वुहानचे वास्तव

0
29

दोन वर्षे अवघ्या जगात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणू हा नैसर्गिकरीत्या जन्मला नव्हता, तर तो शास्त्रज्ञांनीच विकसित केलेला होता व वुहानमधील प्रयोगशाळेत जैवसुरक्षेचे पुरेसे उपाय नसल्यानेच तो तेथून बाहेर पसरला आणि त्याने जगभरात हजारो बळी घेतले, असा दावा डॉ. अँड्य्रू हफयांनी ‘द ट्रुथ अबाउट वुहान’ या आपल्या ताज्या पुस्तकात केला आहे. डॉ. हफ हे स्वतः वुहानच्या प्रयोगशाळेशी संबंधित अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पहावे लागते. केवळ वुहानमधील प्रयोगशाळेकडेच बोट दाखवून ते थांबलेले नाहीत, तर मुळात यासंबंधीचा प्रकल्प हा अमेरिकेच्या आर्थिक साह्याने चालला होता हा त्यांच्या प्रतिपादनातील प्रमुख मुद्दा आहे. हा विषाणू सर्वत्र पसरताच मग मात्र अमेरिकेने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते विचार करायला लावणारे आहे. या विषयाशी आपण जवळून संबंधित असल्याने आपले तोंड बंद करण्यासाठी आपल्याला कसे अन्यत्र हलविण्यात आले व बढती देण्यात आली, हेही आपल्याला नंतर कळून चुकल्याचे प्रतिपादन डॉ. हफ यांनी या पुस्तकात केले आहे. सार्स कोव्ह – २ हा कोरोना विषाणू प्रथमतः चीनमध्येच अवतरला आणि त्याचा उगम वुहानमधील प्रयोगशाळेमध्येच झाला हे आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे. त्यावर आजवर भरपूर संशोधन झाले आहे. परंतु या संशोधनाला खुद्द अमेरिकेचे पाठबळ होते ही माहिती नवी आहे. वटवाघुळांवरील संशोधनाच्या मिशाने चीन जैविक अस्रे तर बनवीत नाही ना याचा शोध घेण्यासाठीच अमेरिकेच्या आर्थिक साह्याचे हे नाटक चालले होेते, असेही डॉ. हफ या पुस्तकात सूचित करताना दिसतात.
मुळात वुहानमधील त्या प्रयोगशाळेमध्ये वटवाघळांवर एक प्रकल्प इको हेल्थ अलायन्स नामक एक अमेरिकी स्वयंसेवी संस्था राबवीत होती, जिच्याशी हे डॉ. हफ संबंधित होते. नंतर ते तिचे उपाध्यक्षही होते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या प्रमुख आरोग्यविषयक संस्थेच्या पाठबळावर, यूएसएड या अर्थसहाय्य योजनेखाली हे सारे संशोधन चाललेले होते. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी, संसर्गजन्य रोगांवरील अभ्यासासाठी म्हणून हे सगळे संशोधन चालल्याचा बनाव अमेरिकेने केला असला तरी प्रत्यक्षात चीनकडून जैविक अस्रांची निर्मिती तर होत नाही ना, यावर नजर ठेवण्यासाठीच हा प्रकल्पाचा देखावा होता, असेही डॉ. हफ सूचित करताना दिसतात. इको हेल्थ अलायन्सने वटवाघळावरील सार्स कोव्ह २ हा विषाणू विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु जिथे त्यावर संशोधन चालले होते, त्या वुहानमधील प्रयोगशाळेत पुरेशा जैवसुरक्षात्मक सुविधा नसल्यानेच तो तेथून बाहेर पसरला आणि बघता बघता त्याने वणव्याचे रूप घेऊन जागतिक महामारीत त्याचे रुपांतर झाले, असा डॉ. हफ यांच्या पुस्तकाचा मथितार्थ दिसतो. वुहानमधील प्रयोगशाळेत जैवसुरक्षात्मक उपाययोजनांची कमतरता असल्याचे आपल्या निदर्शनास आले तेव्हा आपण हबकून गेलो व वेळोवेळी त्याबाबत आपण आवाज उठविण्याचा प्रयत्नही केला होता असेही डॉ. हफ यांचे म्हणणे आहे. शिवाय चीनकडून जरी या विषाणूचा प्रसार झालेला असला, तरी प्रत्यक्षात त्यासाठीचे जैवतंत्रज्ञान अमेरिकेनेच पुरवले असे ते आपल्या पुस्तकात ठासून सांगतात. त्या संपूर्ण प्रकल्पाशी डॉ. हफ हे अत्यंत जवळून संबंधित असल्याने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. चीनने आपल्या प्रयोगशाळेतून पसरलेल्या विषाणूला नैसर्गिक भासवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही त्यामागचे सत्य माहीत असावे. त्यातला अमेरिकेचा सहभागही माहीत असावा. त्यामुळेच अत्यंत कडक असे ‘झीरो कोवीड’ धोरण त्यांच्याकडून राबवले गेले. त्याचा परिणाम उलटा झाला हा भाग वेगळा, परंतु या विषाणूसंदर्भातील वस्तुस्थितीची कल्पना असल्याशिवाय चीनकडून एवढा आटापिटा झाला नसता असे म्हणायला निश्‍चित वाव आहे. अमेरिकेच्या संसदेत कोरोनाविषाणू हा अमेरिकेच्या स्वयंसेवी संस्थेकडून चाललेल्या वटवाघुळावरील संशोधनातून पसरलेला नसल्याचे तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु डॉ. हफ यांचे प्रतिपादन खरे मानले, तर या सार्‍या प्रकरणावर पडदा ओढण्याचा अत्यंत पद्धतशीर प्रयत्न अमेरिकेकडूनही झाला आहे. आता जे घडले ते होऊन गेले. जी लाखो माणसे जगभरात मृत्युमुखी पडली ती काही परत येणार नाहीत, जे त्रास दोन वर्षे जगाने भोगले ते काही विसरले जाणार नाहीत, जगाची जी अपरिमित आर्थिक हानी झाली, ती काही भरून निघणार नाही. पण निदान यापुढे तरी अशा बेजबाबदार संशोधनांवर जागतिक बंदी असणे जरूरी असेल.