शरिफांची बदमाशी

0
91

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेपुढे अपेक्षेनुरुप काश्मीरचा राग आळवला. त्यांच्या वीस मिनिटांच्या भाषणाचा बहुतेक भाग काश्मीरसंबंधीच होता. एकीकडे दहशतवादाविरुद्ध आपण कसे योगदान देत आलो आहोत याचे गुण गात असताना दुसरीकडे काश्मीरमधील दहशतवादाला आपली पाठराखण कशी आहे त्याचे जणू पुरावेच शरीफ यांनी आपल्या भाषणात दिलेे. हिज्बुलचा मारला गेलेला दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख जेव्हा शरीफ ‘‘भारतीय सैन्याने हत्या केलेला तरूण नेता’’ असा करतात तेव्हा त्यांच्या शरीफ चेहर्‍याआडच्या बदमाशीचे पितळ उघडे पडल्याविना राहत नाही. काश्मिरी जनतेच्या ‘स्वयंनिर्णयाच्या अधिकारा’ची पाठराखण करताना आणि तेथील ‘मानवाधिकारांच्या हनना’ची बात करताना शरीफ गिलगिट – बलुचिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हत्येबाबत मात्र चकार शब्द काढत नाहीत! उरीतील हल्ल्याबाबत बोलत नाहीत!! त्यांच्या दिखाऊ भारतप्रेमाचा भर एव्हाना पूर्णतः ओसरला आहे. त्यामुळे द्विपक्षीय वाटाघाटींचा पुरस्कार करणारे शरीफ आता ‘चर्चा हे पाकिस्तानवर उपकार नव्हेत’ अशी भाषा करू लागलेले दिसतात. आपला देश भारताशी चर्चा करण्यास तयार आहे, पण भारत पूर्वअटी लादतो असे म्हणणारे शरीफ वास्तविक काश्मीरविना चर्चेचा चकार शब्द काढायला तयार नसतात. भारताला पावलोपावली टोमणे मारत चाललेले त्यांचे संयुक्त राष्ट्रांपुढील भाषण हे ‘चोराच्या उलट्या’ म्हणतात, त्याचा उत्तम नमुना ठरावे. आपला देश दहशतवादाचा बळी ठरला आहे आणि त्यामागे विदेशी शक्तीचे पाठबळ व प्रायोजकत्व आहे असे सांगत शरीफ यांनी भारतालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रकार केला. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीविना भारत व पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित होणे शक्य नाही हे त्यांचे विधान म्हणजे तर भारताला दिलेली सरळसरळ धमकीच मानायला हवी. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अधिक चिघळण्याचा धोका जेव्हा ते व्यक्त करतात तेव्हा यापुढील काळात काश्मीरमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल याचेच जणू ते सूतोवाच करतात. आपल्या भाषणात त्यांनी ‘‘काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या मागणीला पाकिस्तान पूर्णतः पाठिंबा दर्शवीत आहे’’ असे अगदी लख्ख शब्दांत सांगून टाकले आहे. त्यामुळे एकीकडे काश्मीरमधील हिंसाचाराबाबत काखा वर करणार्‍या पाकिस्तानचा या सगळ्या घातपाती कारवायांना कसा अधिकृतरीत्या पाठिंबा आहे याचा आणखी कसला पुरावा आता हवा? काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाला त्यांनी घातलेले साकडे नंतर बान की मून यांनी फेटाळून लावले हा भाग वेगळा, परंतु पाकिस्तान काश्मीरच्या विषयात आता छुपेपणाने नव्हे, तर उघडउघड लुडबूड करू लागला आहे आणि पाठबळ देऊ लागला आहे हे स्पष्ट दिसू लागले आहे. त्यामुळे अशा देशापुढे यापुढे मैत्रीची गुर्‍हाळे घालून आणि गळाभेटींतून हा प्रश्‍न सुटेल अशी भोळी अपेक्षा ठेवून केलेले प्रयत्न व्यर्थच ठरतील. ठोशास ठोसा हीच आक्रमक नीती भारताला यापुढे अवलंबावी लागेल. एक जबाबदार राष्ट्र म्हणून वागत असतानाच पाकिस्तानकडून काढल्या जाणार्‍या कुरापतींना सहन केले जाणार नाही हा संदेशही जायला हवाच. पाकिस्तान भारताला ओढत असलेल्या सापळ्यात न अडकता, परंतु जगाला आपल्यासोबत घेत पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याची जबाबदारी आता आपल्या नेत्यांची आहे. येत्या सोमवारी सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रांपुढे बोलतील तेव्हा पाकिस्तानला उघडे पाडतीलच, परंतु उघडउघड भारताविरुद्ध डरकाळ्या फोडणार्‍या पाकिस्तानच्या वर्मावर ठोसा लगावण्याची वेळ आली आहे.