विदेशी पर्यटकांच्या व्हिसा शुल्कात कपातीचे प्रयत्न

0
127

गोव्यात पर्यटनासाठी येणार्‍या विदेशी पर्यटकांना व्हिसाच्या वाढलेल्या शुल्कामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. व्हिसाच्या शुल्कात काही प्रमाणात सूट मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्हिसाच्या शुल्कात सूट मिळविण्यासाठी केंद्राशी बोलणी केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन व क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत पर्यटन, क्रीडा व इतर खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

राज्याचा पर्यटन मास्टर प्लॅन आणि पर्यटन धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पर्यटन धोरणासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्यटन धोरणासाठी सूचना स्वीकारल्या जात आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन पर्यटन धोरण व मास्टर प्लॅन केला जाणार आहे, असेही मंत्री आजगावकर यांनी सांगितले.
पर्यटन खात्याकडून किनार्‍यावरील कचरा उचलण्याचे काम केले जाणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिले जात आहे. तसेच समुद्र किनार्‍यावर बेकायदा व्यवसाय करणार्‍यांची गय केली जाणार नाही. राज्यातील किनारी भागात विविध साधनसुविधा उभारण्यासाठी २०० कोटी मंजूर केलेले आहे, असेही आजगावकर यांनी सांगितले.

क्रीडा खात्याकडून स्पोट्‌र्स कोड या नवीन धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. क्रीडा संघटनांना त्यांच्या गुणवत्तेनुसार अनुदान दिले जाणार आहे. क्रीडा अनुदानासाठी क्रीडा संघटनांची तीन गटांत विभागणी केली जाणार आहे, असेही मंत्री आजगावकर यांनी सांगितले.
क्रीडा धोरणाअंतर्गत पोलीस, आरोग्य, वीज या तीन खात्यात ५ टक्के राखीवता क्रीडापटूंसाठी ठेवण्यात आली आहे. क्रीडा खात्यात २७० रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना सेवेत नियमित केले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी साधनसुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गोव्यात क्रीडा हब तयार करून क्रीडा पर्यटनाचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मंत्री आजगावकर यांनी सांगितले.