‘शाहरूख खानने सिनेमाचे शिक्षण अर्ध्यावर सोडले होते’

0
103

सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते शाहरूख खान हा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अभिनयाचे धडे गिरवत होता. पण तो अभ्यासक्रम अर्ध्यावरच सोडून निघून गेल्याने आपणाला फार वाईट वाटले होते. कारण या मुलामध्ये प्रचंड प्रतिभा असून तो मोठा अभिनेता होऊ शकतो हे आपण तेव्हाच जाणले होते, असे या विद्यापीठाचे एक शिक्षक बी. दिवाकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.विद्यापीठाचा एक विद्यार्थी सत्यजीत गानू याचा चित्रपट इंडियन पॅनोरमात दाखवण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात एक चित्रपट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ‘श्रीनिवासन्’ ही आपली शॉर्टफिल्म एका मुलाच्या भावविश्‍वावर प्रकाशझोत टाकणारी फिल्म आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजीत गानू यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सत्यजीत गानू यांची श्रीनिवासन् ही शॉर्टफिल्म ‘स्टुडंट्‌स फिल्म’ या विभागातून दाखवण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
चित्रपटातील नायकाचे बालपण एका प्रकारे हरवलेले असते. या मुलाच्या काही अपुर्‍या इच्छ-अकांक्षा असतात. शाळेत शिक्षक त्याला एक निबंध लिहिण्यास सांगतो तेव्हा तो त्या जीवनात काय हवे आणि काय नको ते त्या निबंधातून व्यक्त करतो. या निबंधातून एका प्रकारे त्याचे भावविश्वच उलगडत जाते, अशी ही कथा आहे.
आपण फिल्म इन्स्टिट्युटचा विद्यार्थी असून प्रॉजेक्ट म्हणून आपणाकडून ही शॉर्टफिल्म तयार करून घेण्यात आल्याचे गानू यांनी यावेळी सांगितले.