विविध रंगरूपी शिगमा

0
456
–  विनायक विष्णू खेडेकर
शिगमा. समूहाधिष्ठित जनजीवनाच्या भावविश्‍वाची एकत्रित अभिव्यक्ती. दैनंदिन व्यवहारातील वैयक्तिक व सामूहिक स्तरावरील समस्या, अडचणी यांतून सुटका करून घेण्याचा काळ, तसेच निसर्ग, त्यातील ऋतुचक्र यांच्याशी सामना करत वर्षभरासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त करणे; शिगमा याचसाठी. ते एक वार्षिक विधान आहे. तद्वत वसंत ऋतूच्या संगतीने येणार्‍या नववर्ष स्वागताचा मोसम आहे.
शिगमा. समूहाधिष्ठित जनजीवनाच्या भावविश्‍वाची एकत्रित अभिव्यक्ती. दैनंदिन व्यवहारातील वैयक्तिक व सामूहिक स्तरावरील समस्या, अडचणी यांतून सुटका करून घेण्याचा काळ, तसेच निसर्ग, त्यातील ऋतुचक्र यांच्याशी सामना करत वर्षभरासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त करणे; शिगमा याचसाठी. ते एक वार्षिक विधान आहे. तद्वत वसंत ऋतूच्या संगतीने येणार्‍या नववर्ष स्वागताचा मोसम आहे.
कोणतेही व्रत-वैकल्य, सणपर्व वा दैनंदिन आचरणही उत्सवात परिवर्तित होणे हे काळाचे देणे आहे. कशालाही, कोठेही ‘उत्सव’ शब्द वापरण्यात समाजाहूनही वर्तमानपत्रे अधिक आस्था दाखवतात. तेथे दिवजां, कौल घेणे असे प्रकार सोडूनच द्या, पण कुटुंबात घडणारे सत्यनारायण व्रत याचाही सत्यनारायण पूजनोत्सव होतो. धालो, शिगमा अशांचा उत्सव बनणे अपरिहार्य आहे.
काही दिवस चालणारी अनेक विधी-विधाने हे शिगम्याचे एक रूप झाले. या दिवसांतील खेळ, नृत्य, संगीत, गीत गायन या तर परंपराच. रणमाल्यासम लोकनाट्य सोडाच, परंतु शिगम्यात एक प्रथा म्हणून होणारी हौशी रंगभूमीवरील आधुनिक नाटके हाही त्या विधींचा अविभाज्य भाग आहे. न केवळ एवढे पण अश्‍लील बोलणे, बोंबा मारणे गरजेचे मानले गेले. कारण यातून मानवी मनातील मळमळीचा उद्रेक होतो, ती निपटली जाते.
इतर, विशेषतः शिष्ट संस्कृतीत शिगमा हा उत्सव वाटत असतो. होलिका दहन, रंगपंचमी, व होळी रे होळी, पुरणाची पोळी म्हणत, सण-परब मानत पुरणपोळी वा इतर गोडा-धोडाचे खाणे. पण सामान्यजन जीवनासाठी तो त्यांच्या जगण्याला ऊर्जा देणारा, प्रथा-परंपरांनी भरलेला मौसम आहे. त्यांचे जीवनचक्र कृषिचक्राला बंाधलेले असते, व कृषिकर्मी ऋतुचक्राला बांधील असतो.
वसंताचे स्वागत
शिगमा म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत आहे. लहानपणी शिकवले व पंचांगात छापून आले ते म्हणजे ‘चैत्र-वैशाख’ वसंत ऋतू. परंतु विद्यमानकालीन हवामानबदल ध्यानी घेऊनसुद्धा वसंताच्या आगमनाचे ढोल-ताशे निसर्ग आजही शिगम्यात अर्थात ङ्गाल्गुनातच बडवीत असतो. निश्‍चित विधान करता येते की चैत्र हा वर्षारंभातील पहिला महिना असल्यानेच त्याला ऋतूबदलाचा मान मिळाला. एक ऋतू साठ दिवसांचा म्हणूनच चैत्र, वैशाख असे उच्चारण झाले. ङ्गाल्गुन हा हिंदू वर्षगणनेतील शेवटचा महिना असल्याने वसंतच पुढे ढकलला गेला. आदिवासींच्या मौखिक परंपरेत याचे धागेदोरे मिळतात.
याचसंदर्भात वर्षा ऋतूचे उदाहरण द्यायला हरकत नाही. पंचांगानुसार श्रावण व भाद्रपद हे वर्षा ऋतूचे महिने. परंतु अनंत चतुर्दशीपर्यंत पावसाळी वातावरणाची तशी सुलूस नसली तरी चवथ, ऋषिपंचमी किंबहुना पुढे पुनवेपर्यंतची व्रत-वैकल्ये व प्रचलित रीतीरिवाज स्पष्ट करतात की हाच पावसाळी मोसम आहे. उल्लेखनीय घटक म्हणजे आदिवासी कुळमी  संकल्पना आषाढ पुनव ते भाद्रपद पौर्णिमा हाच पावसाळी काळ मानणारी आहे. लोकवेदातून हे स्पष्ट होते.
‘शिमगा’ शब्दाचे कोशात मिळणारे अर्थ; ङ्गाल्गुन महिना, होळीचा सण, अचकट विचकट, अश्‍लील बोलणे, बोंबा मारणे असे सापडतात. गोव्यात लोकस्तरावर शिगमा, ‘शिगम्या म्हयनो’ म्हणतात. सुग्रीष्मक, सुग्गिम्हा अशा अनेक उपपत्ती, ‘सुगी’ हे मूलरूप. यातून तयार झालेला शब्द शीग. शिगेला पोचणे, शिगोशीग भरणे यातील ‘शिग’पासून बनला तो शिगमा, ही उपपत्ती अधिक यथार्थ, नव्हे स्वीकारार्ह आहे. भारतीय उपखंडात संस्कृतबरोबरच सामान्यांत प्राकृत प्रचलित होती, हे मान्य करावे लागते. त्यामुळे हरएक शब्द कुठल्या तरी संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप मानले जाऊ नये हे ठामपणे सांगावेसे वाटते. हा समृद्धीचा महिना आहे. काही जाणत्या व्यक्तीही ‘शिगमा’ कोंकणी तर ‘शिमगा’ हे त्याचे मराठी रूप मानतात, तसे लिहितात.
आदिवासी धारणा
जंगल, झाडं-पेडं याला आदिवासी जीवनाने जेवढे जपले, त्याच्या जतन, संवर्धनाचा विचार केला तेवढा इतरांनी कधीच केला नाही. घरात लाकडांनी पेटणारी गरजेची चूल व शेकोटी, सायंकाळी घराच्या आसपासचा पाला-पाचोळा एकत्र करून त्याला आग लावली की येणारा धूर, नाव ‘धुंगटी’, ‘खुणार’सह इतर उपद्रवी कीटकांचा त्रास गुरा-वासरांसह माणसालाही होत नाही. या खेरीज, ठरावीक जमिनीबाहेर आग पसरू नये याची आत्यंतिक दक्षता घेऊन जंगल भागात कुमेरी शेतीसाठी सावधानतेने लावलेली आग; होम-हवन प्रकार त्या जीवनात नव्हताच. इतका की इतरांकडील लग्नात अत्यावश्यक असलेला ‘लाजाहोम’ हा विधीही त्यांच्याकडे होत नव्हता. सातऐवजी पाच ङ्गेरे, त्याना साक्ष असे ती पेटत्या लामणदिव्याच्या ज्योतीची.
या त्यांच्या पर्यावरणपूरक विचार, दृष्टिकोनामुळे असेल पण आदिवासी कुळमी जीवनात होळी नाही, होलिका दहन नाही. त्यांना नैसर्गिक रंग माहीत होते, पण ते एकमेकांवर उडविण्यासाठी नव्हते. आदिम वशातील जीवनपद्धतीचा अवलंब करणार्‍या गोव्यातील इतर जाती-जमातीत म्हणूनच होळी पुरल्यानंतर मुळाशी मोठे दगड ठेवून त्यावर गवत पसरायचे व पूजाविधी झाल्यानंतर ते पेटविणे. यानंतर थोड्याच ठिकाणची प्रथा म्हणजे, थोड्या अंतरावरून ङ्गेकून त्या दगडावर आपटून नारळ ङ्गोडणे; ही प्रथा सर्वत्र नाही. लाकडे जाळण्याऐवजी होळीच्या मुळाशी गवत टाकून प्रतीकात्म होलिका दहन इतरांनी आदिवासी जीवनप्रणालीतून उचललेले. देवासाठी दगडावर आपटून नारळ ङ्गोडणे ही त्यांचीच प्रथा.
ख्रिस्ती शिगमा
‘इंत्रुज’ हा प्रकार म्हणजे शिगम्याची ख्रिस्ती आवृत्ती. विशेषतः मांड या संकल्पनेला चिकटून राहिलेला ख्रिस्ती गावडा समाज अगदी शिगम्यातील रीती-रिवाजासह इंत्रुज साजरा करतो. तसाच माड; विधी तेच, तसेच, लामणदिवा- नारळातील खोबर्‍याच्या शिरणीसकट. पवित्र शुक्रवारच्या आधी चाळीस दिवस ख्रिश्‍चन धर्मीयांसाठी उपासाचे दिवस असतात. याला ‘लेंट’ नाव आहे. त्याआधीचे तीन दिवस इंत्रुजचे. अलीकडच्या काळात याला ‘कार्निवाल’ म्हणू लागले. ख्रिस्ती धर्मसंस्थेने निषिद्ध मानलेला, ब्राझिलहून आयात केला गेलेला हा कार्निवाल पर्यटन संस्कृतीचा विशेष म्हणून ‘खा, प्या, मजा करा’ अशा किंग मोमो याच्या आदेशानुसार आज गोव्यात साजरा होत असला तरी इंत्रुज हा प्रकार व त्याची पार्श्‍वभूमी जाणून घेण्यासारखी आहे.
सोळाव्या शतकातील सामुदायिक बाटाबाटीनंतर साहजिकच उच्चवर्णीयांनी पाश्‍चिमात्य संस्कृतीचा काहीसा स्वीकार केला. परंतु अनपढ, अशिक्षित राहिलेला बहुसंख्येतील कृषिकर्मी गावडा; त्याच्या जीवनात एक मोठी सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली. जुने आचरण्यावर बंदी व नव्याचा स्वीकार करू न शकणारा हा कष्टकरी काष्टीकार. हा समाज बिथरू नये याची खबरदारी धर्मसंस्थेला घ्यावीच लागली. यातूनच देवदेवतांचे संदर्भ वगळलेला ‘जागोर’, ‘धालो’, ‘शिगम्या’ऐवजी ‘इंत्रुज’ असे पर्याय या समाजाला मिळाले. तद्वत मांड, तेथील विधी-विधाने, लग्नासह अन्य पूर्वाश्रमीच्या प्रथा-परंपरांचे आचरण अशा गोष्टींकडे चर्चसंस्थेने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. मूळ रीती-रिवाजात थोडासा बदल करत कणसां ङ्गेस्त, पेजे, तवशां ङ्गेस्त, मूळ सात बहिणीतील मिराय, म्हापशाच्या मिलाग्रिश सायबिणीचे ङ्गेस्त अशा प्रकारांचा स्वीकार केला. तत्कालीन पोर्तुगीज दस्तऐवजावरून हे स्पष्ट होते.
धार्मिक जुलमामुळे बहुतेक मांडांचे दर्शन घडते ते तेथे पेटती पणती वा मेणबत्तीच्या ज्योतीच्या हलचलपुरते सीमित. परंतु चर्चसंस्थेचे दडपण झुगारून, नव्हे लढा देत आजही गावड्यांचे असे काही मांड सासष्टीत आहेत. तेथे ‘इंत्रुज’च्या पुरातन रूपातील अवशेषांचे म्हणजेच हिंदू पद्धतीची सांस्कृतिक आविष्करणंच नव्हे तर तशा विधी-विधानांचे आचरण होते. या दिवसांत वाद्यसाथीस, गीत गायन करत- ही गीतेही मूळ शिगम्यातील- मेळ काढणे, प्रथम मांडावर व मागाहून गावकर्‍यांच्या घरासमोरील अंगणात खेळ करणे. अशा खेळातून जमीनमालक, सावकार अशांना शिव्याशाप देणेही निषिद्ध वा अवमानकारक मानले जात नाही. रंगांच्या खेळार पातळ कागदात रंगीत माती भरून ङ्गेकल्यानंतर अंगावर भक्कन पुटते, कोकेती नाव.
राजसत्तेवर धर्मसंस्थेचा पूर्ण अंकुश असण्याच्या त्या काळी ख्रिस्ती धर्मात नसलेल्या इंत्रुज या प्रकाराला धर्मध्वंसक पोर्तुगीज शासनाची मान्यता मिळणे तसे दुरापास्तच. शिगमा साजरा करण्यावर बंदी आल्याने अस्वस्थ समाज; तिसवाडीतील डोंगरी हा गाव. कुण्या एकाने शक्कल काढली व त्याना ‘इंत्रुज’ करण्यासाठी परवाना मिळवला व रीती-रिवाजानुसार तेथे शिगमा साजरा झाला. ङ्गक्त त्याना तो सुमारे दोन महिने आधी करावा लागला, तो आजही तसाच चालू आहे.
होळी, रंगपंचमीनिमित्ताने अनेक प्रकारचे रंग वापरणे, उडविणे, रंगीत पाण्याच्या पिचकार्‍या, मुळात टीव्ही या माध्यमाने अशा सर्व प्रकारांचे रुजवण घातले. वृत्तपत्रांनी खत-पाणी केल्याने ते चांगलेच ङ्गोङ्गावले. नव्या नवलाईचा ध्यास धरणार्‍या तरुणाईने ते उमेदीने जोपासले. आज मोठाला वृक्ष झालेला आता हटविणे तसे दुरापास्तच.
रंगरूपे
१. बाळ्ळीतील शिडियो हा गंभीरपणे होणारा विधी. येथे पारंपरिक वेषभूषेतील चार नियोजित कुमार गड्यांना विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या शिडीला उलटे बांधून ङ्गिरविले जाते. मुंजीतील बटूंप्रमाणे यांची पूजा केली जाते.
२. कुंकळ्ळीहून ङ्गातर्प्याला स्थलांतरित ‘शांतादुर्गा कुंकळ्ळकरीन’ हिच्या छत्र्या तिच्या मूलस्थानी नाचवत आणणे होते. नावच ‘सत्र्यो.’ मूळ बारा वांगडातील आठ ख्रिस्ती धर्मीय, तर चार हिंदू यांना हा सन्मान वाटतो. म्हणून पूर्वाश्रमीच्या वेषभूषेत गुलालात माखून निघालेले हे वांगड छत्र्या नाचवितात.
३. मूळ कर्नाटकातील वीरभद्र, नृत्यावेळच्या मूळ उद्घोषणा कानडीत. विधी रूपातील असला तरी यात नृत्य, नाट्य, संगीतासह दृक्कलांचेही आविष्करण पाहावयास मिळते.
४. ‘मळकर्णे गावात. होळीवर चढणार्‍यांच्या अंगावर पेटत्या शेणीच्या ठिणग्या टाकणे हा क्रीडाप्रकार तसा विधीही.
५. कुळेनजीकचा शिगाव व ङ्गोंडा शहरात. खोलवर पुरलेला, भल्या मोठ्या ‘सांवर‘ झाडाचा बुंधा. याची साल खरवडलेली, वरून सोडत राहिलेल्या पाण्याने होणारी घसरगुंडी, यावर चढणे; शेंड्याला बांधलेला नारळ काढणे; हा दुर्ग, किल्ला सर करण्याचा प्रतीकात्म खेळ.
६. ङ्गोंडा डिचोली तालुक्यातील बर्‍याच गावातून गडे पडणे हा विधी. यांच्या अंगात येते. यावेळी ङ्गक्त ढोल साथीवर ‘गड्यां रामायण’ गाणे होते.
७. नवरो-व्हंकल या नाट्यरूपातील विडंबनात्मक प्रकारातून जीवनदर्शन घडते.
८. गावडोंगरीत भोंवोर नावाचा विधीरूप उत्सव. यात डोईवर दिवज घेतलेल्या लग्नाळू ‘दिंड’ या कुमारिका व हातात घेतलेल्या सुवासिनी, तरंग व पारंपरिक छत्र्या नाचविणारे प्रौढ, दिणो वनस्पतीची वेलबुट्टी केलेली काठी नाचविणारे. ‘दिंडे’ युवक भाग घेतात. मुलींचे दिवज व मुलांची दिण्याबडी नाचविणे हे विधी पूर्ण केल्याखेरीज त्यांना लग्नाचा अधिकार नसतो.
अ. दर तिसर्‍या वर्षीच्या ‘शिशारान्नी’ प्रकारात तीन गडे जमिनीवर झोपून, त्यांच्या शिरांच्या बनलेल्या चुलीवर भात शिजतो. चौथ्या गड्याच्या कपाळीतील रक्तात कालवलेला तो ‘चरू’ शिंपडला जातो.
९. डिचोलीतील साळ गावचे ‘गडे’, विधी तीन दिवस चालतात.
१०. लोलयेतील वीरांमेळ प्रकारात तलवारीच्या धारेवर नाचणे, शस्त्राचे वार अंगावर घेणे आहे. असाच वीरांमेळ पूर्णतः भिन्न पद्धतीतील श्रीस्थळ काणकोणचा.
११. नेत्रावळीत होणारा ‘हाणपेट’ विधी म्हणजे तलवारीचे वार करून पाठीचे रक्त भूमीवर सांडणे.
१२. जांबावलीत प्रथमतः देवावर गुलाल उधळल्यानंतर स्वतःवर गुलाल माखणे हे श्रद्धेचे प्रतीक.
१३. पेडणे तालुक्यात रोमट वा रोंबाट हे शिगम्यालाच दिलेले नाव. होळीभोवतीचा कांजा खेळ ङ्गक्त मोरजीत. होळीच्या पूजेनंतर त्या झाडावर चढणे पेडणे व मळकर्णेत.
१४. तालगडी हा खेळ बहुतेक ठिकाणी, पण तालगडी व तोणया खेळ यातील वैविध्य व संपन्नता पाहावी काणकोणात, तीसुद्धा कुळम्यांची. गोङ्ग, दिवल्यां नाच मूलतः तिकडचेच.
१५. जती गीत व गायन प्रकार गोव्याच्या बर्‍याच भागात. चौरंग, टाळो, आरत; मंत्रपठणात्मक गद्य संगीतातील झाडो हे कुळमी जीवनातच. धनगरांची हरिकथा, तर गोसांयांचे ‘सुमरण’ गीतगायन.
१६. गोव्याचाच भाग, तरी सांस्कृतिकदृष्ट्या शेष गोव्याहून भिन्न अशा सत्तरीतील काही विशेष विधी, विधाने, कार्यक्रम :-
अ. झर्मे व करंझोळ अशा दोन ठिकाणी ‘चोर पुरणे’ हा विधी आहे खेरीज पानांचे चोर.
आ. घोडे मोडणी हा विधी अनेक गावांतून.
इ. ‘रणमाले’ लोकनाट्याचे आविष्करण ही शिगम्यातील परंपरा.
ई ‘करुल्यो’ हा सती पूजनाचा प्रकार म्हणजे दोन लहान मुलांना स्त्रीवेषात सजवून घरोघरी त्यांची पूजा, ओेटी भरणे अशी विधाने.
उ. ‘राधा’ प्रकारातील खेळ धनगरांसह स्थानिकही करतात.
ऊ. न्हावण व हळदोणी हे विधी अनेक मंदिरांतून होतात.
ए. पवाडा, लावणी हे महाराष्ट्राहून वेगळे असे लोकसंगीत प्रकार. गीत आणि गायन यात निराळी सोकारत व नाव जती असले तरी भिन्न गानपद्धती व विषय.
१७. सीमा बांधणी हा शिगम्यातील प्रमुख विधी अनेक गावांतून. याला ‘सीमा दाळणी’, गड, गडी, शिमो बांदप अशी विविध नावे आहेत. सीमेवर कोंबडा कापणे, कोठे जिवंत पुरणे, कुठे सोडणे, चरू शिंपडणे, वडे ठेवणे; गावागावांनुसार बदलणारे विधी. हे वार्षिक कृत्य यथासांग झाले की सालभर इडा-पीडा गावापासून दूर राहाणार ही गावकर्‍यांची भावना.
१८. होळी पुनवेऐवजी परंपरेने ठरल्या दिवशी होणारे गाव आहेत. होळीसाठी पुरावयाचे झाड कोणते, कोठून, कधी, कसे आणायचे, कापायचे कोणी; रीती-रिवाजांनुसार होते. कुळागरबहुल प्रदेशात ते सुपारी-पोङ्गळीचे, तर इतर जंगली. यासाठी ‘होळये भाट’ नामे जमिनी आहेत.
१९. माडवीपलीकडील प्रदेशात आंब्याची पाने, ङ्गुले यांनी होळी शृंगारण्याची प्रथा आहे.
२०. शिगमा गोव्यातील सर्व-धर्म-समभाव दाखविणारा.
अ. ङ्गोंड्यात शिगम्याचे आमंत्रण तेथील मुस्लीम पीराला देण्यासाठी सुंवारी वाजवत जातात. तेथे हिरवी चादर अर्पण करतात. तेथील काझी ते निमंत्रण स्वीकारतो व नारळ, ङ्गुले, उदबत्त्या आदी घेऊन विठोबाच्या देवळात येऊन शिगम्यात सामील होतो.
ब. उसगावनजीकच्या गांजे गावी तेथील देवीची पालखी संचाराला जाताना वाटेतील पीर दर्ग्यापाशी थांबते. देवस्थानतर्ङ्गे पीराला चादर देतात, तर मुस्लीम समाजातर्ङ्गे देवीला खण, नारळ अशी ओटी दिली जाते.
क. ‘इंत्रुज’ नावे ओळखल्या जाणार्‍या ख्रिस्ती शिगम्यात, पहिल्या दिवशी मांडावर नमन होते. यावेळी गावातील हिंदू देवदेवताच नव्हे तर अधिकारी देवचारांनाही गीतातून इंत्रुजचे आमंत्रण दिले जाते.
ड. शिगम्यात म्हार्दोळला महालसेची पालखी वेलिंग साकवानजीक जायची तेव्हा शेजारील मुस्लीम कुटुंबाकडून नारळ, ङ्गळे, उदबत्त्या असे पूजा सामान (१९७२) येत असे.
ङ्ग. इंत्रुजच्या नमनात गावातील सर्वधर्मीय देवदेवतांना आवाहन; विडा, नारळ ठेवण्याचीही प्रथा.