शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यास विरोध

0
12

>> ५० टक्के विद्यालयांचे पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समित्यांची नकारघंटा

राज्य सरकारच्या सरकारी विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याच्या प्रस्तावास सुमारे ५० टक्के विद्यालयांचे पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समित्यांनी विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलताना राज्यातील सरकारी विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याची घोषणा केली होती. शिक्षण खात्याने सरकारी विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचे पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समित्यांना पत्र पाठवून शाळांसाठी स्वातंत्र्यसैनिकांचे नाव सुचविण्याची सूचना केली होती. मात्र ५० टक्के विद्यालयांनी विद्यालयांचे नाव न बदलण्याची विनंती केली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

विद्यालयांना देण्यात येणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांबाबत एकमत होत नसल्याने आता शिक्षण खात्याने गोवा स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आणि सरकार दरबारी नोंद असलेल्या ७४ हुतात्म्यांची नावे वद्यालयांना पाठविली असून, त्या नावांचा विचार करण्याची सूचना केली आहे. तसेच येत्या १५ डिसेंबरपर्यंत विद्यालयांना नाव कळविण्याची सूचना केली आहे. त्यानंतर विद्यालयांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याबाबत सरकार अंतिम निर्णय घेणार आहे, असे झिंगडे यांनी सांगितले.