शेतकर्‍यांच्या जमिनी शेतकर्‍यांकडेच

0
65

म्हापसा (न. प्र.)
आपल्या हातात असलेली जमीन कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्याच्या आड कुणी येऊ शकत नाही. जो कायदा सरकार दरबारी आहे त्या कायद्यानुसार शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्याकडेच राहतील. काही काळापूर्वी भाटकारशाही होती. तीही आता राहिली नाही. ती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. शेतकर्‍यांना कुणीही धमकी देऊ नका आणि त्यांच्याकडील शेतजमिनी काढून घेऊ नका असे केल्यास शेतकरी गप्प बसणार नाहीत असा इशारा गोवा फाऊंडेशनचे ऍड. क्लॉड आल्वारिस यांनी म्हापसा येथील शेतकर्‍यांच्या मेळाव्यात सांगितले. श्री बोडगेश्‍वर शेतकरी संघटना म्हापसा यांनी आयोजित केलेल्या या शेतकर्‍यांच्या मेळाव्यात श्री. आल्वारिस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ऍड. गुरू शिरोडकर, श्री बोडगेश्‍वर संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, जॉन लोबो, दीपेश नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना आल्वारिस म्हणाले की, कायद्यात बदल झालेला आहे आणि तलाठी येऊन सांगत असेल आणि त्यात कुणाला शंका असल्यास त्यांनी मामलेदारांना सांगायला हवे असेही ते म्हणाले.
ऍड. शिरोडकर यांनी कुळ-मुंडकार यावर माहिती देताना सांगितले की, कुळ मुंडकार कायदा कुणी केला आणि कशासाठी केला हा प्रश्‍न अजून प्रलंबित आहे. जनतेला काय हवे ते सरकार देऊ शकले नाही. कुळ कायद्यांना शोधायला कुळदार असतो. तो रयतेचा राजा असतो. पण तो शेतकर्‍यांसाठी नसतो. त्यामुळे त्यांची अवस्था तळ्यात-मळ्यात झालेली आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हवेदावे बाजूला सारून एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जॉन लोबो यांनी, आमच्या शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वडिलापार्जीत पारंपरिक शेती सध्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी जात आहे. बागायती दैनावस्थेत पोहोतचलेल्या आहेत. त्यांची वासपुसही कोणाकडून केली जात नाही. याकडे सरकारने पीडित शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवावेत अशी मागणी केली.
बोडगेश्‍वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या शेतजमिनींना जो भाव द्यायला हवा तो दिला जात नाही. अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी रस्त्यासाठी गेल्या. त्या कमी स्वेअर मीटरने दाखविल्या जातात. आम्ही या संघटनेच्या बॅनरखाली अनेक वर्षापासून जवळ आलो लढा देत आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे ते म्हणाले.
प्रारंभी दीपेश नाईक यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी ऍड. आल्वारीस व ऍड. शिरोडकर यांना आपल्याला असलेल्या शंका विचारल्या. त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले.