विदेशींच्या वास्तव्यामुळे आगरवाड्यात भीतीचे वातावरण

0
175

>> क्वारंटाईन झालेले विदेशी रात्री-अपरात्री फिरत असल्याने धास्ती

 

पेडणे तालुक्यातील आगरवाडा या गावात आता बिगर गोमंतकीय मजुरांप्रमाणे विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भाडेपट्टीवर राहत असल्याने ‘कोरोनाच्या, पार्श्‍वभूमीवर स्थानिकांत भीती निर्माण झाली आहे. त्यात गावातील काही भाडेपट्टीवरील नागरिकांना क्वॉरंटाईन केल्याने भीतीचे रुपांतर धास्तीत झाले आहे. त्यामुळे स्थानिक पंचायतीतर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

त्याचाच भाग म्हणून गावातील काही युवक एकत्रित येवून बेतखोल, खालचा राऊत वाडा व अन्य काही भागात जाणार्‍या मुख्य रस्त्यापासून सातेरी देवस्थान हा रस्ता लॉक करून स्थानिक युवक रात्री जागवत आहेत. याठिकाणी भाडेपट्टीवर राहत असलेल्या विदेशी नागरिकांना ताकीद देवून सुद्धा हे लोक रात्री अपरात्री गावाबाहेर पडत असतात. तसेच वाहने घेवून रात्री उशिरा परतत असतात. त्यातील काहीना क्वॉरंटाईन केलेले आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे आम्हाला अंडी, चिकन, फळे मिळत नसल्याने आम्ही बाहेर जातो. आम्हाला मांसाहाराशिवाय राहता येत नाही असे सांगून या विदेशींनी स्थानिक युवकांशी हुज्जत घालीत पोलिसात तक्रार करण्याची धमकी सुद्धा देतात.

मात्र युवकांनी कोणत्याही परिस्थितीत या विदेशीना गावाबाहेर सोडाच घराबाहेर जावू न देण्याचा निर्धार केला आहे.

विदेशींच्या संशयास्पद हालचालीबद्दल स्थानिक पंचायतीकडे लेखी तक्रार केल्यानंतर पंचायतीतर्फे विदेशी नागरिक ज्यांच्याकडे राहतात त्या घर मालकांना नोटीसा पाठवून त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करावा असे बजावले आहे. तसे न झाल्यास घर मालकावर कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याचे पंचायत सचिव रमेश मांद्रेकर यांनी सांगितले. याबाबत स्थानिक आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यानाही कल्पना देण्यात आही असून त्यांनीही या गोष्टीला आपले सहकार्य आहे, असे सांगितले आहे.

आगरवाडा चोपडे गावात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी पंचायतीतर्फे आवश्यक उपाय योजना केल्या जात आहेत. गावातील लोकांबरोबर बाहेरील लोकांचीही काळजी घेतली जाईल असे सांगून ते म्हणाले गावात माजी सरपंच अमोल रावूत यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवक कार्यरत आहेत.

 

विदेशींचे व्यवहार संशयास्पद

आगरवाडा गावात राहणार्‍या विदेशी नागरिकांना दर दिवशी औषाधांचा पुरवठा करण्याच्या नावावर एक विदेशी दुचाकीवरून रोज गावात येत असल्याबद्दल स्थानिकात संशय असून विदेशीना मौज मस्ती करण्यासाठी सध्या दारू किवा अन्य नशिले पदार्थ उपलब्ध होत नसल्याने हा युवक त्यांना या वस्तूंचा पुरवठा करीत असावा असा संशय आहे. म्हणून या युवकांनी त्याला व अश्या संशयास्पद फिरणार्‍या विदेशी नागरिकांना गावात येण्यापासून रोखण्याचे ठरवले आहे.