आता वाद पुरे!

0
130

सध्या दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेले गोव्याचे प्रतिभावंत साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्या ‘सुदिरसूक्त’ या कोकणी काव्यसंग्रहावरून पेटवला गेलेला वाद अजून शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या पुस्तकाला पुरस्कार देण्यावरून सुरू झालेला हा वाद पोलीस, न्यायालय, सरकार अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचला आणि माध्यमांपासून सामाजिक माध्यमांपर्यंत विविध घटकांकडून हिरीरीने लढला गेला. कोणीही उठावे आणि या वादाच्या आगीत आपल्या चार काड्या सरकवून कंड शमवून घ्यावा असा प्रकार आतापावेतो चालला आहे. अनेक हितसंबंधी घटक या वादात जोमाने उतरलेले दिसतात. जात, भाषा, पक्ष अशा आपापल्या हितसंबंधांनुरूप सोईस्कर भूमिका घेत ती तावातावाने मांडली जाताना दिसते आहे. त्यात भर पडली ती कोकणी अकादमीचे सर्वच पुरस्कार सरकारने रद्द केल्याने आपल्या पुरस्कारांवर पाणी सोडावे लागल्याने खवळलेल्या मंडळींची. त्यामुळे हा सारा चिखलकाला महिने उलटले तरी सुरूच आहे. मुळात हा वाद एवढा विकोपाला जाण्याची गरज होती का? परंतु या वादावर भाष्य न करणे हा जणू काही गुन्हा आहे असा काहींचा तोरा आहे. खरे म्हणजे विष्णू वाघ यांची कविता, तिची गुणवत्ता यावरून सुरू झालेली ही चर्चा आतापावेतो अनेक घटकांना उघडे पाडून गेली आहे. या वादात तथाकथित पुरस्कारांच्या परीक्षणाची पातळी काय असते हे दिसले, पुरस्कार प्रक्रियेतील सावळागोंधळ दिसला, संभावित चेहर्‍यांखाली लपवलेली जातीनिष्ठा कशी खोलवर गेलेली असते हे दिसले, डबक्यातल्या बेडकांनी परस्परांवर उडवलेले शिंतोडे किंवा परस्परांची केलेली पाठराखणही दिसली. थोडक्यात, गोव्यातील कोकणी – मराठी साहित्यविश्वातील उथळपणाचा हा खळखळाट समाजाच्या कानठळ्या बसवून गेला. ‘सुदिरसूक्त’ या कवितासंग्रहामध्ये जो विद्रोही स्वर वाघांनी लावला आहे, त्याला मुख्यत्वे जातीय धार आहे, त्यामुळे आज या वादालाही जातीय परिमाण लाभले आहे. शोषित बहुजन समाजाचा हा स्वर आहे असा एकूण वाघांच्या या कवितेचा आव आहे. ‘आव’ म्हणण्याचे कारण वाघांच्या वेळोवेळी बदलत गेलेल्या निष्ठा आणि तात्त्विक कोलांटउड्या सर्वविदित आहेत. त्यामुळे विद्रोहाचा हा स्वर अस्सल आहे की नाटकी हा प्रश्नही उपस्थित झाल्याविना राहात नाही, परंतु याचा अर्थ वाघांची ही कविता कचराकुंडीत फेकण्याच्या लायकीची आहे असेही नव्हे. या संग्रहातील ‘संद’ सारख्या काही कविता पातळीहीन जरूर आहेत, परंतु एकूण विद्यमान कोकणी कवितेच्या तुलनेत वाघ यांच्या या संग्रहातील इतर अनेक कविता दुय्यम म्हणता येत नाहीत. काही कवितांमध्ये कचकचीत शिव्या आल्या आहेत, परंतु विद्रोही कवितेमध्ये अशी शिवीगाळ सर्व भाषांमध्ये आशयाच्या अपरिहार्यतेपोटी वा आशयाला अधिक जळजळीतपणे व्यक्त करण्यासाठी आलेली दिसेल. वाघांच्या कवितेची ही भाषा त्यांच्या मराठी कवितेतील भाषेपेक्षा मात्र वेगळी आहे. ‘‘दुःखाचा हा उचलुनी भारा, आई नको ग चालू | घेऊन येईन आभाळातून नक्षत्रांचा शालू’ सारख्या ह्रदयस्पर्शी भावकविता लिहिणार्‍या वाघांनी शोषितांचे दुःख आपल्या मराठी कवितेतही जरूर मांडले आहे. ‘‘थकले रे ओठ तरी क्रांतिगीत म्हण | असा जुल्मावरी घालायला शेवटचा घण | कटर घणचे कटर घण!’’ अशा संयतपणे कवितेमधून बहुजनांची व्यथा मांडून त्यांना चेतवणार्‍या वाघांची भाषा ‘सुदिरसूक्त’ मध्येच एवढी जळजळीत आणि आक्रस्ताळी का बनली याचे उत्तर तेच देऊ शकले असते. दुर्दैवाने ते या वादाचा प्रतिवाद करण्याच्या स्थितीत नाहीत. या संग्रहातील कवितांची एकूण मांडणी जर पाहिली, तर वाघांना त्यातून अपेक्षित असलेली दृष्टी दिसते, जिच्याकडे या वादात सपशेल दुर्लक्ष झाले आहे. विशेषतः या संग्रहातील शेवटच्या एक दोन कविता वाचल्या, तर या संग्रहाचे त्यांना अपेक्षित असलेले सार लक्षात येईल. जातीविरहित समाजाकडे जाण्याची भावना त्यात व्यक्त झालेली आहे. ‘खुशी आणि वेदनेला कोणती जात असते?’ असा सवाल वाघांनी केला आहे. ‘‘वयो मोडपाच्यो रे वयो मोडपाच्यो, जाती – पाती – धर्माच्यो वयो मोडपाच्यो’’ हे त्यांना अपेक्षित असावे, परंतु हा विचार मांडणारी त्यांची भूमिकाच जातीयवादी ठरली आहे. ही जी जातीपातीची बंधने मोडण्याची भूमिका ते मांडताना दिसतात ती किती प्रामाणिकपणे मांडलेली आहे ही शंका वाटते, कारण एरव्हीचे विष्णू सूर्या वाघ निवडणुकीच्या तोंडावर एकाएकी विष्णू सूर्या ‘नाईक वाघ’ बनले होते. पण काही झाले तरी हा साहित्यातील, वक्तृत्वातील, राजकारणातील ढाण्या वाघ आज जायबंदी स्थितीत आहे. अशा वेळी हा वाद एवढा विकोपाला नेऊन आपापला कंड शमविणे आता तरी थांबायला हवे. सोशल मीडियावर शिमगा घालताना त्यातून अनेकांचे स्वतःचेच बुरखे फाटत चालले आहेत हे विसरू नये!