उत्तर भारतात पूरपरिस्थिती कायम

0
7

>> अनेककडे जनजीवन विस्कळीत

>> पुरामुळे अनेक राज्यांत गंभीर स्थिती

संपूर्ण उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पावसामुळे अनेक राज्यांतील पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले
आहेत.

रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. रस्ते बंद झाल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुरामळे मोठे नुकसान झाले आहे.

आजही मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश व ओडिशा या राज्यांत आजही मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये आज सोमवार व उद्या मंगळवार हे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश तसेच मध्य प्रदेश व ओडिशामध्येही पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाब, हरियाणामध्ये जनजीवन विस्कळीत
पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे दोन्ही राज्यांतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील जवळपास 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून यामध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक भागात भूस्खलन झाले असून त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक राज्यांत गंभीर स्थिती

देशातील अनेक राज्यात पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार या राज्यांचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये धोक्याची कल्पना देणारी प्रणाली उपलब्ध नसल्याने नागरिकांना धोक्याचा सामना करावा लागत आहे.

हिमाचल प्रदेशात 8 हजार कोटींची हानी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनी अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात प्रलय होऊन भूस्खलन व आकस्मिक पूर आल्याने, तसेच रस्ते व पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याने राज्याला नुकसान सोसावे लागले असल्याचे मुख्यमंत्रीसुकू यांनी सांगितले. राज्यातून सुमारे 70 हजार पर्यटकांची सुटका करण्यात आली असून 15 हजार वाहने बाहेर पाठवण्यात आली आहेत, तर सुमारे 500 पर्यटकांनी स्वत:हून तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुखू यांनी म्हटले आहे.

यमुनेचा पूर ओसरला

यमुना नदीला आलेला पूर हळूहळू ओसरू लागला असून दिल्लीसह दिल्लीवरील भागातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज नसल्याची दिलासादायक बातमी आहे. विभागीय आयुक्त अश्वनीकुमार यांनी राजधानीतील पूरग्रस्त भागातील स्थिती सुधारत आहे. मात्र अनेक भाग अद्याप पाण्याखालीच आहेत आणि सखल भागात राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास भाग पाडले असल्याची माहिती दिली. मात्र सध्या यमुनेची पातळी ओसरू लागली आहे. पूरग्रस्त भागातही परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले.
यमुनेची पातळी तीन दिवस सातत्याने वाढल्यानंतर शुक्रवारपासून त्यात घट होऊ लागली. तथापि यमुनेची पातळी अजूनही 205.33 मीटर असून, धोक्याच्या पातळीच्या ती दोन मीटरवर वाहत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, नागरिकांना पाणी साचलेल्या भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला दिला आहे.