विविध मागण्यांसाठी परिचारिकांचा पणजीत मोर्चा

0
131

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि राज्यातील सरकारी इस्पितळे व आरोग्य विभागात सुमारे दीड हजार परिचारिकांची कमतरता आहे, अशी माहिती परिचारिका असोसिएशन इंडियाच्या गोवा शाखेच्या अध्यक्ष कुंतल केरकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील प्रशिक्षित परिचारिकांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पणजी शहरात काल एक रॅली काढली. या रॅलीची सांगता आझाद मैदानावर करण्यात आली. यावेळी बोलताना केरकर म्हणाल्या की, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यासमोर परिचारिकांना भेडसावणार्‍या विविध समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. देशभर परिचारिकांच्या रॅलीचे आयोजन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात रॅली काढण्यात आली.

आरोग्य विभागातील परिचारिका व इतर कर्मचार्‍यांच्या काही समस्या आहेत. सरकारी पातळीवरून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची १३ वर्षांची समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे, असेही केरकर यांनी सांगितले. गोमेकॉमध्ये सुमारे आठशे ते नऊशे परिचारिकांची कमतरता आहे. आरोग्य विभागात सुमारे ५०० परिचारिकांची कमतरता आहे. आरोग्य खात्याने परिचारिका भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.