तुलसी विवाह ः एक संस्कार

0
239

– लक्ष्मी जोग (खडपाबांध-फोंडा)

 

मानवाला जीवन जगताना, तो कितीही स्वतःला स्वयंसिद्ध समजत असला तरी निसर्ग, त्यातले प्राणिमात्र यांची मदत घ्यावीच लागते. या सगळ्याचा अगदी सांगोपांग, अगदी बारकाईने विचार करून संपूर्ण वर्षाची संरचना आपल्या ऋषीमुनींनी, विद्वान तत्त्वज्ञांनी, बुद्धिमान पूर्वसुरींनी केलेली आहे.

सांजवातीच्या सौम्य प्रकाशात दिवसभराचे कष्ट, मान-अपमान विसरायला लावणारी, क्षणभर विसावा देणारी तुळस!! बहुगुणी, बहुपयोगी, सहज उपलब्ध होणारी तुळस!! म्हणूनच तिचा भगवंताशी विवाह! एरवी असे भाग्य प्राप्त होणे दुरापास्त!

 

सर्वकाही उत्तम आरोग्यासाठीच!

काही लोक आपल्या भारतीय संस्कृतीकडे मनात विकल्प आणून बघतात. त्यांना वाटतं इथं खूपच कर्मकांडं आहे बुवा! आज या झाडाची पूजा तर उद्या त्या नागाची पूजा! या देवाला त्या झाडाची पत्री तर त्या देवीला त्याच विशिष्ट झाडाची फुलं वाहायची! खूपच गुंतागुंत आहे या संस्कृतीत! रोज काही ना काही विशेष आहेच. शिवाय महिने, ऋतू यांच्या अनुषंगाने सण असतात ते वेगळेच. विविधतेने नटलेली ही संस्कृती सर्वसमावेषक आहे हे त्यांना पटवून द्यावं लागतं. मानवाला जीवन जगताना, तो कितीही स्वतःला स्वयंसिद्ध समजत असला तरी निसर्ग, त्यातले प्राणिमात्र यांची मदत घ्यावीच लागते. या सगळ्याचा अगदी सांगोपांग, अगदी बारकाईने विचार करून संपूर्ण वर्षाची संरचना आपल्या ऋषीमुनींनी, विद्वान तत्त्वज्ञांनी, बुद्धिमान पूर्वसुरींनी केलेली आहे. त्यांचे हे कर्तृत्व पाहिलं की आपण आश्‍चर्याने थक्क होतो. निसर्गातील प्रत्येक वनस्पतीचा त्यांनी अभ्यास करूनच सण-व्रते-उत्सव यांची योजना केली. माणसाने आपले जीवन सदोदित आनंदी, सुखमय व आरोग्यपूर्ण जगावे यासाठीच त्यांचा हा सारा खटाटोप होता. माणूस कायम कार्यमग्न रहावा म्हणजे त्याचे आरोग्यही चांगले राहते हे त्यांनी जाणले होते.

मोठी दिवाळी…
वर्षारंभी येणार्‍या गुढीपाडव्याच्या सणापासून ते फाल्गुनातील शिमग्यातील रंगपंचमी व पौर्णिमेपर्यंत दर महिन्याला येणार्‍या सणांची सांगता होते. गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा होते न होते तोच दिवाळीचे आकाशकंदील उंचावर विराजमान होतात. या सगळ्या सणांत फुले व पत्री महत्त्वाची. दिवाळीतसुद्धा नरकासूर रुपी कडु कारीट पायाच्या टाचेने फोडतो. दिवाळीनंतर वेध लागतात ते मोठ्या दिवाळीचे. म्हणजेच तुळशीविवाहाचे. या विवाहाची तयारी खूप आधीपासून म्हणजे आषाढात ज्यावेळी चातुर्मास सुरू होतो त्या दिवसापासून! तुळशीचे गोजिरवाणे रोप नवीन माती घालून वृंदावनात रोवलं जातं.. त्या क्षणापासून!! पावसाची रिप्‌रिप् फार असल्यामुळे माता-भगिनी त्या रोपाला फुलानंच शिंपडून पाणी घालतात. असं हे रोप दिसामासाने वाढू लागते आणि कार्तिक शु. द्वादशीपर्यंत छान डवरते.

आपल्याकडे तुलसी, रूई या वनस्पतींचे विवाह तर वड, पिंपळ, औदुंबर यांचे व्रतबंध(मुंज) करण्याचा प्रघात घालून शास्त्राने त्यांना मानाचा दर्जा दिला आहे. तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती असल्यामुळे शास्त्राने तिचे नाते देवांशी, पितरांशी आणि मानवाशी जोडले आहे. तिला वृंदा, वृंदावनी, विष्णुप्रिया, बारिका, सुमुखा, गंधपनिजनक, पूर्णसा, दिव्या, सरला अशी अनेक नावे आहेत. त्याशिवाय तिला सुरसा, सुलभा, बहुमंजिरी, गौरी, शुलघ्नी, देवदुंदुभी अशी नावे तिच्यातील औषधी गुणधर्मावरून पडलेली आहेत. तुळस इतर सर्व वनस्पतींपेक्षा अधिक ऑक्सीजन (प्राणवायू) हवेत सोडते. पर्यावरणात होणारे प्रदूषण रोखण्याचे काम तुळस करते. यावरून आपल्या लक्षात येते की आपल्याकडे सकाळ-संध्याकाळ तुळशीची पूजा करण्याची प्रथा किती सार्थ आहे!!

दारातल्या तुळशीजवळ सकाळी रांगोळी घालताना.. दुपारी पूजा करताना.. व प्रदक्षिणा घालताना तसेच तिन्हीसांजेला सांजवात लावताना… अशा कितीतरी खेपा स्त्रिया घालतात. त्यामुळे तिच्या आसपास राहण्याचा लाभ त्यांना मिळतो. जिच्या केवळ दर्शनाने पापनाश, स्पर्शाने शरीरशुद्धी, वंदनाने रोगनाश व तिला पाणी घालण्याने मृत्युभयाचा नाश होतो, अशा तुळशीला वाढवून कृष्णचरणी अर्पण केली असता मुक्ती मिळते. म्हणून तिचा विवाह करून तिला कृष्णाला अर्पण करायची. कनक नावाच्या राजाची कन्या किशोरी हिने हा विधी प्रथम कार्तिक शु. एकादशीला केला व ती वैधव्यदोषातून मुक्त झाली. स्कंधपुराणात ही कथा सांगितली आहे. तेव्हापासून एकादशीपासून ते कार्तिकीपौर्णिमेपर्यंत तुलसी विवाहविधी केला जातो.
कथा तुळशी विवाहाची!

तुळशी विवाहाच्या संदर्भात पुराणातील कथा ग्राह्य धरून तुलसी विवाह करतात. पुराणकाळी जालंधर नावाचा राक्षस भयंकर उन्मत्त झाला होता. सर्व देवांना त्याने पराभूत केले होते. त्यावेळी देव शंकराला शरण गेले. शंकरानेही त्याच्याशी युद्ध केले पण त्यांनाही तो वरचढ झाला. मग ते सगळे देव विष्णुकडे गेले. तेव्हा श्रीविष्णुंनी अंतर्ज्ञानाने जाणले की जालंधर पराभूत होत नाही. त्याचे वर्म त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्यात आहे. तिच्या पातिव्रत्याचा भंग झाला तरच त्याचा नाश होईल. शेवटी श्रीविष्णूच जालंधराचे रूप घेऊन त्याच्या पत्नीकडे म्हणजे तुलसीवृंदेकडे गेले व त्यांनी तिचा पातिव्रत्यभंग केला. वृंदेच्या लक्षात ही लबाडी आल्यानंतर तिने श्रीविणुंना शाप दिला की ‘तू दगड होशील’. तेव्हा देवांनी ‘हे कर्म लोककल्याणासाठी केले..’ अशी तिची समजूत घातली. ‘‘मी दगड झालो तरी तुझ्याशिवाय राहणार नाही. तू वनस्पती रुपाने माझ्या जवळ राहशील. तुझ्या पानाशिवाय माझी पूजा होणार नाही. तू सदैव मला प्रिय राहशील!’’ तरीही वृंदा पतीसमवेत सती गेली. विष्णू शोकमग्न झाले. तिथल्या भस्मातून तुळस उगवली व विष्णू शालिग्राम रूपात तिथे प्रगट झाले. तुलसी विष्णूची परमभक्त होती. या सगळ्या प्रसंगाची आठवण म्हणून कार्तिक मासात तुलसी विवाहाची पद्धत आहे. कारण कार्तिक मासातील तो कार्तिक स्नानाप्रमाणेच एक मुख्य भाग आहे.

आपल्या मुलीचे लग्न ज्या विधीप्रकारे करतो त्याचप्रमाणे तुलसी विवाह करावा असे सांगितले आहे. यामध्ये गुरुजींना वरपिता मानून वाग्‌दान, मधुपर्कपूजा, मंगलाष्टके, कन्यादान, विवाह होम व ऐरणीदानापर्यंतचे विधी येतात. याच्या संकल्पातच ‘‘ब्रह्मसायुज्यार्थ श्री पद्मात्मनासह तुलसी विवाद करिष्ये|’’ असे म्हटले आहे. म्हणजे मुक्ती प्राप्त करून देणारा हा विधी आहे.

स्त्रीची जिवाभावाची सखी!
गोव्यात पोर्तुगीज काळातील साडेचारशे वर्षांच्या भल्यामोठ्या जुलुमी कालखंडातसुद्धा हिंदूंनी आपल्या रूढी, परंपरा प्राणपणाने जोपासल्या. आपल्या उज्ज्वल संस्कृतीबाबत तडजोड केली नाही. गोव्यातील पेडणेपासून काणकोणपर्यंत व सत्तरीपासून तिसवाडीपर्यंत तुळशीविवाहाची धामधूम असते. एखाद्याचे घर साधे असेल पण चांगले तुळशीवृंदावन बांधल्याशिवाय तो राहात नाही. तथापि काही ग्रामीण भागात अजूनही बैठी तुळशीवृंदावने दिसतात… त्याचे कारण जमिनीवर – पाटावर बसून यथासांग तुळशीची पूजा करता यावी म्हणून! तुळशी वृंदावन हे घरासमोरील दैवत असते. घरातली स्त्री सकाळी आंघोळ करून तुळशीची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणीसुद्धा घेत नाही. माहेरी जातेवेळी ती तुळशीला नमस्कार करून तिचा निरोप घेते. एखाद्या वयोवृद्ध स्त्रीचा आधार घ्यावा तशी ती तुळशीला आपली सुख-दुःख, व्यथा-वेदना सांगते. इतकी तुळस तिची जिवाभावाची सखी असते. एखादे वाईट स्वप्न पडले की ती गाईच्या कानात व तुळशीला सांगते!!

तुळशीबद्दल लोकगीतांमधून, ओव्यांमधून जो जिव्हाळा व्यक्त केला आहे तो इतर वृक्ष-वेली, पाना-फुलांबद्दल क्वचितच व्यक्त झालेला दिसतो. तिच्याबद्दलच्या अनेक कथा, तिचे उन्हा-पावसात, थंडी-वार्‍यात निमूटपणे उभे राहणे, सोसणे हे स्त्रियांच्या सहनशीलतेचे प्रतीक आहे. म्हणूनच तिला तुळशीबद्दल जास्त आपुलकी वाटत असावी. जवळीक वाटत असावी. एखादी आई नसलेली सासुरवाशीण आपले मन तुळशीपुढे मोकळे करते. तिच्यापुढे दिवा लावते. तिच्या पानांचे तीर्थ घेते. तुळशीला प्रदक्षिणा घालून पंढरीची वारी केल्याचा आनंद व पुण्य तिला मिळते अशी तिची श्रद्धा असते.

भारतीय संस्कृतीत विविध वृक्षे, फळे, फुले, पाने यांना धार्मिक कार्यात मानाचे स्थान आहे. नारळाशिवाय आपले कुठलेच शुभकार्य पूर्ण होत नाही. म्हणूनच नारळाचा ‘श्रीफळ’ म्हणतात. आंब्याची पाने, विड्याची पाने, सुपार्‍या, फुले, बेल, आघाडा, दुर्वा यांच्याप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक महत्त्व तुळशीला आहे. साधे पाणी तुळशीपत्राने शिंपडले तरी ते पवित्र जल मानतात. देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र हवेच. तो नैवेद्य देवापर्यंत पोचवण्याचे काम तुळस करते. तुळशीची माळ गळ्यात असणे हे त्या व्यक्तीच्या सदाचाराचे व धार्मिकतेचे प्रमाणपत्र ठरते. तुळशीच्या रोपाचे भाग वेगवेगळ्या देवतांची प्रतीके मानली जातात. तुळशीच्या पानाच्या अग्रभागी प्रजापती, मध्यभागी श्रीकृष्ण आणि शेवटी शिवाचे वास्तव्य मानतात. ऋग्वेद हे तिचे शरीर, यजुर्वेद ही मान, अथर्ववेद तिचा प्राण आणि कल्प हे तिचे बाहू. अशा विविध गुणांनी युक्त तुळस मन आणि शरीर शुद्ध ठेवण्यास खूपच उपयोगी आहे.

प्रत्येक हिंदू घरात तुळशी विवाहाची तयारी सकाळीच सुरू होते. अंगण शेणाने सारवून रांगोळी काढतात. तुळशी वृंदावनाला रंगवतात व फुलांच्या माळा लावतात. तुळशीरोपाजवळ ऊसाचे वाड व दिंड्याची काठी रोवतात. मुळाशी चिंचा-आवळे घालतात. तिला वस्त्र नेसवतात. दुपारी तिचे केळवण असते. गोडाचे जेवण करतात. तिला तेल-हळद लावतात व गरम पाणी-थोडे घालतात. जेवणाच्या पानाचा नैवेद्य दाखवून आरती ओवाळतात. संध्याकाळचाच मुहूर्त या लग्नासाठी योजतात. संध्याकाळी सगळ्या पणत्या पेटवतात. लोक जमतात. शास्त्रानुसार लग्नविधी होतो. नैवेद्याला गोड पोहे, चुरमुरे, उसाचे तुकडे घातलेले पोहे असे प्रकार असतात. मंगलाष्टके, आरत्या झाल्यावर प्रसाद वाटप व शेवटी तिची ओटी भरतात.
दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आत तुळशीवृंदावनाच्या माळा, इतर सजावट काढायची असते. कारण तुळशीचे सौभाग्य एका रात्रीपुरतेच असते.

हिंदूंचे प्रत्येक महिन्यांत, ठरावीक काळात, ठरावीक सण-उत्सव साजरे होतात त्याला हजारो वर्षें लोटली आहेत. किती युगे आली आणि गेली. पण ते साजरे करण्याचा कधीही कंटाळा येत नाही. आजपर्यंत आला नाहीच, पुढेही येणार नाही. तुळशीविवाहासारखे संस्कार प्रत्येकाच्या मनाला उभारी देतात. उत्साह वाढवतात. इथून पुढे मानवी लग्नांची सुरवात होते. लोक आपापल्या मुला-मुलींची लग्ने जमवण्याच्या उद्योगाला लागतात. जमवून ठेवलेल्या लग्नांची आमंत्रणे येऊ लागतात!
ज्या काळात स्वयंपाकघर व अंधारं माजघर इतकंच स्त्रियांचं क्षेत्र होतं त्यावेळी त्यांना अंगणात येण्याचं स्वातंत्र्य देणारी, सकाळी कोवळ्या उन्हात त्यांच्या दिवसाची प्रसन्न सुरवात करून देणारी तसंच सायंकाळी सांजवातीच्या सौम्य प्रकाशात दिवसभराचे कष्ट, मान-अपमान विसरायला लावणारी, क्षणभर विसावा देणारी तुळस!! बहुगुणी, बहुपयोगी, सहज उपलब्ध होणारी तुळस!! म्हणूनच तिचा भगवंताशी विवाह! एरवी असे भाग्य प्राप्त होणे दुरापास्त!