विधानसभा पोट निवडणुकांसाठी कॉंग्रेसची सज्जता : कवळेकर

0
85

कॉंग्रेस विधीमंडळ गट व प्रदेश कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत लवकरच होणार असलेल्या वाळपई व पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून वरील दोन्ही जागा भाजपला मिळू नयेत, यासाठी पक्ष कंबर कसून काम करेल, असा विश्‍वास विधीमंडळ नेते बाबू कवळेकर यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला.
मागील विधानसभेत कॉंग्रेसचे फक्त ६ आमदार होते. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे १७ आमदार निवडून आले. असे असतानाही आपल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली गेली नाही. असे असले तरी आज ना उद्या कॉंग्रेसचेच सरकार स्थापन होईल. निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाबद्दल बैठकीत कार्यकर्त्यांचे व मतदारांचे अभिनंदन केल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. पक्ष कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. पक्षकार्यकर्त्यांचा हा विजय आहे, असे कामत म्हणाले. सरकार स्थापन करण्यापासून कॉंग्रेसला वंचित ठेवले तरी पक्षाचे नितीधैर्य खचणे शक्य नाही, असे कामत म्हणाले.
मी कॉंग्रेसमध्येच
असेन : प्रतापसिंह
कॉंग्रेस सोडण्याच्या विश्‍वजीत राणे यांच्या निर्णयात आपण मुळीच हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून आपण कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी काल पत्रकारांना सांगितले. पोट निवडणुकीत विश्‍वजीत विरोधात प्रचार करण्याच्या बाबतीत आपण काहीही ठरविलेले नाही, असेही ते म्हणाले.

प्रादेशिक आराखडाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी
जनतेची माफी मागावी : कॉंग्रेस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात राज्याचा प्रादेशिक आराखडा डिसेंबर अखेरपर्यंत खुला होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच सरकारातील नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, डिसेंबरपर्यंत आराखडा खुला होण्याच्या बाबतीत शंका व्यक्त करीत आहेत, हा काय प्रकार आहे, असा प्रश्‍न करून अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. गेली पाच वर्षे यूटर्नसाठीच हे सरकार प्रसिध्द होते. आता त्यांना विजय मिळाला आहे. त्यामुळे यूटर्नची आता पुन्हा सुरुवात होईल, असे ते म्हणाले. अर्थसंकल्पातूनही सरकारने तशी जनतेची फसवणूक केली आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक आराखड्याच्या बाबतीत जनतेला स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन चोडणकर यांनी केली आहे.