विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि स्त्री-स्वातंत्र्य

0
310

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
संयुक्त राष्ट्रांनी आपला नुकताच जो अहवाल सादर केला, त्यानुसार जगातल्या १२ कोटी मुलींवर वयाची विशी गाठीपर्यंत लैंगिक अत्याचार वा बलात्कार होतात आणि साधारणतः १० पैकी एका मुलीचा यात बळी जातो. पुढे २०१२ सालची आकडेवारी जाहीर करताना या अहवालात म्हटले आहे की यावर्षी ९५ हजार मुलींचे खून झाले व यात गोवलेल्या देशांमध्ये दक्षिण अमेरिका व कॅरेबियन बेटे यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
आपल्या देशातील राजधानीमधील ‘निर्भया’ प्रकरण गाजले व तत्कालीन संपुआ सरकारने योग्य ती खबरदारी घेत महिलांच्या रक्षणासाठी कायदेकानून करीत काही योजनाही जाहीर केल्या. त्यानंतर ‘निर्भया’चे राजकारण करीत सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१४ – १५ चा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी काही खास योजना, सवलती जाहीर केल्या. दिल्लीत आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन केले जाणार असून त्यासाठी ‘निर्भया’ निधीतून निधी पुरवला जाईल, असे घोषित केले. त्यानंतर याच जेटली महाशयांनी ‘निर्भया’सारख्या क्षुल्लक कारणामुळे देशातील पर्यटनावर परिणाम झाल्याचे सांगत आपल्यावर टीकेची झोड उठवून घेतली.
श्री. जेटलींशिवाय दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, समाजवादी पक्षाचे अबू अजीम आझमी, आसाराम बापू आदींच्या प्रतिक्रियाही लोकांना खूप काही सांगून गेल्या. अर्थात ‘निर्भया’ सारखी प्रकरणे देशात कुठे ना कुठे घडत असतीलच किंवा असतात पण जोपर्यंत छळ झालेली व्यक्ती निर्भयपणे पुढे येत नाही, तोपर्यंत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ करून प्रकरण बंद पेटीत राहतात. पण नावाजलेल्या व्यक्तींना वृत्तवाहिन्या जास्त महत्त्व देत असल्यामुळे ही प्रकरणे मग जाहीरपणे चर्चिली जातात.
असेच एक प्रकरण सध्या केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडांच्या मुलाचे गाजत आहे, हे सूज्ञ वाचकांना माहीत आहेच. असेच एक प्रकरण गेल्या तीन-चार महिन्यांपासून गाजत आहे ते प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांचे होय. नेस वाडियाने आपला लैंगिक छळ केला अशा प्रकारची तक्रार प्रितीने पोलिसांत केली. प्रसार माध्यमांना एक चांगला ‘विषय’ मिळाला आणि दोन-तीन दिवस सातत्याने या प्रकरणाचे ‘ब्रेकिंग न्यूज’ स्वरूपात केलेले प्रसारण हा चर्चेचा विषय ठरला. वास्तविक प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि मागील चार-पाच वर्षे ते प्रेमसंबंधात राहात होते. वर्षभरापूर्वी त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले, तरी आयपीएल् मधील त्यांचे व्यावसायिक संबंध कायम राहिले. दरम्यान, पंजाब इलेव्हन टीमचे मालक म्हणून एकत्रितपणे आयोजित केलेल्या एका बैठकीदरम्यान सर्वांसमक्ष नेसने प्रितीच्या वस्त्रांना हात घालून तिला अपमानास्पद वागणूक दिली आणि मग विनयभंग, लैंगिक अत्याचाराचे आरोप उफाळून वर आले.
आपल्याला अशा अनेक गोष्टी माहीत आहेत की, घटस्फोट कोर्टात चालू असताना स्त्री गर्भवती राहते, बायको सुंदर, सच्छिल असताना नवरा ‘भलती’कडेच जातो व परत बायकोला मारहाण करतो, लग्नाची बायको नवरा व्यसनी म्हणून मुलाबाळांच्या पोषणासाठी बाहेरख्याली बनते, मुलीला लग्नाचे वचन देऊन मुलगा दुसरीकडे लग्न करतो, तत्पूर्वी त्याने या मुलीचा छळ केलेला असतो, अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. पण ज्या नावांना समाजात चलती आहे, त्यांचेच नाणे प्रचार किंवा अपप्रचाराच्या माध्यमातून पुढे येते.
आपण परवाचेच उदाहरण घेऊया. उद्योग संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितलेले बोल ऐकविले. ते असे ः ‘‘गोव्यात उद्योग सुरू करायला गेल्यास सोळा वेगवेगळ्या निरीक्षकांना सामोरे जावे लागते; परंतु बलात्कारासारखा गुन्हा केल्यास एकाच निरीक्षकाला सामोरे जावे लागते.’’ आता उद्योग संघटनेच्या बैठकीत हा उद्योग करायला त्यांना कोणी सांगितले होते? असा प्रश्‍न विचारला तर ते चूक ठरेल काय?
आणखी एक उदाहरण पब संस्कृती, बिकिनी, कॅसिनो बंद करण्यासाठी प्रमोद मुतालिक गोव्यात येत आहेत, यावर भाष्य करताना भाजपचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिश्किता वदले, ‘‘भाजपा प्रमोद मुतालिकांच्या मतांशी सहमत आहे; परंतु त्यांनी ज्या पद्धतीने ते केले, ते निषेधार्ह आहे.’’ मग मुतालिक ही आगळीक करीत आहेत हे डॉक्टरांनी त्यांच्या कानावर घातले की फक्त त्यांची पद्धत चुकीची आहे, म्हणून ते गप्प बसले हे कसे कळायचे? म्हणून या लहान-मोठ्या गोष्टीच मग विनयभंग, लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि मग खून-खराबा याला कारणीभूत ठरतात, हे कोणी कोणाला सांगावे बरे?
एका बाजूने आपण स्त्री-सक्षमीकरण, स्त्रियांचे आरक्षण, स्त्री-स्वातंत्र्य यांचा डांगोरा पिटायचा व दुसर्‍या बाजूने पाच-दहा वर्षांची मुलगी, अविवाहित स्त्री, विवाहित स्त्री, विधवा स्त्री या आया-बहिणींची अब्रू लुटायची हेच का ते एकविसाव्या शतकाचे साध्य? या सार्‍याचा विचार आता शिकून-सवरून आपल्या पायांवर उभ्या राहिलेल्या तरुणाईपासून तो स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष करणार्‍या स्त्रीवर्गाने केला पाहिजे व आपल्याला एक प्रश्‍न विचारला पाहिजे, तो म्हणजे स्वच्छंदपणे वागणे, बागडणे आणि नंतर बिघडणे हे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत आहे का? स्त्री-स्वातंत्र्य म्हणजे मद्यपान, धूम्रपान, जुगार, पार्ट्या आणि हवे तेव्हा-हवे तसे-हवे त्याच्याशी वागणं एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? की संस्कार-संस्कृती आणि सद्विचारांचा प्रसार मुलाबाळांमध्ये, समाजामध्ये, स्त्रीवर्गामध्ये करणे हे खरे स्त्री-स्वातंत्र्य?