व्हिजुअल लिंकचा सलग दुसरा विजय

0
86

>> डिचोली-सत्तरी ब विभाग क्रिकेट

सलामीवीर सारंग भार्गवचे दमदार अर्धशतक आणि मनोज वरक व चेतन परब यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हिजुअल लिंक क्रिकेटर्सने साखळी जिमखाना संघाचा ७२ धावांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित डिचोली-सत्तरी ब विभाग क्रिकेट स्पर्धेत आपल्या सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली.

प्रथम फलंदाजी करताना व्हिजुअल लिंक क्रिकेटर्सने सर्व गड्यांच्या मोबदल्यात १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पहिल्या लढतीत नाबाद १३३ धावांची शतकी खेळी केलेल्या सलामीवीर सारांश भार्गवने दुसर्‍या लढतीतही ७५ धावा कुटल्या. आकाश परबने २२, झिदान खानने १९ तर गोपाल वाघमारेने १७ धावांचे योगदान दिले. साखळी जिमखानातर्फे प्रसाद सुर्लेकरने ३६ धावांत ४, रुपेश तारीने २५ धावांत २ तर बाळकृष्ण काणेकरने ४४ धावांत २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात खेळताना साखळी जिमखानाचा संघ १०८ धावांवर गारद झाला. तुकाराम नाईकने ३७, नितिन पार्सेकरने १८ तर शिवरामने ८ धावांचे योगदान दिले. व्हिजुअल लिंगतर्फे ऑफस्पिनर मनोज वरकरने १६ धावांत ५ तर द्रुतगती गोलंदाज चेतन परबने १५ धावांत ४ बळी मिळवित विजयात मोलाचा वाटा उचलला.