विशेष ‘श्रमिक’ ३६६ रेलगाड्यांनी पोचविले ४ लाख श्रमिकांना घरी !

0
131

भारतीय रेल्वेने दि. १ मे पासून देशभरातून ३६६ खास श्रमिक रेलगाड्यांमार्फत विविध राज्यांमध्ये अडकलेल्या सुमारे ४ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या गावांमध्ये पोचविले आहे. या खास रेलगाड्यांपैकी २८७ गाड्या याआधीच त्या-त्या राज्यांमध्ये दाखल झाल्या असून ७९ गाड्यांचा प्रवास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत संबंधित राज्यांमध्ये पोचलेल्या २८७ रेलगाड्यांपैकी १२७ उत्तर प्रदेशमध्ये, ८७ बिहारात, २४ मध्य प्रदेशमध्ये, २० ओडिसा येथे, १६ झारखंडमध्ये, राजस्थानात ४, महाराष्ट्रात ३, तेलंगण व प. बंगालात प्रत्येकी दोन तर आंध्र प्रदेश व हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक अशा पोचल्या आहेत. या खास रेलगाड्यांमधून त्रिचुरापल्ली, तितलागड, बाराऊनी, खांडवा, जगन्नाथपूर, छाप्रा, बलिया, गया, पुर्निया, वाराणसी व अन्य शहरांमध्ये स्थलांतरितांना पोचविण्यात आले. या प्रत्येक श्रमिक रेलगाड्यांना २४ डबे असून प्रत्येक डब्याची आसन क्षमता ७२ असते. तथापि सामाजिक अंतरासाठी ७२ ऐवजी एका डब्यात ५४ जणांनाच प्रवेश दिला गेला आहे.

राज्यातील सुमारे १०५५ मजुरांना घेऊन दुसरी श्रमिक विशेष रेल्वेगाडी थिवी रेल्वे स्थानकावरून उधमपूर – जम्मू काश्मीरला काल रवाना झाली. यावेळी जिल्हाधिकारी आर. मेनका, नोडल अधिकारी कुणाल व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. राज्यातील सुमारे १११९ मजुरांना दोन दिवसांपूर्वी पहिला खास श्रमिक रेल्वेगाडीतून मध्यप्रदेशात नेऊन सोडण्यात आलेे आहे. सोमवार ११ मेला एक श्रमिक खास रेल्वे गाडी जम्मू काश्मीरला सोडण्याची तयारी सुरू आहे.