शिवसेनेविरोधात ‘ब्र’ सुद्धा काढणार नाही : पंतप्रधान

0
97
तासगाव (महाराष्ट्र) येथील भाजपच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आपण शिवसेनेविरोधात ब्र सुद्धा काढणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील एका प्रचारसभेत बोलताना सांगितले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तासगाव येथील या सभेत मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. पवार मराठा असले तरी त्यांच्यात शिवाजी महाराजांचे गुण नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेच्या पाणी समस्या ते सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेनेवर आपण टीका का करत नाही अशी राजकीय तज्ज्ञांकडून आपल्याला विचारणा केली जाते याकडे लक्ष वेधून मोदी यांनी सांगितले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्या मनात अपार आदर आहे. त्यांच्या गैरहजेरीतील ही पहिली निवडणूक असल्याने त्यांना आदरांजली म्हणून शिवसेनेविरोधात काहीच न बोलण्याचे आपण ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. काही गोष्टी राजकारणाच्याही वर असतात असे ते म्हणाले.
तासगाव मतदारसंघातून भाजपतर्फे अजित घोरपडे हे कॉंग्रेसचे माजी आमदार निवडणूक लढवित असून तेथे कॉंग्रेसतर्फे आर. आर. पाटील हे रिंगणात आहेत.
मोदी यांनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करीत शरद पवारांवर जोरदार टीका केली. मुंबईच्या विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे असे पवार यांना मुख्यमंत्री असताना वाटले नाही. ते काम तत्कालीन वाजपेयी सरकारने केले. व्हिक्टोरिया टर्मिनसचेही छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण वाजपेयी सरकारनेच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषीमंत्री असताना पवार यांनी पाणी व्यवस्थापनाबाबतचे शिवाजी महाराजांचे तंत्र वापरले असते तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नसत्या असा दावाही त्यांनी केला. आपल्या शिवभक्तीला आव्हान देऊन नये असा सल्लाही त्यांनी दिला.