– वि. स. आजगावकर( कैलासनगर-अस्नोडा )
अजाण वयात अश्लील दृश्यांचा विपरीत परिणाम मुलांवर होण्याची दाट शक्यता असते. प्रसार माध्यमांबरोबरच समाजातील सुसंस्कृत नागरिक व बिगर शासकीय संस्थांनी देखील युवायुवतींच्या स्वैराचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर ‘बेशिस्त भारत’ निर्माण होण्यास फार विलंब लागणार नाही!!
कारणे कोणतीही असोत, आजचे काही विद्यार्थी बेशिस्त बनत चाललेत हे वास्तव चित्र आहे. विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला स्वैराचार हे शिक्षणाच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या अधोगतीचे लक्षण आहे. हे चित्र असेच राहिल्यास ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘शायनिंग इंडिया’ ही केवळ स्वप्ने राहतील. मुलांचे नको ते चोचले पुरवणे, त्यांचे अति लाड करणे नि योग्य ती समज न देणे, अर्थात त्यांच्यावर योग्य ते संस्कार न करणे यामुळे ती भरकटत जातात. यास मूलतः मुलांचे पालक जबाबदार असतात. शाळा, समाज तसेच वडिलधार्या माणसांसमोर कसे वागावे याचे डोस प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना योग्य वयात दिले पाहिजेत.
आजच्या मुलांना त्यांच्या पालकांबद्दल तसेच शिक्षकांबद्दल ‘आदरयुक्त भीति’ नसल्याने ती मनसोक्त वागताना दिसतात. मुलांची ही मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. मुलांच्या चुका वेळीच सुधारल्या गेल्या पाहिजेत. शिस्त, नीतिमत्ता, देशभक्ती यांचे डोस वेळीच पाजले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणार्या शिक्षकांना उत्तेजन मिळाले पाहिजे. दुर्दैवाने असे चित्र अभावानेच आढळते.
आज अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना वरीष्ठ पातळीवरून अवास्तव पाठिंबा मिळत असल्याने हा विद्यार्थी बेशिस्त बनत चाललाय. बॉय फ्रेंड, गर्लफ्रेंड, सोशल मिडिया नेटवर्किंग, व्हॉट्स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्या अतिवापरामुळे आजची पिढी भरकटत चालली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणीच हे गांभीर्याने घेत नाही. शिक्षकांना मात्र उपदेशाचे डोस नेहमी पाजले जातात. याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी चालेल, शिक्षकांनी मात्र नियम पाळले पाहिजेत.
शिक्षकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास अशा शिक्षकांवर कारवाई ही झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर अतिव्रात्य व बेशिस्त मुलांना मोकाट न सोडता त्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स चाळ्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. प्रसारमाध्यमे ही ज्ञान व समाज प्रबोधनाची कोठारे असल्याने त्यांनी उघडा-वाघडा रोमान्स दाखवणे बंद केले पाहिजे. कारण अजाण वयात अश्लील दृश्यांचा विपरीत परिणाम मुलांवर होण्याची दाट शक्यता असते. प्रसार माध्यमांबरोबरच समाजातील सुसंस्कृत नागरिक व बिगर शासकीय संस्थांनी देखील युवायुवतींच्या स्वैराचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर ‘बेशिस्त भारत’ निर्माण होण्यास फार विलंब लागणार नाही!!