विदेशातील खलाशांबाबत निर्णय १४ एप्रिलपर्यंत शक्य ः लोबो

0
117

विदेशी जहाजांवर काम करणार्‍या सुमारे ८ ते १० हजार गोमंतकीयांना कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात परत आणण्यासाठीचा निर्णय केंद्र सरकार १४ एप्रिलपर्यंत घेणार असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान वरील प्रकरणी काय निर्णय घेतात ते विदेशी जहाजांवर अडकून पडलेल्या या गोमंतकीयांना व त्यांच्या कुटुंबियांना १४ एप्रिलनंतरच कळू शकणार असल्याचे लोबो म्हणाले. वरील प्रकरणी आपण १४ एप्रिल रोजी निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने स्पष्ट केले असल्याचे काल लोबो यांनी माहिती देताना सांगितले.

दरम्यान, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असता मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी विदेशी जहाजांवर अडकून पडलेल्या सर्व गोमंतकीयांना लवकरात लवकर गोव्यात आणण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत व्यक्त केल्याची माहिती लोबो यांनी दिली. त्यासाठी आम्ही केंद्र दरबारी आवश्यक ते प्रयत्न करू या, असे सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितल्याचे लोबो म्हणाले.

वरील प्रकरणी केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्याबाबत कायम केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे विदेशी जहाजांवर काम करणार्‍या या लोकांच्या कुटुंबियांनी कसलीही चिंता करू नये, असे लोबो यांनी स्पष्ट केले.