विरोधी पक्षांची आजपासून बेंगळुरूमध्ये बैठक

0
7

>> दोन दिवसांच्या बैठकीसाठी 26 पक्षांना निमंत्रण

येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडीची स्थापना करण्याच्या दृष्टीने देशातील विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून विरोधकांची पुढील बैठक आज सोमवार 17 आणि उद्या मंगळवार 18 जुलै रोजी बंगळुरुमध्ये होत आहे.

ही बैठक काँग्रेसने बोलावली असून काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एक प्रादेशिक पक्ष अशा आणखी दोन लहान पक्षांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ं त्यामुळे बंगळुरुमधील बैठकीसाठी निमंत्रित केलेल्या पक्षांची संख्या वाढून 26 झाली आहे. याआधी मागील महिन्यात 23 जून रोजी बिहारच्या पाटण्यात विरोधकांची बैठक झाली होती. ही बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केली होती. या बैठकीसाठी 16 विरोधी पक्षांना निमंत्रित केले होते. त्यापैकी 15 पक्ष बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत निवडणुकीपासून रणनीतीवर चर्चा केली होती.

दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे
विरोधी पक्षांची दुसरी बैठक काँग्रेसच्या नेतृत्त्वात होत आहे. ही बैठक सुरुवातीला शिमलामध्ये होणार होती. परंतु खराब वातावरणामुळे बैठकीचे ठिकाण बदलून ते बेंगळूरला करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 17 जुलै रोजी रात्री बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 18 जुलै रोजी बैठक होईल. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार आहेत.
या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. मात्र त्या थेट 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील.

आपही सहभागी होणार
बंगळुरूमध्ये होणाऱ्या या बैठकीच्या एक दिवस आधी काँग्रेसने दिल्लीच्या अध्यादेशावर आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी, आप आजपासून सुरू होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दिली.