वीज खाते 1600 कोटींची विकासकामे हाती घेणार

0
6

>> 15 ऑक्टोबरनंतर सुरुवात; वीजमंत्री ढवळीकर यांची माहिती; वीज वितरणात अमूलाग्र बदल घडवणार

गोवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार 15 ऑक्टोबरनंतर वीज खाते 1600 कोटी रु.ची विकासकामे हाती घेणार आहे. तसेच मागच्या काळातील 900 कोटींची विकासकामे चालू आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर 2024 ते 2025 सालापर्यंत राज्यभरातील वीज वितरणात अमूलाग्र असा बदल घडून येईल. परिणामी राज्यातील जनतेला पावसाळ्यातही खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नसल्याचा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.

वीज खात्याकडून 1600 कोटी रुपयांची जी विकासकामे होणार आहेत, ती सुरू करण्यासाठी खात्याच्या अधीक्षक अभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत सगळ्यांनी कंबर कसली असल्याचे ढवळीकर म्हणाले.
नव्याने सुरू करण्यात येणार असलेल्या विकासकामांमध्ये साळगाव येथे उभारण्यात येणार असलेल्या वीज उपकेंद्राचा समावेश आहे. 30 कोटी रुपये खर्चून हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर 15 ऑक्टोबरपासूून साखळी, चोडण, कारापूर येथे 30 कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत. 30 ऑक्टोबरपासून पणजी, ताळगाव व सांताक्रूझ मतदारसंघांत 16 कोटींची कामे सुरू होणार आहेत. फातोर्डा मतदारसंघात 40 कोटींची, वास्को शहरात 30 कोटींची काम हाती घेतली जातील. 22 ऑक्टोबर रोजी बाणावली, वेळ्ळी, मडगाव, केपे, कुडचडे, पंचवाडी येथे 200 कोटींची कामे सुरू करण्यात येतील. 30 ऑक्टोबरपासून हळदोणा, म्हापसा, पर्वरी व फोंडा येथील कामांचा शुभारंभ होईल. याच दरम्यान, काणकोण, केपे मतदारसंघाचा काही भाग, सावर्डे, वाळपई व पर्ये तसेच डिचोलीचा काही भाग, बार्देश तालुका व पेडण्याचा भाग येथील विकासकमांचा शुभारंभ होईल. ह्या कामांवर 200 कोटी रुपये खर्च करण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

वीज खात्यातर्फे करण्यात येणार असलेल्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय योजनांखाली 290 कोटी एवढा निधी मिळणार आहे. ठिकठिकाणी छोट्या आकाराचे 200 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून, त्यासाठीचा 70 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळेल. या दरम्यान, विविध ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. वेर्णा येथे बसलेल्या 63 एमबीए ट्रान्स्फॉर्मरचे 21 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ह्या ट्रान्स्फार्मरचा कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, लोटली, फातोर्डा आदी भागांना लाभ होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मांद्रे वीज उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.