शेवटी मतदानाचा निर्णायक क्षण आला आहे. आज निवड करायची आहे. विधानसभेवर आपला प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवायचे त्याचा फैसला करायचा आहे. प्रचाराची रणधुमाळी आटोपली, दावे प्रतिदावे, आरोप – प्रत्यारोप, आश्वासने, आमिषे, प्रलोभने हा सगळा गदारोळ थांबला. आता मन शांत ठेवून, सारासार विवेक बाळगून, सद्सद्विकेबुद्धीला स्मरून निर्णय घ्यायचा आहे. गोव्याचे भविष्य नजरेसमोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे. गोवा आज कोणत्या वळणावर उभा आहे आणि त्याला कोणत्या दिशेने न्यायचे आहे याचे भान ठेवून निर्णय घ्यायचा आहे. येणारे सरकार राज्याचे सत्ताशकट हाकणार आहे. तुमच्या आमच्या जीवनमरणाच्या विषयांवरचे भले – बुरे निर्णय घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या हाती या सत्तेच्या दोर्या जातील, त्याची पात्रता तपासून, त्याचा प्रामाणिकपणा जोखूनच त्याच्या हाती सत्ता सोपवायला नको? गोवा आज उद्ध्वस्ततेच्या वळणावर उभा आहे. खाण माफिया, भूमाफिया, ड्रग्स माफिया अशा नाना तर्हेच्या माफियांनी या नंदनवनाला वेढले आहे. भ्रष्टाचार आणि लाचलुचपत प्रचंड प्रमाणात बळावली आहे.
सरकारी नोकर्यांचा खुलेआम बाजार मांडला जाऊनही जनता मुकाटपणे तो पाहात आली आहे. आपल्या अस्मितेवर घाला घालणार्या निर्णयांना सोसत आली आहे. जनतेची ही नेहमीची हतबलता दूर सारणारा आजचा दिवस आहे. तिच्या हाती लोकशाहीने आज अधिकार दिलेला आहे. आज नाही तर कधीच नाही! म्हणूनच राज्याच्या भल्या बुर्याचा निर्णय आज घ्यायचा आहे. आपण ज्याला आज निवडून देणार आहोत तो खरोखर लोकप्रतिनिधी बनायला पात्र आहे का, त्याची नेता म्हणायची खरेच लायकी आहे का, उद्या त्याच्या हाती सत्ता आली तर ती पेलण्याची कुवत त्याच्यापाशी आहे का, त्याला गुन्हेगारी प्रकरणांची पार्श्वभूमी तर नाही? त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, त्याला जनतेच्या प्रश्नांची समज कितपत आहे? त्याचे सामाजिक कार्य किती आहे? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जात – पात न पाहता स्वच्छ मनाने मतदान करायचे आहे. आज निवडणूक हा पैशाचा खेळ बनला आहे असे आपण म्हणतो, पण पैसा विचार विकत घेऊ शकत नाही हे दाखवून देणे आपल्या हाती आहे. पाण्यासारखा पैसा ओतला की निवडून येणे हा डाव्या हातचा खेळ आहे अशी मिजास मिरवणार्यांना स्वाभिमानी मतदारच धडा शिकवू शकतो. राजकारण्यांचे बूट चाटत जगायचे की स्वाभिमानाने स्वतंत्र प्रज्ञेने आयुष्यात उभे राहायचे याचा फैसला ज्याचा त्यानेे करायला हवा. दुर्दैवाने मतदारसंघांमधून आज लाचारांच्या फौजा राजकारण्यांनी तयार केलेल्या आहेत. सरकारी तिजोरीतून खिरापती वाटून मिंधे केलेल्यांच्या बळावर आपल्या मतपेढ्या त्यांनी बळकट केलेल्या आहेत. या मतपेढ्यांच्या जोरावर मिजास येते आणि मग्रुरीही. मग अशी माणसे सत्तेत आली की हैदोस घालू लागतात. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची त्यामागची प्रेरणा काय हे तपासायला गेले तर समाजकार्य आणि जनसेवेपेक्षा सत्तेचा लोभ आणि सोप्या मार्गाने हाती येणार्या संपत्तीचा हव्यास याच प्रेरणा अधिक प्रबळ दिसतात. समाजहितार्थ राजकारणात आलेली, जनतेसाठी जीवनात काही तरी करून जाऊ या प्रेरणेने राजकारणात उतरलेली तत्त्वनिष्ठ माणसे हळूहळू बाहेर फेकली जाऊ लागली आहेत आणि त्यांची जागा धनदांडग्या बाजारबुणग्यांनी घ्यायला सुरूवात झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानास जात असताना आपण ज्याला मतदान करणार आहोत, तो अंतर्बाह्य स्वच्छ आहे का, हे तपासूनच मत त्याच्या पारड्यात टाकले जावे. आश्वासनांना भुलून, आमिषांना भुलून, जातिपातीच्या आवाहनाला बळी पडून जर मत द्याल, तर पुढे पस्तावाल. एकदा मतदान केलेत की मग पाच वर्षे हाती काही राहणार नाही. राज्यासमोर अत्यंत गंभीर स्वरूपाचे अनेक प्रश्न उभे आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी त्या प्रश्नांची जाण असलेले, तेवढी वैचारिक कुवत असलेले लोकप्रतिनिधीच विधानसभेवर जायला हवेत. कोणीही सोम्या–गोम्याने यावे, हातातल्या नोटा नाचवाव्यात आणि निवडून यावे हा खेळ थांबायलाच हवा. उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे हे जरी खरे असले, तरीही त्यातल्या त्यात जो स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी त्याला तरी विधानसभेवर पाठवू! बिंदूबिंदूतून जसा सागर तयार होतो, तसे अशा उमेदवाराला मिळालेले एकेक मत त्याला विजयाकडे घेऊन जाईल. घरच्या बलकावांवर बसून फुक्याच्या राजकीय चर्चा करणार्यांनी आता प्रत्यक्ष मतदान करताना विचारपूर्वक करावे. राजकारण्यांच्या लीलांकडे केवळ स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापोटी कानाडोळा करणार्यांनी जरा डोळ्यांवरील झापडे काढावीत. स्वतःला बुद्धिवादी म्हणवणार्या समाजघटकाने उदासीनता सोडून मतदानासाठी वेळ काढावा, उद्याचा भारत घडवण्याचे स्वप्न पाहणार्या युवकांनी त्या उद्याच्या भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील अशांना निवडून देण्यास हातभार लावावा, आजवर शांता होऊन राहिलेल्या महिलावर्गाने आता दुर्गेचे रूप दाखवून सत्याचा जागर करावा. ज्याला ज्याला मताधिकार आहे त्याने स्वतः, कुटुंबासह, इष्टमित्रांसह बाहेर पडावे आणि भ्रष्ट, अप्रामाणिक, खोटारडी माणसे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेवर निवडली जाऊ नयेत या निर्धाराने मतदान करावे! सज्जनशक्तीचा भीमटोलाच नेते म्हणवणार्या गुंडपुंडांना नेस्तनाबूत करील.