विरोधी आमदारांच्या मतदारसंघांत वर्षभरात विकासकामे शून्य : आरोप

0
103

राज्यातील भाजप आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या सोळा आमदारांच्या मतदारसंघात एकही विकासकाम मार्गी लागलेले नाही. राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळ गटाच्या बैठकीत चार सदस्यीय समितीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

वरील समितीकडून विकास कामांचा आढावा घेऊन अहवाल तयार केला जाणार आहे. या समितीमध्ये आलेक्स रेजिनाल्ड, फिलीप नेरी रॉड्रिग्स, दयानंद सोपटे आणि विल्फ्रेड डिसा यांचा समावेश आहे, असेही कवळेकर यांनी सांगितले. विधिमंडळ गटाच्या बैठकीत विकासकामांच्या मुद्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात कॉंग्रेसच्या १६ आमदारांची बैठक घेऊन अंदाजे १८ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच मार्च अखेरपर्यंत २८ कोटींची विकासकामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते, असे कवळेकर यांनी सांगितले.

आमदारांकडून विकास कामांच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला. परंतु नव्याने सादर एकही प्रस्तावाची निविदा काढण्यात आलेली नाही. तसेच पूर्वी निविदा जारी करण्यात आलेल्या विकास कामांना सुरुवात झालेली नाही. विकास कामाविना एक वर्ष वाया गेले आहे. २५ कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा फक्त कागदोपत्री उरली आहे, असा आरोप त्यांनी केला.