देशभरात ‘हाय अलर्ट’

0
97

पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या पार्श्‍वभूमीवर अतिरेकी देशात कोठेही हल्ले घडवून आणण्याच्या शक्यतेवरून केंद्र सरकारने काल संपूर्ण देशात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल भारत-पाक सीमेलगत सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.

पंजाब राज्यातील महत्वाच्या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. येथील पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या गावामधील लोकांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम कालही सुरू राहिले.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल देशाच्या सर्व प्रमुख सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन तासभर चर्चा केली व सर्व सीमांवर दक्ष राहण्याचे निर्देश दिले.
पाकमधील ‘त्या’
वृत्ताचा लष्कराकडून इन्कार
पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाई दरम्यान भारताचे काही सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा भारतीय लष्कराने इन्कार केला आहे. या मोहिमेदरम्यान भारताच्या एका जवानाला किरकोळ दुखापत झाल्याचे लष्कराने म्हटले आहे. या मोहिमेत किमान ४० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेले नाही.
‘त्या’ सैनिकाच्या
सुरक्षेचे सर्वतोपरी प्रयत्न
भारतीय लष्कराच्या धडक कारवाईनंतर एक सैनिक चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्यानंतर तो पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी त्याच्या सुरक्षेचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.