>> खासदार संजय राऊत यांची माहिती
शिवसेनेची गोव्यात ताकद आहे. आम्ही येणार्या विधानसभा निवडणुकीत २२ जागा लढवणार आहोत. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोंनी हैैदोस घातला आहे. कॅसिनोविरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आला. आता ते त्यांचे समर्थन करत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केली. खासदार राऊत हे काल बुधवारी गोवा दौर्यावर आले असून काल दाबोळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार श्री. राऊत यांचे काल बुधवारी दुपारी ३.३० वाजता गोवा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतास गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत व उपप्रमुख सुभाष केरकर, सरचिटणीस मिलिंद गावस आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील महिला आघाडीच्या व शिवसेना प्रमुख भक्ती खडपकर, रीया पाटील उपस्थित होत्या.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, गोव्यात शिवसेना २२ जागा लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची सध्याची गरज नाही. आमचा पक्ष मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. राऊत यांचा हा दोन दिवसांचा दौरा असून आज त्यांच्या उपस्थितीत काही आजी-माजी सरपंच, पंच, राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश करतील. तसेच पेडणे व मांद्रे येथील शिवसेना कार्यालयांचेही उद्घाटन केले जाणार आहे.