विधवा महिलांना दोन योजनांचा लाभ मिळवून देणार

0
18

>> समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती; कायद्यात आवश्यक दुरुस्ती करणार

समाज कल्याण खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मानधनाची रक्कम ठरावीक दिवशी त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. विधवा महिलांना १८ वर्षांखालील मुले असल्यास त्यांना खात्याच्या दोन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.
विधानसभेत समाजकल्याण, पुरातत्त्व खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री फळदेसाई बोलत होते.

समाज कल्याण खात्याचा सुमारे ९७ टक्के निधी सामाजिक योजनांवर खर्च केला जात आहे. दयानंद सामाजिक योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनाची ङ्गक्त जून महिन्याची रक्कम प्रलंबित आहे. शिष्यवृत्ती योजनेखाली १४ हजार १०४ अर्ज निकालात काढण्यात आले आहेत, असे सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
कोविड महामारीच्या काळात नुकसान सहन केलेल्या लघू उद्योजकांना ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आर्थिक मदतीसाठी १ लाख १४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली असून, आत्तापर्यत २६ हजार अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. या योजनेच्या सर्व अर्जदारांना एकाच वेळी निधीचे वितरण केले जाणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
दिव्यांग नागरिकांना सरकारी कार्यालयात सुलभ प्रवेश देण्यासाठी उपाययोजना हाती घेतली आहे. ३५ सरकारी कार्यालयात सुलभ प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

१५० अर्ज प्रलंबित

कोविड महामारीत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे आर्थिक सहाय्याचे १५० अर्ज प्रलंबित आहेत. कोविड महामारीत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबीयांना २ लाखांचे आर्थिक सहाय्य केले जात आहे, असेही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.