विरोधी पक्षनेत्यांनी खाणीप्रश्‍न सोडवण्यास पाठपुरावा करावा

0
152

>> खाण अवलंबितांची मागणी

खाण अवलंबितांनी काल विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतुल येथील निवासस्थानी भेट घेऊन तत्काळ खाणी सुरू करण्याची मागणी केली. केंद्र सरकारकडे अनेकदा निवेदने पाठवूनही खाणी सुरू न केल्याने खाण अवलंबित व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले.

गोवा सरकारही हा विषय गंभीरपणे घेत नसल्याने खाण अवलंबित संकटात सापडले आहेत. कॉंग्रेस पक्षाने खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत व सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पावसाळी विधानसभा अधिवेशनात खाणीवर प्रश्‍न विचारून खाणी सुरू करण्यासंबंधी सरकारला धारेवर धरणार असल्याचे आश्‍वासन कवळेकर यांनी यावेळी दिले. कॉंग्रेसचे सर्व आमदार विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्‍न विचारणार आहे. ही गंभीर समस्या असल्याने कॉंग्रेस आमदार पाठपुरावा करतील, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री नीलेश काब्राल व मंत्री दीपक पाऊसकर खाण विभागातील असल्याने त्यांनी हा प्रश्‍न गंभीरपणे घेण्याची आवश्यकता होती. दिल्लीत केंद्र सरकारकडे या प्रश्‍नावर बोलणी करण्यास जाताना विरोधी पक्ष आमदारांना डावलण्यात येत असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.