विधानसभेचे कामकाज तब्बल चार वेळा तहकूब

0
109

भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांंबरे यांना मारहाण केल्याच्या खोट्या आरोपाखाली पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केल्याच्या कारणावरून काल विरोधी आमदारांनी गोवा विधानसभा सभागृहात गोंधळ घालून सभापतींनी आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यास पर्वरी पोलिसांना कशी परवानगी दिली, असा सवाल सभापतींना केल्याने विधानसभेचे कामकाज काल सभापतींनी चार वेळा तहकूब केले. त्यामुळे काल विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या व शून्य तासाला कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.

काल गोवा विधानसभेचे कामकाज सकाळी ११.३० वा सुरू झाले असता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे उभे राहिले व त्यांनी सभापतींना आपणाला एक मुद्दा मांडायचा असल्याचे सांगून प्रश्‍नोत्तराचा तास सुरू करण्यास हरकत घेतली. यावेळी सभापतींनी प्रश्‍नोत्तराचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला असता कामत म्हणाले की, या सभागृहाचे प्रमुख या नात्याने सभापती हे या सभागृहातील आमदारांचे एका प्रकारे वडीलच आहेत आणि तुम्ही सर्व आमदारांचे हित पाहायला हवे. यावेळी दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांनी आमदार रोहन खंवटे यांना भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांंबरे यांच्यावर हल्ला केल्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे सभापतींच्या नजरेत आणून दिले. घटनेची योग्य प्रकारे चौकशी करण्याचा आदेश न देताच तुम्ही बुधवारी मध्यरात्री रोहन खंवटे यांना अटक करण्यास पोलिसांना मान्यता कशी दिली असा प्रश्‍नही कामत व सरदेसाई यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना विचारला.

यावेळी स्पष्टीकरण देताना राजेश पाटणेकर म्हणाले की ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान प्रेमानंद म्हांंबरे यांनी आमदार रोहन खंवटे यांनी आपणाला मारहाण केल्याची पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी मध्यरात्री १.५० वाजता (६ फेब्रुवारी) त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

यावेळी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, तक्रारदाराने विधानसभा प्रांगणात ज्यावेळी आपणाला रोहन खंवटे यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे त्यावेळी खंवटे यांच्याबरोबर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार खंवटे यांनी म्हांबरे यांना मारहाण केली नव्हती. तुम्ही सभापती या नात्याने घटनेची योग्य ती चौकशी करण्याचा आदेश द्यायला हवा होता. मात्र, तसे न करता तुम्ही खंवटे यांना अटक करण्याचा आदेश कसा काय दिला, असा प्रश्‍न कामत यांनी केला.

विजय सरदेसाई हे यावेळी बोलताना म्हणाले की हा लोकशाहीचा खून आहे. यावेळी दिगंबर कामत, विजय सरदेसाई, प्रतापसिंह राणे, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, सुदिन ढवळीकर, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, रोहन खंवटे, लुईझिन फालेरो या आमदारांनी आपली आसने सोडून सभापतीच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब केले.

१२ वाजता सभापतींनी कामकाज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालीत सभापतीच्या आसनासमोर धाव घेऊन गोंधळ घातला. यावेळी सुदिन ढवळीकर यांनी आजचा दिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, असे सांगितले. विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आल्यानंतर पाटणेकर यांनी १२.३० पर्यंत पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

मार्शलकरवी १० आमदार पहिल्यांदाच सभागृहाबाहेर
गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी गटातील दहा आमदारांना मार्शलाचा वापर करून सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली. चार माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्र्यांना मार्शलांद्वारे विधानसभेतून बाहेर काढण्याची कृती निषेधार्ह आहे. सभापतींनी या प्रकरणी योग्य चौकशी करून निर्णय घेण्यास अपयश आले आहे, असे रवी नाईक यांनी सांगितले.

भाजपला साथ दिल्याचे खंवटेंना फळ : कॉंग्रेस
कॉंग्रेस पक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेचा निषेध करीत आहे. वर्ष २०१७ मध्ये आमदार खंवटे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याचे त्यांना फळ मिळाले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. सभापतींनी ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे यांना बोलावून माहिती जाणून घ्यायला हवी होती. तथापि, सभापतींनी पक्षपाती भूमिका घेऊन भाजपला लोकशाहीचा खून करण्यास मदत केली, असा आरोप पणजीकर यांनी केली.