विराटची ‘राजीव गांधी खेलरत्न’ तर अजिंक्यची ‘अर्जुन पुरस्कार’साठी शिफारस

0
79

‘राजीव गांधी खेलरत्न’ क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी बीसीसीआयतर्फे भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीची तर ‘अर्जुन पुरस्कार’साठी ङ्गलंदाज अजिंक्य रहाणेचे नाव सुचविण्यात आले आहे. कोहलीला हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा सन्मान लाभल्यास दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९९७-९८) आणि भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतरचा (२००७) तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. सुमारे चार वर्षांनंतर ‘राजीव गांधी खेलरत्न’ क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे.
प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारात रोख रु. ७.५ लाख आणि मानपत्र तर अर्जुन पुरस्कारात रु. ५ लाख आणि मानपत्राचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-२० विश्‍व चषकात कोहलीने चमकदार खेळीत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुध्द एकहाती विजय मिळवून दिले होते. विराटने टी-२० विश्वचषकात १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा ठोकल्या होत्या आणि या कामगिरीवर त्याला ‘वर्ल्ड टी-२० प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट’ पुरस्कार तसेच वर्ल्ड टी-२० संघाच्या कर्णधारपदीही निवड झाली होती. विद्यमान आयपीएलमध्येही कोहली विलक्षण बहरात आहे.
गतवर्षी कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने श्रीलंकाविरुध्दची कसोटी मालिका जिंकली होती आणि त्यात रहाणेने कसोटी डावात सर्वाधिक झेलांचा विक्रम नोंदला होता.
यंदाच्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या शर्यतीत आशियाई मेळा सुवर्ण पदक विजेता नेमबाज जितू राय, स्वॉश चँपियन दीपिका पल्लिकल, धावपटू टिंटू लुका, गोल्ङ्गर अनिर्बन लाहिरी हे अन्य क्रीडापटूही आहेत.