‘त्या’ प्रसारणाबद्दल जावडेकरांकडून समर्थन

0
94

सरसंघचालकांचे भाषण दसर्‍याच्या दिवशी दूरदर्शनवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रसारण केल्याप्रकरणी टिकेची झोड उठल्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यासंदर्भात समर्थन केले आहे. दूरदर्शनमध्ये आपल्याला व्यावसायिकता आणायची असल्याचे कारण जावडेकर यांनी दिले. त्याआधी भाजपनेही या कृतीचे समर्थन केले होते. रा. स्व. संघाने नेहमी देशभक्तीला योगदान दिले असून सर्वांना न्याय या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला असल्याचा दावा भाजपने केला होता. या संदर्भात पत्रकार परिषदेत जावडेकर म्हणाले, ‘दूरदर्शन ही स्वायत्त संस्था आहे आणि आम्हाला तेथे व्यावसायिकता आणायची आहे. त्यामुळे त्यात काही चूक नाही आणि दूरदर्शनच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही.’ आम्ही दूरदर्शनवरील बंदी उठविली आहे. सरसंघचालक भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रसारण अन्य टीव्ही वाहिन्या करत असतात. मग दूरदर्शनने तसे केले तर त्यात काय चुकले असा सवालही जावडेकर यांनी केला. सदर भाषणावेळी भागवत यांनी हिंदुत्व ही देशाची ओळख असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसाही केली होती. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपच्या बाजूने लागेल असेही त्यांनी म्हटले होते.