वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ बंधनकारक, जीसीईटी रद्द

0
81

>>सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा

वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश ‘नीट’ या समान प्रवेश परीक्षेनुसारच होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या सीईटी होणार नाहीत असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गोव्यात घेण्यात येणारी जीसीईटी प्रवेश परीक्षा यापुढे घेण्यात येणार नसून विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी होणार्‍या ‘नीट – २’ परीक्षेला बसणे बंधनकारक ठरणार आहे.
‘सीईटी’ आणि ‘नीट’ या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने गोव्यासह आठ राज्यांनी या परीक्षेला न्यायालयात आव्हान दिले होते. शेवटच्या क्षणी जीसीईटी रद्द केल्याने विद्यार्थ्यांना नैसर्गिक न्यायापासून वंचित राहावे लागणार आहे. या कारणामुळे केवळ यंदाच्या वर्षी जीसीईटी घेण्यास मान्यता द्यावी. मान्यता देणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सर्वांना २४ जुलै रोजी ‘नीट -२’ प्रवेश परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, अशी मागणी गोव्यातर्फे उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने जीसीईटी घेण्याची मागणी फेटाळत ‘नीट’ परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना आता २४ जुलै रोजी होणार्‍या ‘नीट – २’ परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. न्यायालयाने २९ एप्रिल रोजी २०१६-१७ च्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश नीट परीक्षेनुसारच होतील असे स्पष्ट केले होते.