त्यातील द्रोन बाहेर काढले गेले आणि त्या द्रोनद्वारे लष्करी व हवाई तळांवर तेव्हा यशस्वी हल्ले झाले. इस्रायल त्यापेक्षा चार पावले पुढे गेला आहे. मोसादच्या मदतीने त्यांनी आधी इराणमध्ये आपले द्रोन पोहोचवले. त्यांच्या मदतीने इराणची रडार आणि एस 300 हवाई संरक्षण प्रणाली निकामी केली आणि आपल्या लढाऊ विमानांना इराणमध्ये रान मोकळे करून दिले. त्यामुळे इस्रायलने ह्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत प्रचंड प्रमाणात हवाई हल्ले केले. इराणचे नातांझसारखे आण्विक तळ लक्ष्य करण्यात आले. इतकेच काय, इराणचे लष्करी मुख्यालय, रेव्हल्युशनरी गार्डस्‌‍चे मुख्यालय देखील त्यातून सुटले नाही. इराणच्या लष्करप्रमुखाला ठार मारण्यात आले, रेव्हल्युशनरी गार्डच्या कमांडरला ठार मारण्यात आले. एकूण इराणसारख्या मोठ्या देशात इस्रायलने आपल्या ह्या हवाई हल्ल्यांतून संपूर्ण हाहाकार माजविला. येथे लक्षात घेण्यासारखी सगळ्यांत महत्त्वाची बाब म्हणजे इराण हा इस्रायलचा शेजारी देश नव्हे. दोन्ही देशांच्या मध्ये इराक, लेबनॉन, जॉर्डन आणि सीरिया आहेत. इस्रायलपासून इराणपर्यंतचे हवाई अंतर कमीत कमी हजार मैलांचे म्हणजे सतराशे किलोमीटरचे आहे. इराण आजवर सीरिया आणि लेबनॉनमधील, तसेच येमेनमधील आपल्या हस्तकांच्या मदतीने इस्रायलला त्रास देत आला. गाझा पट्टीतील हमास, लेबनॉनमधील हिज्बुल्ला, येमेनमधील हौथी यांच्या मार्फत इराण इस्रायलच्या मुळावर उठलेला आहे आणि आता तो आपली आण्विक शक्ती वाढविण्यामागे लागल्याचे पाहून अस्तित्वाचे संकट लक्षात आल्याने इस्रायलने हे हवाई हल्ले चढवून इराणची आण्विक ताकद उद्ध्वस्त केली. खरे तर लष्करी बळाचा विचार करता इस्रायलपेक्षा इराणची ताकद कितीतरी मोठी आहे. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे हवाई बळाच्या बाबतीत इराण मागासलेला आहे. अजूनही अमेरिकेची एफ 4 आणि एफ 5 तो वापरतो आहे. याउलट इस्रायलकडे अत्याधुनिक एफ 15, एफ 16 आहेत, ज्यांचा त्याने ह्या हल्ल्यांवेळी वापर केला. मात्र, इराण द्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या विकासात मागे नाही. हमासपासून हिज्बुल्लापर्यंतच्या आपल्या हस्तकांना तो ती वेळोवेळी पुरवीत आला आहे. त्यामुळे आता इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने द्रोन आणि क्षेपणास्त्रांचा प्रतिहल्ला चढवायला सुरूवात केलेली आहे. कोणी सांगावे, अण्वस्त्रांचा वापरही ह्या युद्धात होऊ शकतो, त्यामुळे मध्य पूर्व सध्या कमालीच्या ज्वलनशील परिस्थितीला सामोरी जाते आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ह्या संघर्षातून समोर आलेला खरा धोका म्हणजे आधुनिक युद्धतंत्राचे ठळकपणे दिसणारे वेगळेपण, जे युक्रेनच्या रशियावरील द्रोन हल्ल्यांत दिसले, जे आता इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांत दिसते आहे. भारताला देखील ह्या आधुनिक युद्धतंत्राचे स्वरूप अभ्यासणे अत्यंत गरजेचे असेल. आपल्या शत्रूंची थेट हल्ल्याची प्राज्ञा आणि कुवत नसल्याने अशा प्रकारच्या गनिमी काव्याचा वापर आपल्याविरुद्धही होऊ शकतो. आपली हवाई संरक्षण प्रणाली प्रबळ आहे आणि ती सीमेपलीकडून होणाऱ्या द्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम आहे हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध झाले आहे. परंतु देशाच्या अंतर्भागातून हल्ल्याचा विचार शत्रूकडून केला जाऊ शकतो. पाकिस्तानने भारतात विणलेले सध्या उघडकीस आलेले हेरांचे जाळे लक्षात घेतले, तर भविष्यात अशा धोक्याला सामोरे जाण्याची तयारीही आपल्याला नक्कीच ठेवावी लागेल.