आमदार रोहन खंवटे यांना अटक व सुटका

0
237

विरोधकांना मार्शलकरवी बाहेर काढले

>> विधानसभेत प्रचंड गदारोळ
>> कामकाज चार वेळा तहकूब

 

माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांची भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना केलेल्या कथित मारहाण व धमकी प्रकरणी पोलिसांनी काल पहाटे सभापतींच्या अनुमतीनंतर अटक करून नंतर जामिनावर सुटका केली. या घटनेचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. विरोधकांनी जोरदार गदारोळ माजवल्याने चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव मात्र सरकारच्या बाजूने राहिले. दरम्यान, विरोधी आमदारांनी प्रेमानंद महांबरे यांना अटक होईपर्यंत विधानसभेचे कामकाज होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
पर्वरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या विरुद्ध भाजप प्रवक्ते प्रेमानंद म्हांंबरे यांनी मारहाण व धमकी दिल्याची तक्रार बुधवारी पर्वरी पोलिसात दिल्यानंतर खंवटे यांना गुरुवारी पहाटे १.३० च्या सुमारास पर्वरी पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक करण्याची घटना घडल्याने काल राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सध्या गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून खंवटे यांच्या अटकेचे पडसाद गुरुवारी गोवा विधानसभेतही उमटले.
म्हांबरे यांनी पर्वरी पोलिसांत केलेल्या तक्रारीत आपण बुधवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेण्यास गेलो होतो. दुपारी १.३० च्या सुमारास आपण विधानसभा इमारतीतून बाहेर येत असताना तेथे आमदार रोहन खंवटे यांनी आपला हात जोराने पकडला व नंतर झिडकारला. तसेच आपल्याला मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. म्हांबरे यांच्या या तक्रारीनंतर सत्ताधारी गटात खळबळ उडाली. बुधवारी म्हांबरे, कुंदा चोडणकर व गुरुप्रसाद पावस्कर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रोहन खंवटे यांनी प्रेमानंद म्हांबरे यांना मारहाण करुन धमकी दिल्याचे पत्रकारांना सांगितले होते. खंवटे यांच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध म्हांबरे यांनी आवाज उठवल्यानेच खंवटे हे खवळले व त्यांनी त्यांंच्यावर हल्ला केल्याचे तानावडे यांनी सांगितले होते.
दरम्यान, खंवटे यांना गुरुवारी पहाटे पर्वरी पोलिसांनी अटक केल्याचे व मारहाणीची घटना खरी आहे की नाही याची शहानिशा न करताच सभापती राजेश पाटणेकर यांनी रोहन खंवटे यांना अटक करण्यास पर्वरी पोलिसांना परवानगी दिल्याचा आरोप करून काल गोवा विधानसभेतील रोहन खंवटे यांच्यासह १० विरोधी आमदारांनी विधानसभेत एकच गदारोळ माजवला. त्यामुळे सकाळच्या सत्रात सभापतींना सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.
दुपारी २.३० वा. सभापतींनी पुन्हा कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी पुन्हा गदारोळ माजवल्याने सभापतींनी ३ वाजेपर्यंत पुन्हा एकदा कामकाज तहकूब केले. नंतर दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अर्थसंकल्प सादर करीत असताना विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरवात केल्यानंतर सभापतींनी सर्व विरोधी आमदारांना शांतता पाळा अथवा बाहेर चला अशी सूचना केली. पण विरोधी आमदार बाहेर जात नसल्याचे दिसून आल्यानंतर मार्शल्सचा वापर करुन त्यांना सभागृहातून बाहेर घालण्यात आले.
दरम्यान, आमदार रोहन खंवटे व भाजपचे पदाधिकारी यांनी एकामेकांवर आरोप व प्रत्यारोप करण्यास सुरवात केल्याने पर्वरी मतदारसंघातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. पर्वरी येथील एक मशीद पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच आपल्या मतदारसंघात कित्येक सुशिक्षित गोमंतकीय युवक हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकत असून त्यांना त्रास देत असल्याचा आरोपही खंवटे यांनी विधानसभेत केला होता. तर तानावडे यांनी खंवटे यांनी दादागिरी केल्याने त्यांचे मंत्रीपद काढून घेतले होते. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनले असल्याचे म्हटले आहे.

ती तक्रार खोटी : रोहन
दरम्यान, सकाळच्या सत्रात आपल्या अटकेविषयीची माहिती सभागृहाला देताना प्रेमानंद म्हांंबरे यांनी आपणाविरुद्ध पर्वरी पोलिसांना दिलेली तक्रार ही खोटी आहे. त्या तक्रारीची शहानिशा न करता गुरुवारी पहाटे १.३० च्या दरम्यान पोलिस आपल्या घरी आले त्यावेळी आपण खोलीत झोपलो होतो. आपणाला उठवून पर्वरी पोलिस स्थानकात नेऊन अटक करण्यात आल्याचे खंवटे यांनी सांगितले. नंतर काही तासानंतर आपली जामीनावर सुटका झाल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

मध्यरात्री नाट्यमय अटक
भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुरुवारी पहाटे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यात आल्याचे उपअधीक्षक ऍडव्हिन कुलासो यांनी काल सांगितले. खंवटे यांना ३४१ व ३२३ कलमांखाली अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी मध्यरात्रीनंतर खंवटे यांना अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, या संबंधी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. खंवटे यांना अटक करण्यापूर्वी ते आमदार असल्याने सभापती राजेश पाटणेकर यांची परवानगी घेण्यात आल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू असल्याने त्यांना अटक करण्यापूर्वी सभापतींची परवानगी घेण्याची गरज होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले. खंवटेे यांनी आपणाला धमकी दिल्याची तक्रार म्हांबरे यांनी बुधवारी पर्वरी पोलिसात केली होती, असे सूत्रांनी सांगितले.