बाबूशच्या कोठडीत तीन दिवसांनी वाढ

0
159

एका अल्पवयीन नेपाळी मुलीवर कथित बलात्कार केल्याचा आरोप असलेले सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबूश मोन्सेर्रात व पीडित मुलीच्या सावत्र आईला काल विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा आदेश दिला.

बाबूशची पुन्हा मनोविश्‍लेषण चाचणी
आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी अटकेनंतर स्वत:च आपल्या छातीवर जखमा करून घेतल्या असल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची मनोविश्‍लेषण चाचणी केली होती. काल दुसर्‍यांदा त्यांची अशीच चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्याचबरोबर काल गोमेकॉत दुसर्‍यांदा बाबूश यांची पुरुषत्वाची चाचणीही घेण्यात आली.

पोलिसांतर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील नीता मराठे यांनी बाबूश व पीडित मुलीच्या सावत्र आईच्या कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. आमदार बाबूश मोन्सेर्रात चौकशी अधिकार्‍यांना सहकार्य करीत नाहीत. सखोल चौकशीसाठी प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयाने दिलेली तीन दिवसांची कोठडी अपुरी असल्याचे सरकारी वकील मराठे यांनी न्यायालयाला सांगितले. बाबूश यांचे वकील सरेश लोटलीकर यांनी प्रतिवाद करताना त्यांचे अशील आमदार बाबूश मोन्सेर्रात तपासकार्यात पोलीस अधिकार्‍यांना सहकार्य करीत असल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश देशपांडे यांनी बाबूश यांच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांनी वाढ करण्याचा आदेश दिला. मुलीचा सौदा केल्याप्रकरणी अटकेत असलेली पीडित मुलीच्या सावत्र आईलाही न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आमदार बाबूश व पीडित युवतीच्या सावत्र आईला पोलिसांनी ५ मे रोजी अटक केली होती. अटकेनंतर दुसर्‍या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही तीन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, बाबूश मोन्सेर्रात यांच्या वकिलाने अद्याप आपल्या अशिलाच्या जामिनासाठी अर्ज केलेला नाही. बाबूश यांचे वकील ऍड. राजीव गोम्स यांनी आपण जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, पीडित युवतीची सावत्र आई पुढील आठवड्यात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे वृत्त आहे.