दबावामुळे कारवाई केलेली नाही ः सभापती

0
243

अपक्ष आमदार रोहन खंवटे अटक प्रकरणी दबावाखाली कोणतीही कृती केली नाही, असे स्पष्टीकरण सभापती राजेश पाटणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.

प्रेमानंद म्हांबरे धमकी प्रकरण विधानसभेच्या आवारात घडलेले आहे. पोलीस खात्याकडून या प्रकरणी चौकशी केली जात आहे. विधानसभेत घडलेल्या या प्रकरणाची फुटेज उपलब्ध आहे. पोलिसांनी फुटेज मागितलेली नाही. पोलिसांनी फुटेज मागितल्यास त्यांना उपलब्ध केली जाईल. या घटनेचे आमदार प्रतापसिंह राणे साक्षीदार आहेत. त्यांनी आपली जबानी पोलिसांना द्यावी, असे सभापती पाटणेकर यांनी सांगितले.

विरोधी आमदारांनी सभागृहातील कामकाजासाठी सहकार्य करावे म्हणून विरोधी आमदारांशी बैठक घेण्यात आली होती. परंतु, या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. आपण दबावाखाली अटक करण्यास मान्यता दिल्याचे विरोधी आमदारांचे म्हणणे चुकीचे आहे, असेही सभापती पाटणेकर यांनी सांगितले.

म्हांबरे यांनी या कथित प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षकांना या तक्रारीची चौकशी करण्याची सूचना केली होती. म्हांबरे यांनी पर्वरी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार ५ रोजी रात्री उशिरा आमदार खंवटे यांना अटक करण्यास मान्यता दिली, असे सभापती पाटणेकर यांनी सांगितले.

विरोधी आमदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. दुपारनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केल्यानंतर आसनासमोरील मोकळ्या जागेत आलेल्या विरोधी गटातील सदस्यांना कामकाज चालविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.