वेळीच नांगी ठेचा

0
160

आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेला गोवा सांताक्रुझमधील टोळीयुद्धाच्या वार्तेने हादरला आहे. सांताक्रुझ, मेरशी, कालापूर, ताळगाव गावे ही एकेकाळी गुंडगिरीची केंद्रे म्हणून कुख्यात होती. वेळोवेळी या टोळीयुद्धांना तोंड फुटत असे आणि भररस्त्यात रक्ताचे सडे पाडले जात. पुढे पुढे त्या गावांमध्ये अन्य ठिकाणांहून आलेल्या मध्यमवर्गीयांची वस्ती वाढत गेली आणि गावांचा चेहराही बदलू लागला. गेल्या काही वर्षांत या गुंडगिरीच्या प्रकारांनी डोके वर काढलेले नव्हते, परंतु आता पुन्हा एकवार सांताक्रुझमध्ये ज्या पद्धतीने हे टोळीयुद्ध रंगले, ते पाहाता या वर आलेल्या गुंडगिरीच्या बांडगुळाला काट्याचा नायटा होण्यापूर्वी वेळीच छाटून टाकणे गरजेचे भासते आहे.
पोलिसांनी सांताक्रुझ टोळीयुद्धातील सर्व सूत्रधारांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडले ही कौतुकाची बाब आहेच, त्यासाठी त्यांना तात्काळ जातीने बक्षिसे वगैरे जाहीर करण्यात आली हे ठीक, परंतु मुळामध्ये राज्याच्या पोलीस मुख्यालयापासून जेमतेम पाच किलोमीटरच्या परिघात असलेल्या सांताक्रुझच्या परिसरामध्ये जवळजवळ वीस सशस्त्र गुंडांना अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची हिंमतच कशी होते हा खरा सवाल आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक असता तर अशा प्रकारे हल्ला चढवण्यासाठी गुंडपुंड धजावले नसते. त्यामुळे कायद्याचा हा हरवलेला धाक निर्माण करण्यासाठी अशा गुंड मवाल्यांविरुद्ध मोहीम राबवून हे पुन्हा रुजू पाहत असलेले गुंडगिरीचे अंकुर समूळ छाटले जाण्याची गरज सांताक्रुझची ही घटना व्यक्त करते आहे.
एकेकाळी या सार्‍या परिसरात प्रोटेक्टरच्या गुंडांनी धुडगूस घातला होता. स्थानिक राजकारणी महिला नेत्याच्या पुत्राने या गुंडांच्या बळावर आपला मोठा दरारा निर्माण केला होता. खंडणीखोरी, अपहरणे यांना नुसता ऊत आला होता. तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांनी कोणाचाही मुलाहिजा न राखता त्याविरुद्ध कडक पावले उचलली आणि त्या गुंडगिरीचा पुरता निःपात तेव्हा केला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्या टोळीला अशी काही दहशत बसवली की पुन्हा त्या वाटेने जाण्याचे धाडस बरीच वर्षे कोणाला झाले नाही. आजही अशा टोळीयुद्धाच्या घटना समोर येतात तेव्हा रवी नाईक यांच्या त्या कारकिर्दीची आठवण गोव्याची जनता काढत असते.
मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळामध्येही अशा प्रकारे काही वेळा गुंडगिरीने डोके वर काढले होते. अगदी दिवसाढवळ्या मेरशी परिसरामध्ये तलवारीने टोळीयुद्धे लढली गेली होती. खून पाडले गेले होते. त्या टोळ्यांच्या कुख्यात म्होरक्यांनी आपली दहशत निर्माण केली होती. परंतु पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे मनावर घेतले तर अशा गुंडांना नरम करण्यास त्यांना काही तास पुरेसे ठरतात. एकदा परप्रांतीय पर्यटकांवर मेरशीत क्षुल्लक कारणाने खुनी हल्ला चढवण्यात आला होता. तेव्हा पर्रीकर यांनी देखील ते अतिशय गांभीर्याने घेऊन खमकेपणाने या गुंडगिरीचा बंदोबस्त केला होता. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी सुद्धा ही आपला खमकेपणा दाखवण्याची वेळ आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने सांताक्रुझ टोळीयुद्धाच्या संपूर्ण चौकशीचे आदेश त्यांनी द्यावेत आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांचा वेळीच बंदोबस्त करावा. एकदा का असे प्रकार पचून जातात असे दिसले की त्यांची पुनरावृत्ती होत राहते. त्यामुळे पुन्हा अशा गुन्हेगारी टोळ्या रुजू नयेत यासाठी वेळीच कारवाईची जरूरी आहे. या टोळीयुद्धामागील कारणांचा समूळ शोध घेऊन दोन्ही गटांमधील या रक्तरंजित वैमनस्याचे कारण काय हे पाहणे आणि या हल्लेखोरांपाशी गावठी पिस्तुले आदी शस्त्रास्त्रे कुठून कशी आली याच्या मुळाशी जाणे आज अत्यावश्यक आहे. एवढ्या सहजपणे गावठी शस्त्रे यांना कोठून कशी उपलब्ध झाली या प्रश्नाचे उत्तर जनतेला हवे आहे.
सध्या कोरोनाचे सावट राज्यावर आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार अजूनही रात्रीची संचारबंदी लागू आहे. असे असताना शस्त्रास्त्रे घेऊन हे गुंडांचे टोळके उत्तररात्री राजधानीपासून हाकेच्या अंतरावरील मेरशी – सांताक्रुझ या गावांमध्ये बुरखे धारण करून आणि शस्त्रांनिशी एवढे मोकळेपणाने वाहनांतून कसे हिंडू फिरू शकले? पोलिसांची नाकेबंदी, गस्त कुठे झोपली होती, हा प्रश्नही विचारला जाणारच.
सांताक्रुझचा हल्ला हा अगदी पूर्वनियोजित होता हे उघड आहे. टोळीयुद्धामध्ये मारला गेलेला सोनू यादव हा कसा मारला गेला हे गूढ आहे. पोलीस तपासात त्यासंबंधीचे सत्य समोर येईलच, परंतु मुळामध्ये अशा घटना घडतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेतील ढिसाळपणाच त्यातून समोर येत असतो. ज्या टोळीने दुसर्‍या गटातील व्यक्तीच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला, त्यामध्ये दोघे अल्पवयीन असल्याचे आढळले आहे. इतर जे संशयित पकडले गेले आहेत, तेही अगदी वयाच्या विशी – पंचविशीच्या घरातले आहेत. यांना गुंडगिरीची दीक्षा दिली कोणी? कोणत्या टोळीबाज नेत्याने त्यांना आपल्या पंखांखाली घेतले आहे हेही जनतेसमोर येण्याची जरूरी आहे.
सांताक्रुझ हल्ल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच बार्देश तालुक्यातील एका गावी आणखी एका हत्येची घटना घडली आहे. गुन्हेगारीने अशा प्रकारे डोके वर काढणे चिंतेची बाब आहे. कोरोनाने सध्या अर्थव्यवस्थेवर मोठे सावट आणले आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. पुढील काळात अजून नोकर्‍या जातील, बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये वेतन कपात चालली आहे. अशातून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती आहे. गुन्हेगारी उचल खाईल अशा प्रकारची परिस्थिती कोरोनाने निर्माण केलेली आहे. त्यामुळे अशा वेळी पोलीस यंत्रणा अधिक दक्ष आणि जागरूक असणे गरजेचे आहे.
गुन्हेगारी टोळ्यांची नांगी वेळीच ठेचली गेली नाही तर मग अशा टोळ्या फार मोठी डोकेदुखी बनून जातात.
सांताक्रुझमधील टोळीमध्ये दोन अल्पवयीनही आढळले आहेत. यापूर्वी मेरशीच्या अपना घरमध्ये ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांचा चोरीमारी करण्यासाठी कशा प्रकारे उपयोग गुंडांकडून केला जातो हे पुराव्यानिशी शाबीत झाले होते. रात्री त्यांना चोरी करण्यासाठी बाहेर काढले जात असे आणि कार्यभाग उरकल्यानंतर पुन्हा आणून सोडले जात असे. हे साटेलोटे पुढे उजेडात आले, तेव्हा या सुधारगृहालाच सुधारणेची जरूरी असल्याचे सत्य समोर आले होते. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीची दीक्षा कोण कशासाठी देत आहे याचा तपास पोलिसांनी आता करणे जरूरी आहे. विशी – पंचविशीतले ‘गुंड’ गावठी शस्त्रास्त्रांच्या धाकावर हल्ले चढवण्यास धजावतात आणि अगदी पोलीस यंत्रणेच्या नाकाखाली असे हल्ले चढवले जातात ही लाजीरवाणी बाब आहे. राज्यातील गुन्हेगारी घटनांसंबंधी पूर्वी पोलीस खात्यातील प्रवक्ते प्रसारमाध्यमांना अधिकृतपणे सर्व माहिती पुरवत असत. नंतर हे प्रवक्तेपदच रद्द करण्यात आले आणि प्रसारमाध्यमांपर्यंत अशा गुन्हेगारीसंदर्भात माहितीच पोहोचू नये असे धोरण अवलंबण्यात आले. परिणामी जनतेपर्यंत अशा घटनांसंबंधी संपूर्ण माहितीच पोहोचत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबतही जनता अंधारात राहते. पोलीस दलाला आपल्याप्रती जनतेचा विश्वास कमवायचा असेल तर स्वतः करीत असलेल्या उपाययोजनांची आणि तपासकार्याची सविस्तर माहिती माध्यमांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. आम्ही जागरूक आहोत आणि असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत हा भरवसा तिला दिला पाहिजे.