विवेक स्पंदन – १ ॥ पुत्र अमृताचा ॥

0
121

– प्रा. रमेश सप्रे

आज घटस्थापना आहे. छिद्रं असलेल्या घटात दिव्याची स्थापना करून देवीशक्तीचा नवरात्रोत्सव साजरा करायचा असतो. छिद्र असलेला घट म्हणजे आपलं शरीर. यात दीपस्थापना करु या म्हणजे मानवजातीसाठी प्रेम-करुणा-सेवा-त्याग यांनी युक्त असं जीवन जगण्याचा संकल्प करु या. तसं अभिवचन युगपुरुष विवेकानंदांना देऊ या.  

‘तुम्ही काय म्हणताय हे? मला नाही व्हायचं वटवृक्ष बिटवृक्ष’. त्या विशीतल्या तेजस्वी युवकाचे ते उद्गार ऐकून आजुबाजूची मंडळी त्याच्या दिशेनं पाहू लागली. काही क्षण विलक्षण शांतता पसरली. यावर आता दुसरी चाळीशीतली काहीशी बावळट दिसणारी व्यक्ती काय म्हणते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली… ‘अरे, तुला वटवृक्ष व्हावंच लागेल. असंख्यांना आधार देणारा आधारवड आणि स्वतः चिरकाल टिकणारा अक्षय वट. तू कोण रे ठरवणार काय व्हायचं… काय करायचं ते? माझी कालीमाता तुझ्याकडून ते काम करून घेईल. तूच काय, तुझी हाडंसुद्धा तिचं काम करतील.’ या उत्स्फूर्त उद्गारांनी तो तरुण अवाक् झाला. निरुत्तर झाला.
या प्रसंगातला विशीतला तेजस्वी युवक होता नरेंद्र विश्‍वनाथ दत्त म्हणजेच भविष्यातले स्वामी विवेकानंद अन् ती चाळीशीतली व्यक्ती होती रामकृष्ण परमहंस. त्यावेळी गुरु-शिष्य असं काहीही नातं नव्हतं. नंतरही कधी असणार नव्हतं. कारण…
… कारण दोघांच्याही मनात एकमेकाविषयी अपार आदरभाव होता. ‘बिंब-प्रतिबिंब’ या चंद्रकांत खोत यांच्या ग्रंथात या संदर्भातील वर्णन काहीसं असं आहे.
* कधी रामकृष्ण बिंब तर नरेंद्र (विवेकानंद) प्रतिबिंब … कधी नरेंद्र बिंब तर रामकृष्ण प्रतिबिंब … कधी दोघेही बिंब तर कधी दोघेही प्रतिबिंब!
* जणू एकासमोर एक ठेवलेले दोन आरसे. याची प्रतिमा त्याच्यात नि त्याची प्रतिमा याच्यात.. एवढंच नाही तर दोन्ही आरशांच्या मध्ये काहीही ठेवलं की त्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या असंख्य .. अक्षरशः अगणित प्रतिमा निर्माण होणार!
आपण सारे रामकृष्ण-विवेकानंदांच्या संयुक्त प्रभावात उजळून निघालेल्या अशा प्रतिमा आहोत. नसलो तर बनू या … निदान विवेकानंदांची स्पंदनं तरी आपल्याला भारून नि भारावून टाकू देत. स्पंदनं विवेकाची नि आनंदाची सुद्धा. स्पंदनं विवेकानंदांची!…
विचार-भावना-कल्पना यांची स्पंदनं जी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वातून उसळून, उजळून बाहेर यायची.. अजूनही येताहेत.. सूर्यातून बाहेर पडणार्‍या ऊर्जामय किरणांसारखी किंवा धगधगत्या अग्नीतून उडणार्‍या असंख्य तेजोमय ठिणग्यांसारखी…
समर्थ रामदास सांगतात –
उत्कट भव्य ते घ्यावे | मिळमिळीत अवघे त्यागावे ॥
स्वामी विवेकानंदांनाही उत्कटतेची आस नि भव्यतेचा ध्यास होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाची नि चारित्र्याची स्पंदनं जाणवतात त्यांच्या भाषणात – संभाषणात, परिव्राजक म्हणून त्यांनी केलेल्या भारताच्या उभ्या-आडव्या प्रवासातल्या त्यांच्या जिवंत अनुभवात, त्यांच्या कवितात अन् त्यांच्या पत्रात… मुख्य म्हणजे जीवनात आलेल्या असंख्य माणसांच्या संपर्कात – स्पर्शात – संवादात नि हो त्यांच्या स्वतःच्या संगतीत नि संगीतातसुद्धा. विवेकानंद हे चांगलं गायन करत व अनेक वाद्यांचं अपूर्व वादनही करीत. या त्यांच्या दोन्ही पैलूंचं दर्शन तत्कालीन रसिक गोंयकारांनाही झालं. ‘संगीत कल्पतरु’ नावाचा एक मोठा ग्रंथ विवेकानंदांनी लिहिलाय हे फार थोड्या लोकांना माहीत असेल.
यावरून आजच्या युवकांनी आत्मविकासासाठी प्रेरणा घेतली पाहिजे. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात तेही अनेक रोगांनी ग्रस्त आणि त्रस्त केलेल्या अवस्थेत केवढं महान कार्य त्यांनी केलं. ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ अशा जिद्दीचे युवक त्यांना हवे होते. पाण्याविना पाण्यासाठी दाही दिशा भटकणारे अगतिक लाचार तरुण त्यांना नको होते. ते म्हणायचे- ‘पोलादी स्नायूंचे नि सिंहाच्या छातीचे शंभर तरुण मला द्या, मी नवा भारत घडवीन’. हे म्हणजे त्या वैज्ञानिक आर्किमिडीजसारखं झालं. जो म्हणायचा- ‘मला पृथ्वीबाहेर उभ रहायला जागा, एक भक्कम असा टेकू (फल्क्रम) आणि भरभक्कम अशी लोखंडाची पहार दिलीत तर मी एकटा सारी पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी उडवून देईन.’
असा आत्मविश्‍वास म्हणजेच खरा युवक! तसं पाहिलं तर खर्‍या अर्थानं फक्त नऊ वर्षें त्यांना कार्य करायला मिळाली. ९ सप्टेंबर १८९३ (आठवा ते ऐतिहासिक शिकॅगो- भाषण) ते ४ जुलै १९०२ ज्या दिवशी स्वामीजींनी महासमाधीत प्रवेश केला. त्यांचं आयुष्यातलं अखेरचं अर्थपूर्ण वाक्य होतं- ‘विवेकानंद कसा होता हे समजण्यासाठी विवेकानंदच व्हावं लागेल.’
रामकृष्णांचं ते वाक्यही एखाद्या द्रष्ट्याच्या भविष्यवाणीसारखंच ठरलं.
स्वामीजी गेल्यावर त्यांचे अस्थिकुंभ प्रेरणास्थान बनले. त्यांच्या हाडांकडूनच देवी कालीमातेनं विश्‍वकार्य, नव्हे युगकार्य करून घेतलं. आज जगातील सर्व देशात विवेकविचारांचा प्रसार होतोय. अभ्यास होतोय. वृत्रासुराला मारण्यासाठी कल्पनेच्याही पलीकडील वस्तूपासून बनलेल्या अस्त्राची गरज होती. ते अस्त्र म्हणजेच इंद्राचं वज्र. कशापासून बनलं होतं ते? दधीची ऋषींच्या अस्थींपासून. आजही अशा त्यागाची प्रेरणा मिळावी म्हणून ‘दधीची प्रतिष्ठान’तर्फे देहदानाचं आवाहन केलं जातं. हळूहळू ही कल्पना रुजू पहातेय. अवयवदान तर अनेकजण करतात. ज्यावेळी आपण नेत्रदान, रक्तदान, श्रमदान करतो तेव्हा आपण विवेकानंदांचे खरे वंशज असतो.
‘त्याग आणि सेवा’ या दोन पंखांवर जर आपला जीवनपक्षी उडत राहिला तर त्या उड्डाणातून सर्व सृष्टीचं तसंच मानवजातीचं कल्याणच होईल. हा वारसा या महापुरुषानं आपल्यासाठी ठेवलाय. स्वतःच्या जीवनाचा स्वच्छ आरसा तो मागे ठेवून गेलाय. आपली प्रतिमा आपणच उजळून घ्यायचीय. ‘उद्धरेत् आत्मन् आत्मानम्’ – आपला उद्धार आपणच करायचा ही प्रेरणा देणारं सागरासारखं आतून शांतपणे वरून सतत हेलावणारं, खळखळणारं जीवन जगून हा युगपुरुष गेला. त्याचा वसा युवकांनी घेतला पाहिजे.
अतिप्राचीन काळातील ऋषीमुनी, मध्ययुगातले साधुसंत अन् आधुनिक काळातले वैज्ञानिक नि यंत्र-तंत्रज्ञ या सर्वांना एकाच वेळी आपल्या कवेत घेणारं व्यक्तिमत्व होतं विवेकानंदांचं. त्यांची वाणी सिंहगर्जनेसारखी आत्मविश्‍वासपूर्ण होती. त्यांची लेखणी पौरुषाचा नि पराक्रमाचा परिचय करून देणारी होती नि त्यांची राहणी सर्वांना प्रेरक आदर्श देणारी होती. या सार्‍यातून अखंड स्पंदनं उठायची. तरुणाईसाठी खास संदेश देणार्‍या अशा चैतन्यस्पंदनांचा स्पर्श आपण अनुभवणार आहोत.
‘तरुण खांद्यांवर म्हातारी डोकी असलेल्या मुर्दाड युवकांची’ विवेकानंदांना मनस्वी चीड होती. ते गर्जून सांगायचे ‘शृण्वन्तु ते अमृतस्य पुत्राः|’ अमृताच्या पुत्रांनो मी सांगतो ते ऐका. नीट अवधानपूर्वक ऐका नि जीवनात उतरवा. सदैव ध्यानात ठेवा-
‘आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च|’- स्वतःची मुक्ती जगाचं हित सांभाळण्यातच आहे.
आज घटस्थापना आहे. छिद्रं असलेल्या घटात दिव्याची स्थापना करून देवीशक्तीचा नवरात्रोत्सव साजरा करायचा असतो. छिद्र असलेला घट म्हणजे आपलं शरीर. यात दीपस्थापना करु या म्हणजे मानवजातीसाठी प्रेम-करुणा-सेवा-त्याग यांनी युक्त असं जीवन जगण्याचा संकल्प करु या. तसं अभिवचन युगपुरुष विवेकानंदांना देऊ या. स्वतःला व इतरांना सांगत राहू या- चिदानंदरुपः शिवोऽहम् शिवोऽहम् .. शिवोऽहम् शिवोहम् ॥