शपथ तुला आहे…

0
22

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यामध्ये नेमके काय होणार याबाबत सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये मोठीच धाकधूक दिसते. कोणत्याही पक्षाला येणारी निवडणूक सरकार बनविण्याएवढ्या मताधिक्क्याने जिंकण्याचा आत्मविश्वास उरलेला नाही आणि त्यामुळे त्रिशंकू विधानसभेची स्थिती उद्भवल्यास राजकीय घोडेबाजाराला ऊत येईल ही शक्यताही बहुतेकांना दिसते. काहींनी अशा घोडेबाजाराची तयारी निवडणुकीआधीपासूनच चालवलेली आहे, तर काहींनी आपले निवडून येणारे आमदारही शेवटच्या क्षणी दुसर्‍या पक्षात उडी टाकून निघून जाऊ नयेत यासाठी हरेक प्रकारे त्यांना कोणत्या ना कोणत्या बंधनात अडकवण्याची केविलवाणी धडपड चालवलेली आहे. कोणी या आपल्या उमेदवारांना पक्षत्याग न करण्याची शपथ देते आहे, तर कोणी त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर पक्षातून फुटणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेते आहे. देवापुढे किंवा क्रॉसपुढे जाऊन शपथा घेतल्या किंवा प्रतिज्ञापत्र लिहून दिले म्हणून उद्या सत्तेत घुसायची संधी चालून आली तर कोणी खरोखरच पक्षांतर केल्याखेरीज राहणार आहे का हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. एवढ्या उच्च नीतीमत्तेचे मायके लाल गोव्याला अजून लाभायचे आहेत!
गोव्यातील राजकीय नीतीमत्ता एवढी ढासळलेली आहे की काहीही करून सत्तेत जायचे हाच तर सर्वांचा मूलमंत्र झालेला आहे. बहुतेकजण केवळ आणि केवळ सत्ता उपभोगण्यासाठीच राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आहेत आणि या ना त्या पक्षाचा आसरा घेऊन निवडून येण्याच्या प्रयत्नात आहेत. निव्वळ जनसेवा किंवा समाजसेवा करण्याच्या उदात्त हेतूने यापैकी कोणीही राजकारणात यायला निघालेले नाही. त्यामुळे नीतीमत्ता, पक्षनिष्ठा वगैरे कशाशी खातात याचा त्यांना थांगपत्ता असण्याची अपेक्षाही बाळगता येत नाही.
गोव्याच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक घाऊक पक्षांतरे या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये झालेली आहेत. ऐंशी – नव्वदच्या दशकामध्ये राजकीय अस्थिरता गोव्याच्या पाचवीलाच पुजलेली दिसत होती. सुदैवाने नंतर काही काळ राजकीय स्थैर्य आले, परंतु गेल्या वर्षभरामध्ये जी काही पक्षांतरे झाली, त्यातून पुन्हा एकवार गोव्याच्या ताटात अस्थिरता वाढून ठेवलेली नाही ना अशी चिंता वाटते. स्थैर्य आणि विकास हे नेहमीच हातात हात घालून चालत असतात. परंतु स्थैर्यासाठी राजकीय घोडेबाजार जर अपरिहार्य ठरणार असेल तर असे स्थैर्य हे तकलादूच ठरते हे गोव्याने यापूर्वीच अनुभवले आहे. आज विविध राजकीय पक्ष आपापल्या मेंढ्या एकत्र कळपात राखण्यासाठी ज्या प्रकारे धडपडत आहेत ते पाहता खरोखर कीव येते.
आपण निवडणुकीनंतर फुटून दुसर्‍या पक्षात जाणार नाही हे देवाच्या आणि क्रॉसच्या साक्षीने सांगणारे खरोखर एवढे पापभिरू आहेत? शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर पक्षांतर न करण्याची वचने देणारे उद्या संधी येताच ही प्रतिज्ञापत्रे गुंडाळून उड्या टाकणार नाहीत कशावरून? पक्षांतरे करताना ‘आपल्या मतदारसंघाचा विकास’ किंवा ‘आपल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा’ ही ठराविक साच्याची कारणे आपला स्वार्थ साधताना ही मंडळी पुढे करीत असते. मुळाशी असतो तो अर्थातच स्वार्थ!
राजकीय पक्षांमधील निवडणूक ही खरे तर विचारांची लढाई असायला हवी. वेगवेगळ्या विचारधारांचा तो संघर्ष असायला हवा. परंतु येथे पक्षांपाशी विचारधारा उरली आहे कोठे? सत्तेसाठी दिसेल त्याला आयात करायचे आणि विनेबिलिटी पाहून सोम्यागोम्याला उमेदवारी द्यायची हाच जर सर्वांचा मंत्र झालेला असेल तर विचारधारेशी बांधिलकीची अपेक्षा मतदाराने बाळगणेच खरे तर गाढवपणाचे ठरेल. विचारधारेशी बांधिलकी नसल्यानेच कोणीही उठतो आणि राजकीय सोय पाहून कुठेही, कोणाच्याही आसर्‍याला जातो हेच तर सर्वत्र घडताना दिसते आहे. त्यामुळे अशा स्वार्थी उमेदवारांनी आणि मतलबी राजकीय पक्षांनी भले शपथा घेतल्या काय, वचने दिली काय किंवा प्रतिज्ञापत्रे लिहिली काय, मतदारांनी यांच्यावर विश्वास ठेवावा कसा?
जे पक्ष आपल्या उमेदवाराना न फुटण्याचे बंधन घालू पाहात आहेत, त्यांनी इतर पक्षांतून फुटून आलेल्यांना मुळात आपल्या पक्षात आसरा कसा दिला हाही प्रश्न उपस्थित होतोच. इतर पक्षांतून आलेल्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकिटे देणार्‍यांनी आपल्या उमेदवारांनी दुसरीकडे जाऊ नये म्हणणे हाच मुळात विनोद आहे. गेल्या निवडणुकीनंतर रातोरात जे स्वतःच फुटले, निव्वळ सत्तेसाठी ज्यांनी भूमिका बदलल्या, टोप्या फिरवल्या त्यांनाही आता आपल्या पक्षाचे उमेदवार फुटू नयेत असे वाटते आहे याला काय बरे म्हणायचे?