वेगळ्या वाटेचा प्रवासी

0
209

विशेष संपादकीय

 

बिछडा कुछ इस अदा से की रुत ही बदल गई |
इक शख्स सारे शहर को वीरान कर गया ॥

‘वेंडेल रॉड्रिक्स’… पणजीत कांपालच्या निसर्गरम्य परिसरातून जाता येताना तेथील त्याच्या विक्री दालनाची ही पाटी हमखास दिसते. ती झोकदार सहीच त्याचा ब्रँड बनून गेली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा गोमंतकीय फॅशन डिझायनर आता आपल्यात नाही. गूढ परिस्थितीत तो त्याच्या कोलवाळच्या ‘काझा डोना मारिया’ मधून अकाली निजधामाला निघून गेला आहे. त्याच्या आकस्मिक निधनाची धक्कादायक वार्ता येताच देश विदेशातून शोकसंदेशांचा काल पाऊस पडला. त्याला मिळालेल्या ‘पद्मश्री’ पेक्षा वेंडेलच्या जागतिक कीर्तीची आणि लोकप्रियतेची ही खरी पोचपावती आहे. एक विलक्षण संवेदनशील कलाकाराचे मन असलेल्या वेंडेलने फॅशन डिझायनिंगसारख्या गोव्याला तोवर अपरिचित असलेल्या व्यवसायामध्ये स्वतःचा कीर्तीमान प्रस्थापित केला. देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अगदी फॅशनची पंढरी असलेल्या पॅरीसमध्ये त्याचा झेंडा दिमाखात फडकला. कधी दुबईच्या फॅशन विकच्या उद्घाटनाला त्याला मानाचे निमंत्रण आले, तर कधी जगातील वस्त्रप्रावरणांच्या सर्वांत मोठ्या प्रदर्शनात, जर्मनीच्या आयजीईडीओमध्ये त्याला स्थान मिळाले. वेंडेलने जगभरामध्ये कीर्ती मिळवली, परंतु मनाने तो सदैव गोंयकारच राहिला. येथील निसर्गावर, माणसांवर प्रेम करीत राहिला. खरे तर तो जन्माने मुंबईकर. माहीमच्या चाळीत वाढलेला. तत्कालीन बहुतेक ख्रिस्ती तरुणांप्रमाणे सुरवातीला हॉटेल व्यवसायाकडे वळला. मुंबईच्या ‘ताज’ मध्ये थोडी उमेदवारी केली आणि आपल्या बांधवांप्रमाणेच मस्कत गाठले. योगायोगाने त्याची भेट तिथे जेरॉम मॅरेल या फ्रेंच तरुणाशी झाली. या मैत्रीनेच वेंडेलला आयुष्याची नवी वाट दाखवली. फॅशन डिझायनिंगकडे तो वळला आणि तेच त्याचे कार्यक्षेत्र बनले. लॉस एंजिलीस, पॅरीससारख्या ठिकाणी त्याने त्या क्षेत्रातील रीतसर धडे घेतले आणि ८८ साली भारतात परतल्यावर येथील आघाडीच्या ब्रँडस् समवेत काम करायला सुरूवात केली. वस्त्रप्रावरणांच्या आकर्षक रचनांनी त्याने त्या झगमगाटी दुनियेमध्ये स्वतःची ओळख बनवली. दोन वर्षांतच त्याने स्वतःचा ब्रँड प्रस्थापित केला आणि आपल्या मायभूमीची ओढ त्याला गोव्यात घेऊन आली. वेंडेलने रचना केलेल्या पोशाखांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सहजसाधेपणा. स्थुल महिलांसाठी त्याने सन्मानपूर्वक खास वस्त्रप्रावरणांची मालिका निर्माण केली होती. तयार केेलेल्या पोशाखांना झिप लावणे त्याला आवडत नसे. त्याऐवजी दोर्‍या आणि गाठींचा वापर करणे त्याला पसंत असे. रंगवैविध्याला त्याची नापसंती नसली तरी शुभ्रधवल रंग त्याचा आवडता होता. विशेषतः त्यातील ‘योगा काम’ कलेक्शन पाहण्याजोगे आहे. कोलवाळ हे त्याचे मूळ गाव. तेथील जुुन्यापुराण्या घरात निसर्गाच्या सान्निध्यात आपला फ्रेंच पार्टनर आणि चार कुत्री, तीन मांजरांसह तो रमला होता. परंतु तत्पूर्वी आपल्या ‘पार्टनर’ सोबत त्याने जगातले शे – दीडशे देशही पादाक्रांत केलेले होते. अवघे जग त्याने भरभरून पाहिले. क्षणाक्षणाचा आनंद लुटला, परंतु शेवटी पायांना ओढ लागली ती गोव्याचीच. आपल्या घरच्या बल्कांवावर बसून आजूबाजूला ये – जा करणार्‍या माणसांचे, वावरणार्‍या पशुपक्ष्यांचे, कीटकांचे आपण कसे निरीक्षण करीत असतो, त्याविषयी त्याने एके ठिकाणी फार सुंदर लेखन केले होते. ‘द ग्रीन रूम’ हे त्याचे तब्बल ३५६ पानी आत्मचरित्र मुखपृष्ठावरील मलायकाच्या ‘हॉट’ छायाचित्रापेक्षा आतील वेधक, प्रवाही मजकुरामुळे आपल्या अधिक स्मरणात उरते ही त्याच्या निरीक्षणशक्तीची आणि लेखणीची कमाल आहे. गोव्याच्या पारंपरिक वस्त्रप्रावरणांचा अभ्यास हा त्याचा आवडीचा विषय होता. हातमागावर विणल्या जाणार्‍या येथल्या कुणबी साडीचे मोल ते काय, पण या तोकड्या साडीला पुनरुज्जीवित करीत त्याने तिला जगभरात पोहोचवले. कुणबी साडीला दसपट मोल मिळवून दिले. एकदा मारिओ मिरांडांनी त्याला ‘मांडो’मध्ये वापरल्या जाणार्‍या पोशाखाचा इतिहास शोधायला सांगितले. त्यात वेंडेल एवढा गुंतत गेला की गोव्याच्या पारंपरिक पोशाखांचा त्याने सतत अकरा वर्षे सखोल अभ्यास करून त्यावर सचित्र पुस्तक लिहिले. वेळोवेळी संचय केलेल्या सात – आठशे पारंपरिक गोमंतकीय वस्त्रप्रावरणांचे एक संग्रहालय आपल्या कोलवाळच्या घरात उभारायचे त्याचे स्वप्न होते. हे संग्रहालय देशातील एकमेवाद्वितीय ठरेल असे त्याचे म्हणणे होते. त्यात ठेवण्यासाठी त्याने काय काय ऐवज जमवलेला होता! अगदी १९६६ साली गोव्याची रीटा फारिया मिस वर्ल्ड बनली तेव्हा तिने घातलेला पोशाख देखील त्यात तो ठेवणार होता. वेंडेलचे हे स्वप्न आता अधुरे राहिले आहे. माणसे अशी अकाली निघून जातात. मागे उरते ती त्यांनी आपल्या हयातीत निर्माण केलेली स्वतःची ओळख. कलंदरासारखे जिणे जगत वेंडेल रॉड्रिक्सने वेगळीच वाट चोखाळली आणि जिद्दीने स्वतःची नाममुद्रा फॅशनच्या हायफाय दुनियेमध्ये निर्माण केली. पण स्वतःचे गोंयकारपणही तो कधी विसरला नाही हेच त्याचे मोठेपण आहे. वेगळ्या वाटेवरचा हा प्रवासी आता आपल्यात नाही. आता मागे राहिली आहे ती त्याला एक जागतिक ब्रँड बनवणारी त्याची ऐटबाज, झोकदार सही…!