शहांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटात नीरव शांतता

0
8

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथे म्हादईप्रश्नी केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात म्हादईचा विषय चांगलाच पेटला आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तसेच काल ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्येही म्हादई प्रश्न गाजला. असे असले तरी गोवा भाजपमध्ये नीरव शांतता दिसून येत आहे. भाजप पक्षनेत्यांकडून म्हादईप्रश्नी अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आलेली नाही.
एरव्ही या ना त्या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावणारे भाजप नेते आता चिडीचूप असल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. अमित शहांचे वक्तव्य म्हणजे भाजप नेत्यांसाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती आहे. वक्तव्याचा विरोध केला तर वरिष्ठ नेत्यांचा कोप आणि विरोध नाही केला तर जनतेचा कोप अशी स्थिती झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई जलतंटा प्रश्नी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. म्हादई प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिका प्रलंबित आहेत, असे म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून म्हादईप्रश्नी गोव्याला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादईप्रश्नी केलेल्या वक्तव्यानंतर आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ पोलीस सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर म्हादई प्रश्नावरून मोर्चा किंवा निदर्शने केली जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सभागृह समितीची तातडीची बैठक बोलवा;
विजय सरदेसाईंकडून शिरोडकर यांना निवेदन

अमित शहा यांनी म्हादईप्रश्नी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर म्हादई विषयावरील सभागृह समितीची तातडीची बैठक बोलाविण्याची विनंती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी या समितीचे अध्यक्ष तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे काल एका निवेदनाद्वारे केली. शहा यांनी म्हादई जलतंटा प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेण्यात आल्याचे वक्तव्य केले आहे. या प्रकरणी सत्य जनतेसमोर येण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.