लुईझिन फालेरो तृणमूलमध्ये दाखल

0
30

>> अन्य नऊ नेत्यांचाही कोलकाता येथे पक्षप्रवेश

आमदारकी व कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी बुधवारी कोलकोता येथे आयोजित एका कार्यक्रमात गोव्यातील अन्य नऊ नेत्यांसह रितसर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
फालेरो यांच्याबरोबर तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये मगो पक्षाचे माजी आमदार लवू मामलेदार, कॉंग्रेस पक्षाचा त्याग केलेले पक्षाचे माजी सचिव ऍड. यतीश नाईक व विजय पै (माजी सरचिटणीस), मारियो पिंटो द सांताना (माजी सचिव) व आनंद नाईक (माजी सचिव) त्याचबरोबर रवींद्रनाथ फालेरो (गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष), लेखक व सामाजिक कार्यकर्ते एन्. शिवदास, पर्यावरणवादी राजेद्र काकोडकर तसेच दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष क्लॉविस डिकॉस्टा आदींचा समावेश आहे.

तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काल बोलताना लुईझिन फालेरो यांनी, ममता दिदी ह्या प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढा देणार्‍या नेत्या आहेत. त्यांच्यासारख्या लढवय्या वृत्ती असलेल्या नेत्या मिळणे हे कठीण काम आहे. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हटविण्यासाठी विरोधकांनी सगळे काही केले. मात्र, त्यांचा निर्धार व धैर्य कमी करणे त्यांना शक्य झाले नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी, विविध राज्यांतील राज्यपाल हे सध्या भाजपचेच एजंट असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोपही केला.

अत्यंत आनंद ः ममता
काल कोलकोता येथे आयोजित एका कार्यक्रमात लुईझिन फालेरो यांच्यासह नऊ गोमंतकीय नेत्यांना तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश देताना मला अत्यंत आनंद होत असल्याचे म्हटले. आता आम्ही सगळेजण गोव्यासाठी एकत्रपणे उभे राहणार असून समाजात दुही माजवू पाहणार्‍यांविरुद्ध आम्ही लढा पुकारणार आहोत. गोव्यात एक सुखसमृद्धीची व शांततेची पहाट उगवल्याचे आता गोमंतकीय जनतेला लवकरच पाहायला मिळणार असल्याचे ममता यांनी पुढे सांगितले.