वि. स. खांडेकर यांचा पत्रसंवाद

0
206

संग्राहक- राम देशपांडे

वि. स. खांडेकर यांना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, सार्‍या भारतात ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारी मंडळी आहेत, त्यांची विविध विषयांवर पत्रे यायची. या पत्रांचे स्वरूप पाहिले तर कुणी आपली घरगुती कथा-व्यथा त्यांच्याजवळ पत्रातून व्यक्त करायचे. तरुण मुले-मुलींची काही पत्रे लेखनविषयक मार्गदर्शनाची अपेक्षा करणारी, तर काही संदेश मागणारी असायची. आणि ही वाचकपत्रे निरुत्तर राहू नयेत याकडे भाऊ कटाक्षाने लक्ष देत. प्रत्येक पत्राला चार ओळींचं का होईना, आपल्याकडून उत्तर हे जायला(च) हवं याकडे त्यांचे लक्ष असायचे.
एकदा असेच एक पत्र आले. पत्रलेखकाने भाऊंच्याकडून संदेशाची अपेक्षा केली आणि भाऊंनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले-
माझ्याकडून तुम्ही संदेश मागितला आहे. तयार कपड्यासारखे घोटीव संदेश देण्यात काहीच अर्थ नसतो. तुम्ही जे वाचलं असेल आणि त्यातला जो कोणता भाग तुमच्या काळजाला जाऊन भिडला असेल त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेन. चांगलं काय हे कळण्याची पात्रता आजच्या मनुष्यात आहे. पण ते वळत मात्र नाही. कळणं आणि वळणं यातलं अंतर फार मोठं आहे. पण माणसाला ते तोडता आलं नाही तर या जगातलं दैन्य आणि दुःख वाढतच राहील. स्वतःपुरतं एक पाऊलभर का होईना ते अंतर तोडण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे.
तुमचा
वि. स. खांडेकर
२८ ऑक्टोबर १९७१