शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यासाठी फडणवीस, शहांची गरज नाही

0
116

>> उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भाजपवर टीकेची झोड

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेच्या आमदाराला बसविण्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांची आपल्याला गरज नाही अस टोला शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत लगावीत भाजपावर घणाघाती टीकेची झोड उठवली. आपल्याला भाजपने खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीही त्यानी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्रात समसमान काळासाठी भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा ही आपली मागणी मान्य करण्यात आली होती याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे समसमान वाटून घेण्यावर काही ठरले नव्हते या फडणवीस यांच्या वक्तव्याला ठाकरे यांनी तीव्र हरकत घेतली. असे वक्तव्य करून भाजप व फडणवीस यांनी आपल्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला याबद्दल दु:ख होते असे ठाकरे यांनी वारंवार सांगितले.

२४ ऑक्टोबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आपण भाजपबरोबर एकही बैठक घेतली नव्हती. कारण आपल्याला खोटारडा म्हटल्याने आपण दुखावलो होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना नेत्यांनी टीकेचे लक्ष्य केल्याचा फडणवीस यांचा आरोप ठाकरे यांनी फेटाळला. आम्ही मोदींवर टीका केली नाही. मात्र धोरणांवरून आम्ही एनडीए सरकारवर वेळोवेळी टीका केली असे ठाकरे म्हणाले.