शिंका करिती हैराण!

0
621

– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

थंड पाणी, गारवा, धूलीकण, पराग, धुकं, गंध, विविध प्रकारचे अन्नपदार्थ, विशिष्ट वातावरण इ. असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत. परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून, घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात.

प्रातःकाल, कोंदट वातावरण, थंड वातावरण, फुलांचा वास, रात्री जागरण व दिवसा झोप, प्रवास, रात्री फॅनचा अतिवापर, धुळीचे वातावरण, ऋतुबदल, मल-मूत्र धारण इ. शिंका येण्याची विहारीय कारणे आहेत.

काहींचा दिवस उजाडतो तोच मुळी शिंकांनी. १०-१५ शिंका सरासर येतात, अगदी हाफ सेंच्युरीपण करतात. नुसतं बेजार व्हायला होतं. सकाळी- सकाळी नुसती चिडचिड. सगळ्यांनाच राग. शिंका येतातच पण त्याबरोबर नाकातून पाणी येणे, डोळ्यांतून पाणी येणे, नाकात खाज येणे, घशात खवखव, नाकाने श्‍वास घ्यायला त्रास ही लक्षणे आहेतच. जीव नुसता हैराण होतो.वर हे सगळे प्रकार सकाळचे नऊ वाजेपर्यंत आटोपतात. पुढे दिवसभर काहीच नाही. मग याला आजार तरी कसला व का म्हणावे?
या शिंकांना आधुनिक शास्त्र ‘ऍलर्जी’ म्हणतं. ऍलर्जीचा परिणाम नाकात, सायनसमध्ये, फुफ्फुसांमध्ये तसेच त्वचेवरही दिसतात. ‘मला धुळीची किंवा रंगाची किंवा वार्‍याची किंवा थंड/गरम पदार्थ इत्यादींची ऍलर्जी आहे… अशा प्रकारची वाक्ये तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐकली असतील व अनुभवलीसुद्धा असतील. तर मग नक्की ‘ऍलर्जी’ म्हणजे काय?
ऍलर्जी म्हणजे निसर्गातील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक असतो. कारण या घटकांच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होऊन हिस्टामिन नावाचे द्रव्य तयार होते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास थंड पाणी, गारवा, धूलीकण, पराग, धुकं, गंध, विविध प्रकारचे अन्नपदार्थ, विशिष्ट वातावरण इ. असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत. परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून, घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात.

तरीही हे पदार्थ तसेच राहिल्यास त्या ठिकाणी सूज येते व स्राव पाण्याप्रमाणे येतो व नंतर तो कफाप्रमाणे चिकट होतो. अशा सहन न होणार्‍या पदार्थापासून वरील लक्षणे उत्पन्न होतात. अशा गोष्टी संपर्कात येतात तेव्हा प्रत्येक वेळी ‘ऍलर्जी’ उत्पन्न होते.
ऍलर्जन म्हणजे काय?
– ऍलर्जी हे उपसर्ग निर्माण करणारे बाह्य पण निसर्गात आढळणारे द्रव्य असतात. ही द्रव्ये बहुतांश वेळा प्रोटीन किंवा ग्लायको-पेप्टाईड्‌स असतात. ज्या द्रव्यांचे वजन कमी असते, त्यांना शरीरात सहज मिसळता येते. ज्यांना त्वचेमधून किंवा नाकातून आत शिरता येते ते जास्त उपसर्ग करणारे समजले जातात. नाकाद्वारे शरीरात जाणारे ऍलर्जन म्हणजे पोलन, बुरशी, प्राण्यांचे केस, खाद्य पदार्थातील ऍलर्जन तोंडातून अगर पोटाच्या आंतर त्वचेमधून शरीरात शिरतात. ज्या रुग्णांमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी असते अशा रुग्णांमध्ये ‘ऍलर्जी’ लगेच होते व जास्त दिवस टिकून राहते.
आधुनिक शास्त्रानुसार ऍलर्जीवर ‘इम्युनोथेरपी’ उपयोगी आहे असे म्हणतात. या उपाया्‌ंमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी्र होण्याकरिता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.

आयुर्वेद दृष्टीकोनातून ऍलर्जी ही एक अवस्था आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या शरीरातील वात-पित्त-कफ या त्रिदोषाची विकृत अवस्था प्रकोप आहे. जोपर्यंत ही अवस्था असेल तोपर्यंत रुग्णांना ऍलर्जी होईल. तसेच त्रिदोषांच्या विकृत अवस्थेला अनुकूल आहार सेवन व वातावरणाचा सहवास रुग्णांनी केला असेल तर ऍलर्जीची लक्षणे तीव्र स्वरूपात जाणवू लागतात. ही ऍलर्जी म्हणजेच ‘शिंका येणे’.

काही जणांना वर्षभर शिंका येतात तर काहींना फक्त काही ऋतूंमध्ये, प्रामुख्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात, थंड वातावरणात शिंका यायला सुरुवात होते. पावसाळ्यात भिंतीवर ओल येऊन काळ्या-पांढर्‍या ठिपक्यांची बुरशी येते. या बुरशीचे कण हवेत मिसळळ्याने काहींना शिंका यायला सुरुवात होते. काहींना सकाळी उठल्यावर शिंका येतात. दिवसभर शिंकेचे नावही नाही व संध्याकाळी मात्र डोके वर काढते.

शिंका येण्याची कारणे –
अनियमित आहार सेवनाने तसेच वातावरणातील बदलाने वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा प्रकोप होतो. या त्रिदोषाच्या प्रकोपामुळे नाकाच्या आतील भागात सूज निर्माण होते. तो भाग नाजूक बनतो. जेव्हा रुग्ण थंड वातावरण, उग्र वास, धूळ, धुर, सुगंधी द्रव्य इत्यादींच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचा सहवास नाकाला सहन होत नाही. शरीर त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असते.
शिंका वाढवणारा मुख्य आहार म्हणजे थंड पदार्थ (शीत पेय, अतिथंड पदार्थ (आइसक्रीम), अति आंबट पदार्थ (फार दिवसांचे दही, चिंच, आंबवलेले पदार्थ), गुरु आहार (कच्ची फळे, फास्ट फुड, बेकरी पदार्थ, शिळे अन्न, श्रीखंड इ.)
प्रातःकाल, कोंदट वातावरण, थंड वातावरण, फुलांचा वास, रात्री जागरण व दिवसा झोप, प्रवास, रात्री फॅनचा अतिवापर, धुळीचे वातावरण, ऋतुबदल, मल-मूत्र धारण इ. शिंका येण्याची विहारीय कारणे आहेत.

लक्षणे –
– एकाएकी शिंका सुरू होतात व त्याबरोबर नाकातून पातळ स्राव येतो. तसेच नासावरोध होतो.
– शिंका अधिक प्रमाणात आल्याने रोगी थकतो. डोळ्यातून स्राव येतो.
सामान्य चिकित्सा
स्नेहन – औषधीसिद्ध घृत किंवा तेलाचे बिंदू नाकात सोडल्याने नाकातील श्‍लेष्मल त्वचेचे स्नेहन होते.
स्वेदन – स्थानिक स्वेदनामुळे नासा विवरातील कफजन्य दोष नष्ट होतात. असे दोष शरीराबाहेर वा नाकाबाहेर काढणे सोपे जाते.
शिरोभ्यंग – शिरस्थित वातजन्य दोषांचे शमन करण्याकरिता याचा उपयोग होतो.
वमन – शरीरातील कफदोषाचे निर्हरण व परिणामतः नाकातील कफाचे निर्हरण करण्याकरिता वमन चिकित्सा करावी.
धूम – निरनिराळ्या दोषहर द्रव्यांचा याकरिता उपयोग करावा. त्यामुळे नासाश्रित व उर्ध्वजत्रुगत दोषांचे निर्हरण होते. घृत, तेल व सातु यांचा धूर घेतल्याने शिंका यायच्या कमी होतात.
– शिंका या रोगात ‘गोघृत पाना’ला विशेष महत्त्व दिले आहे,
– बरेचदा अवपीडन नस्याचा चांगला उपयोग होतो.
– विशेष म्हणजे रोज रोज ज्यांना शिंकांचा त्रास आहे त्यांनी, जरी नस्य घेता आले नाही तरी दररोज तेलात किंवा तुपात स्वतःच बोट बुडवून, तेलाचे लेपन नाकामध्ये करावे. खूप छान उपयोग होतो.
– दररोज सकाळी च्यवनप्राश सेवन केल्याने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते व परिणामतः शिंका येत नाही.
आभ्यंतर चिकित्सेमध्ये शुंठ्यादी चूर्ण, लवंगादी वटी, आरोग्यवर्धिनी, गंधकरसायन, त्रिभुवनकीर्ती रस, कज्जली, अभ्रक भस्म, कर्पादिक भस्म, रससिंदूर, लक्ष्मीविलास रस इत्यादीचा योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.
पथ्यकर आहार – विहार
– भोजनामध्ये गहू, जव, हरभरा यांची चपाती व कुलत्थ अळीव, मसुर, हरभरा यांच्या डाळी, मुळ्याचे कढण सेवन करावे.
त्याचप्रमाणे मांसरस, त्रिकटुयुक्त घ्यावा.
– जुन्या तांदळाचा भात सेवन करावा.
– दही अभिष्यंदी असूनही गूळ, मिर्‍यासोबत खावे.
– लघु आहार गरम, सैंधव व घृतयुक्त असावा.
– भाज्यांमध्ये मुगाच्या शेंगा, काकडी, पडवळ, पालक, चवळी, वांगे, शेवगा, कच्चे मुळे, मेथी यांचे सेवन करावे.
– साधारणपणे मसाल्यामध्ये हिंग, जिरे, मेथी, काळे मिरे, लवंग, वेलची, दालचिनी, धने यांचा उपयोग करावा.
– फळांमध्ये संत्री, अंजीर, पिकलेला आंबा, टरबूज, डाळिंब, अननस, द्राक्षे, लिंबू आदी हितकर आहेत. अन्य फळांचे सेवन करताना ती सुठ, त्रिकटू, सैंधव, आले यांच्याबरोबर खावीत.
– आहारामध्ये तिखट व आंबट पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. लिंबुवर सैंधव व काळ्या मिर्‍याचे चूर्ण घालून चोखावे. तसेच आवळे, पुदिना, जिरे, सैंधव आणि काळे मिरे यांची चटणी करावी.
– मिष्टान्नामध्ये मूग किंवा हरभर्‍याचे लाडू, गाजराचा हलवा, आदींचे सेवन प्रातःकाळी करावे. तसेच बदाम, पिस्ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी वाटून तूप, काळे मिरे, साखर टाकून शिरा खावा.
– भोजनोत्तर दशमूलारिष्ट, द्राक्षासव सेवन केल्यास हितकर, पथ्यकर, विहार …
– खुल्या हवेत रहावे.
– रोज थोडा तरी व्यायाम करावा.
– शीत वायू, पावसाळी व वादळी वार्‍यापासून संरक्षण करावे. अंगावर जाड व गरम कपडे घालावेत. डोके गरम कपड्याने गुंडाळावे अशा रीतीने पथ्यकर विहार करावा.
अपथ्यकर आहार – विहार
– रुक्ष पदार्थ. उदा. मैदा, वाटाणे, हरभरे वर्ज्य करावे.
– कफप्रकोपक व अभिष्यादि पदार्थ उदा. आतूप मांस, मासे, खवा, मलई, उडदाची डाळ, उडदाचे वडे, कचोरी अहितकर.
– भाज्यांमध्ये केळी, रताळी, बटाटे, अहितकर.
– पेयांमध्ये शीतजल, पावसाचे पाणी, सरबत, बर्फ वर्ज्य.
अपथ्यकर विहार
– दिवसा झोपणे, रात्री जागरण, झोपून उठल्यानंतर जलपान करणे (बर्‍याच जणांना अनशा पोटी सकाळी उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय आहे, ती पूर्णतः चुकीची आहे.
तसेच खूप घाम आल्यावर लगेच पाणी पिणे अहितकर.
– मोकळ्या हवेत उघड्या अंगाने फिरणे,
– डोक्यावरून सतत स्नान करणे,
– शोक, क्रोध, अधिक निद्रा
– मलमूत्रादी वेगांचे धारण
– जमिनीवर झोपणे इ. अहितकर आहे.