विद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करणार

0
25

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> कृतीदलाच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली राज्यातील विद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या शिफारशी जर कृतीदलाने मान्य केल्या तर दिवाळीच्या सुट्टीपूर्वी राज्यातील विद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोविडची लाट कधी येऊ शकते त्यासंबंधीच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाची बैठक पुढील महिन्याच्या प्रारंभी होऊ शकते. त्यावेळी हे कृतीदल तज्ज्ञांच्या समितीने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत कोणत्या शिफारशी केल्या आहेत त्याची माहिती देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कृतीदलाने टप्प्याटप्प्याने विद्यालये सुरू करण्यासाठी मान्यता दिल्यानंतर दहावी व बारावी इयत्तेचे व नंतर नववी व अकरावी इयत्तेचे वर्ग तसेच प्रॅक्टिकल्स सुरू करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
काल सावंत यांनी ‘नॅशनल इविशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्‌स ऍण्ड टिचर्स फॉर होलिस्टिक ऍडव्हान्समेंट’ (निष्ठा) ३.० या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना वरील माहिती दिली. ह्या कार्यक्रमांतर्गत २१ ऑक्टोबर ते २२ मार्च या दरम्यान राज्यभरातील ५६०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम असून एकत्रित ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षणाद्वारे हायस्कूल शिक्षणाचा दर्जा वाढवणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे.
याप्रसंगी पुढे बोलताना कोविड एसओपीचे पालन न करणार्‍या पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
इस्पितळात खाटांची उणीव नाही
राज्यातील सरकारी इस्पितळात खाटांची उणीव नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नाटक व तियात्र ५०%
क्षमतेने सुरू करण्यास मान्यता

सरकारने राज्यात नाटक व तियात्र यांचे प्रयोग ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोविडविषयक एसओपीच्या नियमांचे पालन करून ५० टक्के क्षमतेने नाटक व तियात्र प्रयोगांचे आयोजन करता येईल, असे ते म्हणाले. या निर्णयामुळे कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे.